करिंथकर यांना दुसरं पत्र
२ तुमच्याकडे पुन्हा आल्यावर तुम्हाला दुःख द्यायचं नाही, असं मी ठरवलं आहे. २ कारण जर मी तुम्हाला दुःखी केलं, तर मला कोण आनंदित करेल? मला आनंद देणारे तुम्हीच तर आहात. ३ मी तुम्हाला जे काही लिहिलं ते यासाठी लिहिलं, की मी तिथे आल्यावर ज्यांच्याबद्दल मला आनंद वाटायला पाहिजे, त्यांच्यामुळे मी दुःखी होऊ नये. कारण, मला खातरी आहे की ज्या गोष्टींमुळे मला आनंद होतो, त्या गोष्टींमुळे तुम्हा सर्वांनाही तितकाच आनंद होतो. ४ कारण मी खूप दुःखाने आणि मनस्ताप सहन करून, अश्रू गाळत तुम्हाला पत्र लिहिलं. तुम्हाला दुःख द्यायचा माझा हेतू नव्हता,+ तर माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला कळावं अशी माझी इच्छा होती.
५ आता, जर कोणी दुःख दिलं आहे+ तर ते फक्त मलाच नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांनाच दिलं आहे—मला जास्त कठोर शब्दांत सांगायची इच्छा नाही. ६ त्या माणसाला बहुतेक जणांनी जे ताडन दिलं आहे, ते पुरेसं आहे. ७ आता मात्र तुम्ही त्याला प्रेमळपणे क्षमा करून सांत्वन द्या,+ नाहीतर तो दुःखात बुडून जाईल.*+ ८ म्हणून, मी तुम्हाला प्रोत्साहन देतो की त्याला तुमच्या प्रेमाचं आश्वासन द्या.+ ९ तुम्हाला ते पत्र लिहायचं आणखी एक कारण म्हणजे, तुम्ही सगळ्या बाबतींत आज्ञा पाळाल की नाही, हे मला पाहायचं होतं. १० तुम्ही ज्याला क्षमा करता, त्याला मीसुद्धा क्षमा करतो. खरंतर, मी ज्या कोणाला क्षमा केली आहे, (जर मी कोणाला कशाविषयी क्षमा केली असेन, तर) ती ख्रिस्ताला साक्षी ठेवून तुमच्यासाठीच केली आहे. ११ हे यासाठी की, सैतानाने आपल्यावर विजय मिळवू नये,*+ कारण त्याच्या डावपेचांबद्दल* आपण अंधारात आहोत, असं नाही.+
१२ जेव्हा मी ख्रिस्ताबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करायला त्रोवस इथे आलो+ आणि प्रभूच्या कार्यात माझ्यासाठी एक दार उघडण्यात आलं, १३ तेव्हा माझा भाऊ तीत+ याची भेट न झाल्यामुळे मी फार बेचैन झालो. म्हणून, तिथल्या शिष्यांचा निरोप घेऊन मी मासेदोनियाला निघून गेलो.+
१४ पण मी देवाचे आभार मानतो, की तो जणू एका विजयोत्सवाच्या मिरवणुकीत आम्हाला ख्रिस्तासोबत नेतो आणि स्वतःबद्दलच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्वारे सगळीकडे पसरवतो! १५ कारण, तारण होणाऱ्या* आणि नाश होणाऱ्यांमध्ये आम्ही देवाच्या नजरेत ख्रिस्ताविषयीच्या संदेशाचा मोहक सुगंध आहोत. १६ नाश होणाऱ्यांसाठी आम्ही मरण आणणारा मरणाचा गंध,*+ आणि तारण होणाऱ्यांसाठी जीवन देणारा जीवनाचा सुगंध आहोत. आणि अशा सेवेसाठी पुरेशी पात्रता कोणाजवळ आहे? १७ आमच्याजवळ आहे, कारण पुष्कळ माणसांप्रमाणे आम्ही देवाच्या वचनाचे विक्रेते* नाही,+ तर देवाने पाठवल्याप्रमाणे आम्ही अगदी प्रामाणिकपणे बोलतो. हो, आम्ही देवाच्या समोर ख्रिस्तासोबत ही सेवा करतो.