“सर्व सांत्वनदाता देव” यहोवा याच्यावर भरवसा ठेवा
“आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो.”—२ करिंथ. १:३.
१. सर्व मानवांना कशाची गरज असते?
जन्मापासूनच आपल्याला सांत्वनाची गरज असते. एक बाळ रडू लागते तेव्हा जणू ते आपल्याला सांगत असते की त्याला सांत्वनाची गरज आहे. त्याला कदाचित भूक लागली असेल किंवा आपल्याला कोणीतरी जवळ घ्यावे असे त्याला वाटत असेल. वृद्ध झाल्यावरही आपल्याला वेळोवेळी सांत्वनाची गरज भासते. खासकरून, आपण एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करतो तेव्हा आपल्याला सांत्वनाची गरज असते.
२. जे यहोवावर भरवसा ठेवतात अशांना यहोवा कोणते आश्वासन देतो?
२ कुटुंबातील सदस्य व मित्र आपल्याला काही प्रमाणात सांत्वन देऊ शकतात. पण, सर्वच प्रसंगी ते आपले सांत्वन करू शकत नाहीत. जीवनात असे काही प्रसंग असतात ज्यांत फक्त देवच आपले सांत्वन करू शकतो. देवाचे वचन आपल्याला असे आश्वासन देते: ‘जे कोणी त्याचा धावा करितात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो.’ (स्तो. १४५:१८, १९) होय, “परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.” (स्तो. ३४:१५) पण, आपल्याला देवाचा आधार व सांत्वन प्राप्त करायचे असेल, तर आपण त्याच्यावर भरवसा ठेवला पाहिजे. ही गोष्ट, स्तोत्रकर्ता दावीद याने आपल्या एका स्तोत्रात स्पष्टपणे सांगितली: “परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे; तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे; ज्यांस तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवितील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करितात त्यांस तू टाकिले नाही.”—स्तो. ९:९, १०.
३. यहोवा आपल्या लोकांवर प्रेम करतो हे येशूने कसे स्पष्ट करून सांगितले?
३ यहोवा आपल्या उपासकांना मौल्यवान समजतो. येशूच्या पुढील शब्दांतून हे स्पष्ट होते: “पाच चिमण्या दोन दमड्यांस विकतात की नाही? तरी त्यांपैकी एकीचाहि देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसहि मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहा.” (लूक १२:६, ७) यहोवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे इस्राएल लोकांना सांगितले: “मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुजवर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे.”—यिर्म. ३१:३.
४. यहोवाने दिलेल्या अभिवचनांवर आपण भरवसा का ठेवू शकतो?
४ यहोवावर व त्याच्या अभिवचनांवर भरवसा ठेवल्याने आपल्याला संकटाच्या काळात सांत्वन मिळू शकते. तेव्हा, आपणसुद्धा यहोशवाप्रमाणे देवावर भरवसा ठेवला पाहिजे ज्याने म्हटले: “आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यांतली एकहि व्यर्थ गेली नाही.” (यहो. २३:१४) शिवाय, खडतर परिस्थितीमुळे आपण काही वेळासाठी भरडले गेलो, तरी आपण याची खातरी बाळगू शकतो, की “देव विश्वसनीय आहे” आणि तो आपल्या एकनिष्ठ सेवकांचा कधीच त्याग करणार नाही.—१ करिंथकर १०:१३ वाचा.
५. आपण इतरांचे सांत्वन कसे करू शकतो?
५ प्रेषित पौल यहोवाचे वर्णन, “सर्व सांत्वनदाता देव” असे करतो. ‘सांत्वन करणे’ म्हणजे दुःखी व्यक्तीला दिलासा देणे. एका व्यक्तीच्या वेदना शमवण्याद्वारे किंवा तिचे दुःख हलके करण्याद्वारे आपण तिला दिलासा देतो. यहोवा नेमके हेच करतो. (२ करिंथकर १:३, ४ वाचा.) आपल्या स्वर्गीय पित्यावर कशाचेही आणि कोणाचेही बंधन नसल्यामुळे जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांचे तो कोणत्याही मार्गाने सांत्वन करू शकतो. त्यामुळे, ‘ज्या सांत्वनाने आपल्या स्वतःला देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आपण कोणत्याही संकटात’ असलेल्या आपल्या बंधुभगिनींचे सांत्वन करू शकतो. यावरून, निराश झालेल्यांचे सांत्वन करण्यासाठी यहोवाजवळ अतुलनीय शक्ती आहे हे दिसून येत नाही का?
दुःखाच्या कारणांचा सामना करणे
६. कोणकोणत्या गोष्टींमुळे एखाद्या व्यक्तीला दुःख होऊ शकते?
६ जीवनात अनेक प्रसंगी आपल्याला सांत्वनाची गरज भासते. उदाहरणार्थ, आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला खूप दुःख होते; खासकरून ती व्यक्ती आपला विवाहसोबती किंवा आपले मूल असते तेव्हा. एक व्यक्ती भेदभावाची किंवा पूर्वग्रहाची शिकार झाल्यामुळेसुद्धा तिला सांत्वनाची गरज भासेल. तसेच, आजारपणामुळे, वाढत्या वयामुळे, गरिबीमुळे, वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे किंवा जगातील दुःखमय परिस्थितीमुळे प्रत्येकालाच सांत्वनाची गरज भासू शकते.
७. (क) दुःखद परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारच्या सांत्वनाची गरज आहे? (ख) “भग्न व अनुतप्त” हृदयाला बरे करण्यासाठी यहोवा काय करू शकतो?
७ दुःखामुळे आपल्या हृदयावर, मनावर, भावनांवर तसेच आपल्या शारीरिक व आध्यात्मिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे आपल्याला सांत्वनाची गरज असते. उदाहरणार्थ, हृदयाचा विचार करा. देवाचे वचन मान्य करते की आपले हृदय “भग्न व अनुतप्त” होऊ शकते. (स्तो. ५१:१७) पण, यहोवा ‘भग्नहृदयी जनांना बरे करणारा; जखमांना पट्ट्या बांधणारा’ असल्यामुळे तो नक्कीच आपली मदत करू शकतो. (स्तो. १४७:३) अगदी वाइटातल्या वाईट परिस्थितीतसुद्धा, आपण पूर्ण विश्वासाने देवाला प्रार्थना केली आणि त्याच्या आज्ञा पाळल्या तर दुःखाने व्याकूळ झालेल्या आपल्या हृदयाला तो दिलासा देऊ शकतो.—१ योहान ३:१९-२२; ५:१४, १५ वाचा.
८. आपल्याला मानसिक दुःख होते तेव्हा यहोवा आपली मदत कशी करू शकतो?
८ निरनिराळ्या परीक्षांमुळे आपल्याला प्रचंड मनोवेदना होऊ शकतात; त्यामुळे आपल्या मनाला वारंवार सांत्वनाची गरज असते. विश्वासाच्या या परीक्षांचा सामना आपण स्वतःच्या बळावर करू शकत नाही. स्तोत्रकर्त्याने आपल्या स्तोत्रात असे म्हटले: “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.” (स्तो. ९४:१९) तसेच, पौलानेसुद्धा असे लिहिले: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पै. ४:६, ७) शास्त्रवचनांचे वाचन केल्याने आणि त्यावर मनन केल्याने मानसिक दुःखाचा सामना करण्यासाठी आपल्याला खूप मदत मिळू शकते.—२ तीम. ३:१५-१७.
९. आपण भावनिक दुःखाचा सामना कसा करू शकतो?
९ काही वेळा आपण इतके निराश होऊ शकतो की आपण नकारात्मक भावनांच्या आहारी जाऊ शकतो. आपल्याला कदाचित असे वाटेल की एखादी आध्यात्मिक जबाबदारी किंवा सेवेचा विशेषाधिकार हाताळण्यास आपण समर्थ नाही. अशा वेळीसुद्धा यहोवा आपल्याला सांत्वन देऊ शकतो व मदत करू शकतो. उदाहरणार्थ, शक्तीशाली शत्रू राष्ट्रांवर चढाई करण्यासाठी इस्राएली लोकांचे नेतृत्व करण्यास यहोशवाला सांगण्यात आले तेव्हा मोशे इस्राएल राष्ट्राला म्हणाला: “खंबीर हो, हिंमत धर, त्यांना भिऊ नको, त्यांना घाबरू नको; कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारहि नाही.” (अनु. ३१:६) यहोवाच्या पाठिंब्यामुळे यहोशवा देवाच्या लोकांना प्रतिज्ञात देशात घेऊन जाऊ शकला व त्यांच्या सगळ्या शत्रूंवर विजय प्राप्त करू शकला. देवाचा असाच पाठिंबा मोशेने याआधी तांबड्या समुद्राजवळ अनुभवला होता.—निर्ग. १४:१३, १४, २९-३१.
१०. एखाद्या दुःखद घटनेमुळे आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असेल, तर कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?
१० दुःखद घटनांचा आपल्या शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अर्थात, चांगला आहार, पुरेशी विश्रांती व व्यायाम आणि स्वच्छता यांमुळे आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. तसेच, बायबलवर आधारित आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाचाही आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. तेव्हा, एखाद्या दुःखद घटनेमुळे आपल्याला मनोवेदना होत असतील, तर पौलाचा अनुभव व त्याचे प्रोत्साहनदायक शब्द लक्षात ठेवल्यास आपल्याला मदत मिळेल. त्याने म्हटले: “आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही.”—२ करिंथ. ४:८, ९.
११. आध्यात्मिक आजारावर कशा प्रकारे मात केली जाऊ शकते?
११ काही परीक्षांमुळे आपल्या आध्यात्मिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. अशा वेळीसुद्धा यहोवा आपल्या मदतीला धावून येऊ शकतो. त्याचे वचन असे आश्वासन देते: “पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, व वाकलेल्या सर्वांना उभे करितो.” (स्तो. १४५:१४) आध्यात्मिक आजारावर मात करण्यासाठी आपण ख्रिस्ती वडिलांची मदत घेतली पाहिजे. (याको. ५:१४, १५) तसेच, बायबलमधील सार्वकालिक जीवनाची आशा सतत लक्षात ठेवल्यानेसुद्धा विश्वासाच्या परीक्षांमध्ये टिकून राहण्यास आपल्याला मदत मिळू शकते.—योहा. १७:३.
अशा व्यक्ती ज्यांना देवाकडून सांत्वन मिळाले
१२. यहोवाने कशा प्रकारे अब्राहामाचे सांत्वन केले?
१२ एका स्तोत्रकर्त्याने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “तू [“यहोवा,” NW] आपल्या दासाला दिलेले वचन आठीव, कारण तू मला आशा लाविली आहे. माझ्या दु:खात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते.” (स्तो. ११९:४९, ५०) आज आपल्याजवळ यहोवाचे लिखित वचन आहे आणि त्यात अशा अनेक व्यक्तींची उदाहरणे आहेत ज्यांना देवाकडून सांत्वन मिळाले. उदाहरणार्थ, यहोवा सदोम व गमोराचा नाश करणार आहे हे कळाल्यावर अब्राहामाला कदाचित खूप दुःख झाले असेल. त्या विश्वासू कुलपित्याने देवाला विचारले: “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाहि संहार खरेच करणार काय?” यहोवाने अब्राहामाला असे आश्वासन दिले की सदोम शहरात फक्त ५० नीतिमान लोक आढळले तर तो त्या शहराचा नाश करणार नाही. अशा प्रकारे यहोवाने अब्राहामाचे सांत्वन केले. पण, अब्राहामाने आणखी पाच वेळा यहोवाला प्रश्न विचारले: त्या शहरांत फक्त ४५ नीतिमान लोक आढळल्यास काय? फक्त ४०? फक्त ३०? फक्त २०? फक्त १०? यहोवाने प्रत्येक वेळी अगदी धीराने व प्रेमळपणे अब्राहामाला याचे आश्वासन दिले की तो सदोमचा नाश करणार नाही. त्या भागात दहा नीतिमान लोकसुद्धा नव्हते, तरी यहोवाने लोटाचा व त्याच्या मुलींचा बचाव केला.—उत्प. १८:२२-३२; १९:१५, १६, २६.
१३. हन्नाने कसे दाखवले की यहोवावर तिचा भरवसा होता?
१३ आपले एक मूल असावे अशी एलकानाची पत्नी हन्ना हिची तीव्र इच्छा होती. पण, ती वांझ होती आणि त्यामुळे ती फार दुःखी होती. या बाबतीत तिने यहोवाला प्रार्थना केली, आणि महायाजक एली तिला म्हणाला: “इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देवो.” यामुळे हन्नाला सांत्वन मिळाले, “व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.” (१ शमु. १:८, १७, १८) हन्नाने यहोवावर भरवसा ठेवला आणि सर्व गोष्टी त्याच्यावर सोपवून दिल्या. पुढे काय होईल हे तिला माहीत नसले, तरी तिने आंतरिक शांती अनुभवली. कालांतराने, यहोवाने तिच्या प्रार्थनेचे उत्तर दिले. ती गर्भवती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला व त्याचे नाव शमुवेल ठेवले.—१ शमु. १:२०.
१४. दाविदाला सांत्वनाची गरज का होती, आणि सांत्वनासाठी तो कोणाकडे वळला?
१४ देवाकडून मिळालेल्या सांत्वनाचे आणखी एक उदाहरण आहे प्राचीन इस्राएलातील दावीद राजाचे. यहोवा ‘हृदय पाहणारा’ असल्यामुळे त्याने इस्राएलचा भावी राजा म्हणून दाविदाची निवड केली तेव्हा दावीद प्रामाणिक व खऱ्या उपासनेला समर्पित आहे हे त्याने पाहिले. (१ शमु. १६:७; २ शमु. ५:१०) परंतु, नंतर दाविदाने बथशेबासोबत व्यभिचार केला आणि तिच्या पतीचा मृत्यू घडवून आणण्याद्वारे त्याने आपले पाप झाकण्याचा प्रयत्न केला. आपण किती घोर पाप केले याची दाविदाला जाणीव झाली तेव्हा त्याने यहोवाला प्रार्थना केली: “तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.” (स्तो. ५१:१-३) दाविदाने खरा पश्चात्ताप दाखवला आणि यहोवाने त्याला माफ केले. असे असले, तरी दाविदाने केलेल्या अपराधाचे परिणाम त्याला भोगावे लागले. (२ शमु. १२:९-१२) परंतु, यहोवाच्या दयेमुळे या नम्र सेवकाला सांत्वन मिळाले.
१५. येशूच्या मृत्यूच्या आधी यहोवाने त्याला कशा प्रकारे साहाय्य केले?
१५ येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याला अनेक परीक्षांचा सामना करावा लागला. या विश्वासाच्या परीक्षा देवाने त्याच्यावर येऊ दिल्या. पण येशूने शेवटपर्यंत आपली एकनिष्ठा टिकवून ठेवली. तो एक परिपूर्ण मनुष्य असून त्याने नेहमी यहोवावर भरवसा ठेवला व त्याचे सार्वभौमत्व उंचावले. त्याचा विश्वासघात व वध होण्याआधी त्याने यहोवाला प्रार्थना केली: “माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” तेव्हा, एक स्वर्गदूत येशूसमोर प्रकट झाला व त्याने येशूला बळ दिले. (लूक २२:४२, ४३) येशूला त्या प्रसंगी सांत्वन, बळ व आधार यांची गरज होती आणि देवाने त्याला ते दिले.
१६. यहोवाला एकनिष्ठ राहिल्यामुळे आपल्याला मृत्यूचा सामना करावा लागला, तरी तो काय करू शकतो?
१६ ख्रिस्ती या नात्याने आपल्या खंबीर भूमिकेमुळे आपल्याला मरणाला सामोरे जावे लागले, तरी यहोवा आपल्याला त्याच्याप्रती एकनिष्ठ राहण्यास मदत करू शकतो. शिवाय, पुनरुत्थानाच्या आशेमुळेदेखील आपल्याला सांत्वन मिळते. शेवटचा शत्रू मृत्यू “नाहीसा केला जाईल” त्या दिवसाची आपण किती आतुरतेने वाट पाहतो! (१ करिंथ. १५:२६) गतकाळात मरण पावलेले देवाचे एकनिष्ठ सेवक व इतर जण यहोवाच्या शाश्वत स्मृतीत सुरक्षित आहेत व त्यांचे पुनरुत्थान केले जाईल. (योहा. ५:२८, २९; प्रे. कृत्ये २४:१५) यहोवाने दिलेल्या पुनरुत्थानाच्या अभिवचनावर विश्वास ठेवल्याने आपल्याला छळाचा सामना करताना सांत्वन व पक्की आशा मिळते.
१७. आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा यहोवा कशा प्रकारे आपले सांत्वन करू शकतो?
१७ सध्या मानवजातीच्या सर्वसाधारण कबरेत झोपलेल्या आपल्या प्रियजनांना, दुःखाचे नामोनिशाण नसलेल्या एका सुंदर नवीन जगात नव्याने जीवन सुरू करण्याची आशा आहे हे जाणून आपल्याला किती सांत्वन मिळते! तसेच, या दुष्ट जगाच्या अंतातून वाचणाऱ्या यहोवाच्या सेवकांच्या ‘मोठ्या लोकसमुदायाला’ पृथ्वीवर पुनरुत्थित झालेल्या लोकांचे स्वागत करण्याचा व त्यांना शिक्षण देण्याचा किती मोठा विशेषाधिकार लाभेल!—प्रकटी. ७:९, १०.
देवाच्या सनातन बाहूंचा आधार
१८, १९. देवाच्या सेवकांचा छळ होत असताना त्यांना कशा प्रकारे सांत्वन मिळाले आहे?
१८ मोशेने इस्राएल लोकांना बळ व सांत्वन देण्यासाठी एक गीत लिहिले. त्यात त्याने म्हटले: “अनादि देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहूंचा तुला आधार आहे.” (अनु. ३३:२७) शमुवेल संदेष्ट्याने काही काळानंतर इस्राएलांना सांगितले: “परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा; . . . परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.” (१ शमु. १२:२०-२२) आपण खऱ्या उपासनेद्वारे यहोवाला बिलगून राहिलो, तर तो कधीच आपला त्याग करणार नाही. तो नेहमी आपल्याला आवश्यक असलेला आधार देईल.
१९ आज या शेवटल्या कठीण दिवसांत, यहोवा आपल्या लोकांना आवश्यक ती मदत व सांत्वन देत आहे. एका शतकापेक्षा अधिक काळापासून, जगभरातील आपल्या हजारो बंधुभगिनींचा यहोवाची सेवा केल्याबद्दल छळ करण्यात आला आहे व त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांच्या अनुभवांवरून हे सिद्ध होते की परीक्षांच्या काळात यहोवा नक्कीच आपल्या सेवकांना सांत्वन देतो. उदाहरणार्थ, पूर्वीच्या सोव्हियत संघातील आपल्या एका बांधवाला त्याच्या विश्वासासाठी २३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तुरुंगात असूनसुद्धा त्याला बायबलची प्रकाशने मिळत राहिली ज्यांद्वारे त्याला बळ व सांत्वन मिळाले. तो म्हणतो: “त्या सबंध काळादरम्यान मी यहोवावर भरवसा ठेवण्यास शिकलो व मला त्याच्याकडून बळ मिळालं.”—१ पेत्र ५:६, ७ वाचा.
२०. यहोवा आपल्याला त्यागणार नाही याची आपण खातरी का बाळगू शकतो?
२० भविष्यात आपल्याला कशाचाही सामना करावा लागला, तरी स्तोत्रकर्त्याचे दिलासा देणारे हे शब्द आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे: “परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.” (स्तो. ९४:१४) आपल्या स्वतःला सांत्वनाची गरज असली, तरी आपल्याला इतरांचेही सांत्वन करण्याचा मोठा विशेषाधिकार आहे. या त्रस्त जगात आपण दुःखी लोकांचे सांत्वन कसे करू शकतो याची चर्चा आपण पुढील लेखात करू या.
तुमचे उत्तर काय असेल?
• कोणकोणत्या गोष्टींमुळे आपल्याला दुःख होऊ शकते?
• यहोवा आपल्या सेवकांचे सांत्वन कसे करतो?
• आपल्याला मृत्यूचा सामना करावा लागला, तरी आपल्याला सांत्वन कसे मिळू शकते?
[२५ पानांवरील चौकट/चित्रे]
पुढील शास्त्रवचने आपले सांत्वन कसे करू शकतात?
▪ हृदय स्तो. १४७:३; १ योहा. ३:१९-२२; ५:१४, १५
▪ मन स्तो. ९४:१९; फिलिप्पै. ४:६, ७
▪ भावना निर्ग. १४:१३, १४; अनु. ३१:६
▪ शारीरिक आरोग्य २ करिंथ. ४:८, ९
▪ आध्यात्मिक आरोग्य स्तो. १४५:१४; याको. ५:१४, १५