आपल्या साहित्याचा विचारशीलपणे उपयोग करा
१ आपल्या साहित्याच्या सुसंघटित वितरणास सुरवात झाली ती वॉचटावर नियतकालिकाच्या जुलै १, १८७९ अंकाच्या ६,००० प्रतींच्या वाटपाने. परिणामस्वरूप, आजवर आपल्या अनेकानेक प्रकाशनांची प्रचंड मोठ्या प्रमाणात छपाई आणि वितरण झाले आहे.
सुलभ साहित्य वितरण योजना
२ नोव्हेंबर १९९९ च्या मध्यात स्पष्टपणे दाखवण्यात आले होते, की प्रचारकांना आणि आस्था दाखवणाऱ्या लोकांना आपली मासिके आणि इतर प्रकाशने आता सुलभ साहित्य वितरण योजनेनुसार दिली जातील. याचा अर्थ, एखादे प्रकाशन सादर करताना बदल्यात ठराविक अंशदान घेतले जाते असा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देखील आपण उल्लेख करणार नाही. पण, प्रकाशन सादर केले जाते तेव्हा सुवार्तेच्या जगव्याप्त प्रचार कार्यास आर्थिकरित्या हातभार लावण्यासाठी स्वेच्छेने दिलेले अनुदान स्वीकारले जाईल. आमचा विश्वास आहे, की यहोवाच्या आशीर्वादाने ही योजना नक्कीच यशस्वी ठरेल.—पडताळा मत्तय ६:३३.
निरनिराळी परिस्थिती कशी हाताळणार
३ काहीही झाले तरी लोकांमध्ये आस्था निर्माण करण्यासाठी आपण सुवार्तेचा अखंड प्रसार करत राहू. पण, ज्यांना आस्था नाही अशांना प्रकाशने देण्याची गरज नाही. आपले साहित्य वाया जावे असे आपल्याला मुळीच वाटणार नाही. त्याउलट, ज्यांना आस्था आहे आणि आपली प्रकाशने वाचण्याची इच्छा आहे केवळ अशांनाच आपण साहित्य देऊ.
४ घरमालकाला प्रकाशन दाखवताना तुम्ही असे म्हणू शकता: “तुम्हाला वाचायची इच्छा असल्यास तुम्ही हे प्रकाशन ठेवू शकता.” त्यावर घरमालक बहुधा असे विचारतील: “याची किंमत काय?” या प्रश्नाचे उत्तर देताना असे म्हणता येईल: “खरं तर हा काही आमचा व्यवसाय नाही. त्यामुळे आम्ही प्रकाशने विकत नाही. पण, आज तुमच्या परिसरात आम्ही जे कार्य करत आहोत तेच कार्य सबंध जगभरात २३३ देशांमध्ये स्वेच्छेनं केलं जातं आणि त्यामागचा हेतू, लोकांना अनंत जीवन मिळवण्यास मदत करणे हा आहे. तेव्हा या कार्याला आर्थिक हातभार लावण्यासाठी अनुदान करण्याची तुमची इच्छा असल्यास आम्ही ते आनंदाने स्वीकारू.”
५ घरमालकाला मासिके दाखवताना मासिकातील विशिष्ट लेखासंबंधी काही प्रश्न तुम्ही विचारू शकता; उदाहरणार्थ: “या लेखात असे काही मुद्दे आहेत जे तुम्ही वाचलेच पाहिजेत असं मला वाटतं. तुमची इच्छा असल्यास तुम्ही ही दोन मासिकं ठेवू शकता.” घरमालकाने मासिके घेतल्यावर तुम्ही म्हणू शकता: “खरं तर तुम्हाला जास्त माहिती मिळावी म्हणून मी ही मासिकं तुमच्याकरता आणली आहेत. ती वाचल्यानंतर तुम्हाला पुष्कळ काही नवीन शिकायला मिळेल. मासिकं वाचून झाल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली हे जाणण्यासाठी मी पुन्हा तुमची भेट घेईन. हे टेहळणी बुरूज मासिक १३२ भाषांत छापलं जातं आणि सबंध जगभर या मासिकाच्या २,२०,००,०० पेक्षा अधिक प्रतींचं वाटप केलं जातं. हे सर्व काम स्वेच्छेनं दिलेल्या अनुदानांवर चालतं. या शैक्षणिक कार्यक्रमाकरता काही मदत करण्याची तुमचीही इच्छा असल्यास आम्ही मोठ्या आनंदाने तुमच्या मदतीचा स्वीकार करू.”
६ काही वेळा जगव्याप्त कार्यासाठी अंशदान करण्याच्या विषयावर बोलणे जरासे विचित्र वाटेल. उदाहरणार्थ, आस्था दाखवणारा एखादा घरमालक कदाचित विचारेल: “तुम्ही हे असंच देता का?” अशा वेळी तुम्ही म्हणू शकता: “तुम्हाला वाचायची आवड असल्यास तुम्ही ते जरूर ठेवू शकता. पण, आपण आज ज्या विषयावर बोललो त्याविषयी आणि आमच्या जगव्याप्त कार्याविषयी थोडक्यात चर्चा करण्यासाठी मी पुढच्या आठवडी पुन्हा येईल.” आणि मग तुम्ही पुनर्भेटी करता तेव्हा आपल्या कार्याला कशाप्रकारे आर्थिक साह्य केले जाते याची कल्पना तुम्ही घरमालकाला देऊ शकता.
७ काही वेळा असे होईल, की घरमालक पटकन साहित्य स्वीकारेल. अशावेळी तुम्ही म्हणू शकता: “माझी खात्री आहे, तुम्हाला ते जरूर आवडेल. पण, हे कार्य सबंध जगभरात केलं जातं; तेव्हा पुष्कळांना प्रश्न पडतो, की या कार्याचा आर्थिक भार कोण वाहतो. अर्थात, आमची प्रकाशनं वाचणाऱ्या बऱ्याच लोकांना काही शिकायला मिळाल्याबद्दल कृतज्ञता वाटते आणि प्रकाशनांच्या वितरण कार्यास बढावा देण्यासाठी ते स्वेच्छेनं अंशदान करतात. अशावेळी आम्ही आनंदानं ते स्वीकारतो.”
आस्था आहे की नाही कसे ओळखाल
८ नम्र अंतःकरणाच्या लोकांना यहोवाच्या अद्भुत उद्देशांविषयी शिकण्यास मदत करणे हाच आपल्या साहित्याचा मूळ उद्देश आहे. तेव्हा, आध्यात्मिक गोष्टींची काडीमात्रही कदर नसलेल्या लोकांना साहित्य देणे निरर्थक ठरेल. (इब्री. १२:१५) साहित्याचे कुशलतापूर्वक वितरण करायचे असल्यास लोकांना खरोखरच आस्था आहे की नाही हे ओळखण्यास आपण शिकले पाहिजे. आणि घरमालकाला खरोखरच आस्था आहे की नाही हे ओळखण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. घरमालकाचा प्रेमळ स्वभाव आणि तुमच्याशी बोलण्याची इच्छा यावरून त्याला खरोखरच आस्था असल्याचे समजले जाऊ शकते. किंवा, तुम्ही बोलत असताना घरमालक लक्षपूर्वक ऐकत असेल, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देत असेल आणि आपले मनोगत व्यक्त करत असेल तर घरमालक चर्चा करण्यास उत्सुक आहे असे म्हटले जाऊ शकते. तो तुम्हाला आदराने आणि मैत्रीपूर्ण रीतीने वागवत असेल तर त्याचा स्वभाव प्रेमळ आहे हे ताडले जाऊ शकते. बायबलमधून एखादे वचन वाचत असताना तो जर लक्ष देऊन ऐकत असेल तर त्याला देवाच्या वचनाचा आदर असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. बरेचदा घरमालकाला साहित्य देताना त्याला वाचण्याची खरंच इच्छा आहे का असे विचारणे उपयुक्त ठरते. तसेच, आणखीन चर्चा करण्यासाठी तुम्ही पुन्हा घरमालकाची भेट घ्याल याची कल्पना तुम्ही त्याला देऊ शकता. यावर घरमालकाने होकारात्मक प्रतिसाद दिल्यास त्याला आस्था असल्याचा हा आणखीन एक पुरावा असू शकतो. एखाद्या व्यक्तीत खरी आस्था असल्याची ही गुणलक्षणे तुम्ही पाहता तेव्हा तुम्ही द्याल ते प्रकाशन ती जरूर वाचून काढेल.
९ आपल्या सेवा कार्यात केलेल्या या फेरबदलामुळे आपण ‘देवाचा संदेश सांगून पैसा मिळवत नाही’ याचा हा ठोस पुरावा आहे. (२ करिंथ. २:१७ सुबोध भाषांतर) तसेच, आपण जगापासून वेगळे आहोत हे देखील सिद्ध होते.—योहा. १७:१४.
१० लवकरच मोठ्या बाबेलचा नाश होणार म्हटल्यावर आज सर्व धार्मिक घटकांवर चहुकडून दबाव येत आहे. पण, काहीही झाले तरी जगभरात राज्य प्रचाराचे आपले महत्त्वपूर्ण कार्य पुढे चालू ठेवून अनेकानेक लोकांना तारणप्राप्तीच्या मार्गावर आणण्याच्या कार्यावर आपण आपले लक्ष केंद्रित करू या.—मत्त. २४:१४; रोम. १०:१३, १४.