लूकने सांगितलेला संदेश
१० यानंतर, प्रभूने आणखी ७० जणांना निवडलं. ज्या प्रत्येक नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता, त्या त्या ठिकाणी त्याने त्यांना जोडीजोडीने आपल्यापुढे पाठवलं.+ २ मग तो त्यांना म्हणाला: “पीक तर भरपूर आहे, पण कामकरी कमी आहेत. म्हणून, पिकाच्या मालकाने कापणी करायला कामकरी पाठवावेत अशी त्याला विनंती करा.+ ३ जा, पण सावध राहा! लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावं तसं मी तुम्हाला पाठवतोय.+ ४ पैशांचा बटवा किंवा जेवणाची पिशवी किंवा जास्तीचे जोडे सोबत घेऊ नका.+ आणि रस्त्याने जाताना कोणाला नमस्कार करू नका.* ५ कोणत्याही घरात गेल्यावर आधी असं म्हणा: ‘या घराला शांती मिळो.’+ ६ आणि जर तिथे कोणी शांतिप्रिय असेल, तर तुमची शांती त्याच्यावर राहील. पण नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल. ७ म्हणून, त्याच घरात मुक्काम करा+ आणि ते जे काही तुम्हाला देतील ते खा आणि प्या.+ कारण, कामकऱ्याला त्याची मजुरी मिळण्याचा हक्क आहे.+ आणि वारंवार एका घरातून दुसऱ्या घरात मुक्काम हलवू नका.
८ तसंच, एखाद्या शहरात गेल्यानंतर त्यांनी तुमचं स्वागत केलं, तर ते जे काही तुम्हाला वाढतील ते खा. ९ आणि तिथे असलेल्या आजारी लोकांना बरं करा आणि त्यांना सांगा: ‘देवाचं राज्य तुमच्या जवळ आलंय.’+ १० पण एखाद्या शहरात गेल्यानंतर त्यांनी तुमचं स्वागत केलं नाही, तर शहराच्या मुख्य रस्त्यांवर जा आणि म्हणा: ११ ‘तुम्हाला इशारा मिळण्यासाठी, तुमच्या शहराची जी धूळ आमच्या पायांना लागली आहे तीसुद्धा आम्ही पुसून* टाकत आहोत.+ पण हे लक्षात ठेवा, देवाचं राज्य जवळ आलंय.’ १२ मी तुम्हाला सांगतो, न्यायाच्या दिवशी सदोमला त्या शहरापेक्षा जास्त सोपं जाईल.+
१३ हे खोराजिन! तुझा धिक्कार असो! हे बेथसैदा! तुझा धिक्कार असो! कारण तुमच्यामध्ये जी अद्भुत कार्यं घडली आहेत ती सोरमध्ये आणि सीदोनमध्ये घडली असती, तर त्यांनी केव्हाच गोणपाट घालून आणि राखेत बसून पश्चात्ताप केला असता.+ १४ म्हणूनच, न्यायाच्या दिवशी सोर आणि सीदोन यांना तुमच्यापेक्षा जास्त सोपं जाईल. १५ आणि हे कफर्णहूम! तुला काय स्वर्गापर्यंत उंच केलं जाईल? नाही, तू खाली कबरेत* जाशील!
१६ जो तुमचं ऐकतो, तो माझं ऐकतो.+ आणि जो तुमचा अनादर करतो, तो माझा अनादर करतो. शिवाय, जो माझा अनादर करतो, तो ज्याने मला पाठवलं त्याचाही अनादर करतो.”+
१७ मग ते ७० शिष्य आनंदाने परत आले आणि म्हणाले: “प्रभू, तुझ्या नावाने दुष्ट स्वर्गदूतसुद्धा* आमच्या अधीन होतात.”+ १८ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मला तर सैतान आताच आकाशातून विजेसारखा खाली पडलेला दिसतोय.+ १९ पाहा! मी सापांना आणि विंचवांना पायाखाली तुडवायचा आणि शत्रूंच्या सामर्थ्यावर मात करायचा अधिकार तुम्हाला दिलाय.+ कोणतीच गोष्ट तुमचं नुकसान करू शकणार नाही. २० पण दुष्ट स्वर्गदूत तुमच्या अधीन करण्यात आले आहेत यामुळे आनंदी होऊ नका. तर, स्वर्गात तुमची नावं लिहिण्यात आली आहेत+ यामुळे आनंदी व्हा.” २१ त्याच वेळी, पवित्र शक्तीद्वारे* त्याला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला: “हे पित्या, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, मी सर्वांसमोर तुझी स्तुती करतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून+ काळजीपूर्वक लपवून, लहान मुलांना प्रकट केल्या आहेत. हो पित्या, कारण तुला हेच योग्य वाटलं.+ २२ माझ्या पित्याने सगळ्या गोष्टी माझ्या स्वाधीन केल्या आहेत आणि मुलगा कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाही माहीत नाही. तसंच, पिता कोण आहे हे मुलाशिवाय,+ आणि ज्या कोणाला तो पित्याबद्दलचं ज्ञान प्रकट करू इच्छितो, त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.”+
२३ मग शिष्यांकडे वळून तो म्हणाला: “तुम्ही पाहत असलेल्या गोष्टी जे आपल्या डोळ्यांनी पाहतात, ते सुखी!+ २४ कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पाहत असलेल्या गोष्टी पाहायची आणि तुम्ही ऐकत असलेल्या गोष्टी ऐकायची बऱ्याच संदेष्ट्यांची आणि राजांची इच्छा होती. पण त्यांना त्या पाहता आणि ऐकता आल्या नाहीत.”+
२५ इतक्यात, नियमशास्त्राचा जाणकार असलेला एक माणूस उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हणाला: “गुरू, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे?”+ २६ तो त्याला म्हणाला: “नियमशास्त्रात काय लिहिलंय? तू काय वाचलं आहेस?” २७ त्याने उत्तर दिलं: “‘तू आपला देव, यहोवा* याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने,* पूर्ण शक्तीने आणि पूर्ण बुद्धीने प्रेम कर’+ आणि ‘आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.’”+ २८ येशू त्याला म्हणाला: “तू बरोबर उत्तर दिलंस. हेच करत राहा म्हणजे तुला जीवन मिळेल.”+
२९ पण आपण नीतिमान आहोत हे सिद्ध करण्यासाठी+ तो माणूस येशूला म्हणाला: “मुळात माझा शेजारी कोण?” ३० येशूने त्याला उत्तर दिलं: “एक माणूस यरुशलेमहून खाली यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून त्याला मारहाण केली आणि ते त्याला अर्धमेल्या अवस्थेत सोडून निघून गेले. ३१ मग एक याजक त्या रस्त्याने खाली जात होता. पण त्याने त्या माणसाला पाहिलं तेव्हा तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. ३२ त्याच प्रकारे, एक लेवी तिथे आला आणि त्याने त्या माणसाला पाहिलं, तेव्हा तोसुद्धा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. ३३ पण, त्याच रस्त्याने जाणारा एक शोमरोनी+ तिथे आला, तेव्हा त्या माणसाला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. ३४ त्यामुळे, तो त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याच्या जखमांवर तेल आणि द्राक्षारस ओतून त्यांवर पट्ट्या बांधल्या. मग त्याला आपल्या गाढवावर टाकून त्याने त्याला एका धर्मशाळेत आणलं आणि त्याची काळजी घेतली. ३५ मग दुसऱ्या दिवशी त्याने दोन दिनार* काढून धर्मशाळेच्या मालकाला दिले. आणि तो म्हणाला: ‘त्याची काळजी घ्या आणि याहून जास्त खर्च झाला, तर परत आल्यावर मी तुम्हाला देईन.’ ३६ मग तुझ्या मते या तिघांपैकी, त्या लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाशी खऱ्या शेजाऱ्यासारखा कोण वागला?”+ ३७ तो म्हणाला: “जो त्याच्याशी दयाळूपणे वागला तो.”+ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “तर मग जा आणि तूही तसंच कर.”+
३८ मग पुढे गेल्यावर ते एका गावात आले. इथे मार्था+ नावाच्या एका स्त्रीने येशूचं आपल्या घरात स्वागत केलं. ३९ तिला मरीया नावाची एक बहीणही होती. ती प्रभूच्या पायांजवळ बसून त्याचं* ऐकत होती. ४० पण, मार्था बरीच कामं करण्यात व्यस्त होती. म्हणून ती येशूजवळ येऊन म्हणाली: “प्रभू, माझ्या बहिणीने सगळी कामं माझ्या एकटीवरच टाकली आहेत, याचं तुला काहीच वाटत नाही का? तिला मला मदत करायला सांग.” ४१ तेव्हा येशू तिला म्हणाला: “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींबद्दल चिंता आणि दगदग करतेस. ४२ थोड्याच गोष्टींची गरज आहे, खरंतर एकच गोष्ट पुरेशी आहे. मरीयाने जे जास्त चांगलं ते निवडलंय+ आणि ते तिच्याकडून काढून घेतलं जाणार नाही.”