आपण पुन्हा करणार का?—सहायक पायनियरांसाठी आणखीन एक आवाहन
१ आपण पुन्हा काय करणार? स्मारकविधीच्या काळादरम्यान आपण सहायक पायनियरींग करणार का? फेब्रुवारी १९९७ ची आमची राज्य सेवा पुरवणीतील “पाहिजेत—४,००० सहायक पायनियर” या ठळक शीर्षकाने आपले लक्ष वेधून घेतले होते. तुम्ही ही बाब मनावर घ्याल याबद्दल आम्ही विश्वस्त होतो. मोजणी केल्यानंतर, जवळजवळ ४,२५० प्रचारकांनी मार्च, एप्रिल किंवा मे यांपैकी निदान एका महिन्यात तरी सहायक पायनियर या नात्याने सेवा केली होती हे जाणून आम्ही आनंदून गेलो. केवळ एप्रिल १९९७ मध्ये, चक्क २,०९३ जणांनी सहायक पायनियर सेवेसाठी आपले नाव नोंदविले होते! या संख्येत आपण त्या महिन्यातील ७९७ नियमित पायनियरांची व २८८ खास पायनियरांची भर घातल्यास एकूण प्रचारकांपैकी १८ टक्क्यांहून अधिक प्रचारक पायनियर सेवेत असल्याचे आपल्याला आढळते. यंदाच्या स्मारकविधी काळादरम्यान आपण पुन्हा करणार का?
२ मागील वर्षी आपले क्षेत्र सेवेतील कार्य वाढविण्यात नेहमीपेक्षा अधिक प्रयास केलेल्या सर्वांची आम्ही मनःपूर्वक प्रशंसा करतो. तुम्ही सर्व, यहोवा देवावरील तसेच तुमच्या शेजाऱ्यावरील निःस्वार्थ प्रीतीने उत्तेजित झाला होता हे स्पष्ट आहे. (लूक १०:२७; २ पेत्र १:५-८) जीवनात भिन्न परिस्थिती असलेल्या प्रचारकांनी सहायक पायनियरींग करता यावे म्हणून आपल्या जीवनात आवश्यक बदल केले. एका मंडळीत तर त्या एकाच महिन्यात ५१ प्रचारकांनी एकजुटीने पायनियर सेवा केली; यांत अनेक वडील तसेच पायनियरींग करता यावे म्हणून आपली नोकरी सोडून अर्ध-वेळेची नोकरी पत्करलेली एक बहीण, १५ महिन्यांच्या तान्ह्या मुलीची आई आणि यापूर्वी कधीच पायनियरींगचा अनुभव न घेतलेली एक वृद्ध बहीण देखील होती. विभागीय पर्यवेक्षकांनी लिहिले: “प्रचाराच्या कार्यामध्ये जोरदार प्रयत्न केले जात आहेत. . . . यामुळे केवळ क्षेत्रावरच प्रभाव पडतो असे नाही, तर मंडळ्या देखील आवेशी होत आहेत. एकमेकांना अधिक चांगले जाणून घेण्यात तसेच सेवेतील उत्तम परिणाम पाहून बांधव सुखावत आहेत.”
३ यामध्ये युवकांचाही वाटा आहे. बाप्तिस्मा न झालेली एक १३ वर्षीय प्रचारक त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती जेव्हा यहोवाला केलेल्या आपल्या समर्पणाचे प्रतीक म्हणून ती बाप्तिस्मा घेऊ शकेल. फेब्रुवारी महिन्यात बाप्तिस्मा घेतल्यानंतर तिने, मार्च महिन्यात सहायक पायनियरींग करण्याची आपली इच्छा पुढील शब्दांत व्यक्त केली: “आता कोणतीच अडचण नसल्यामुळं मी लागलीच अर्ज केलाय. . . . पायनियरींग करण्याचं हे प्रेमळ आमंत्रण तुम्ही दिलं नसतं तर आम्हाला आलेले अद्भुत अनुभव कधीच वास्तवात उतरले नसते. प्रतिसाद दिलेल्या . . . लोकांमध्ये असण्याचा विशेषाधिकार मला दिल्यामुळे मी यहोवाची आभारी आहे.” तिने ते पुन्हा करण्याचे ध्येय राखले आहे.
४ कदाचित तुम्ही, मागच्या वर्षी मार्च महिन्यातील त्या १,७१५ जणांपैकी, एप्रिल महिन्यातील २,०९३ जणांपैकी किंवा मे महिन्यातील १,५३२ जणांपैकी होता ज्यांनी सहायक पायनियर सेवेत सहभाग घेतला होता. या वर्षी तुम्ही पुन्हा पायनियरींग करणार का? मागील उन्हाळ्यात तुम्ही जर पायनियरींग करू शकला नाहीत, तर या वर्षी तुम्हाला ते जमेल का? आपण २,०९३ ची संख्या ओलांडू शकतो का? भारतात, एप्रिल महिन्यात सहायक पायनियरींग केलेल्यांची संख्या ही एक विक्रमी संख्या होती.
५ एप्रिल आणि मे महिन्यांवर लक्ष द्या: या वर्षी स्मारकविधीची तारीख शनिवार, एप्रिल ११ रोजी येते; त्यामुळे सेवेतील कार्य वाढविण्यासाठी एप्रिल हा एक सर्वोत्तम महिना ठरतो. (२ करिंथ. ५:१४, १५) महिन्याच्या पहिल्या ११ दिवसांदरम्यान होता होईल तितक्यांना स्मारकविधीस उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्याकडे आपण लक्ष देणार आहोत. तुम्ही सहायक पायनियरींग करण्याची योजना करत असल्यास कृपया, तुम्ही सुरू करू इच्छिता त्या तारखेच्या पुरेशा वेळेआधी आपले अर्ज सादर करा.—१ करिंथ. १४:४०.
६ मे महिन्यात पाच सप्ताहांत असल्यामुळे पूर्ण-वेळेची नोकरी करणाऱ्या प्रचारकांना या महिन्यात सहायक पायनियरींग करणे सोपे वाटेल. शिवाय, मे महिन्यात बहुतांश मुलांना देखील सुट्ट्या असतील. पाच सप्ताहांतांपैकी प्रत्येक सप्ताहांती १० तास भरून काढण्याचे नियोजन केल्यास, ६० तासांचा आवश्यक कोटा पूर्ण करण्यासाठी त्या महिन्यात तुम्हाला केवळ आणखीन १० तास भरून काढण्याचे नियोजन करावे लागेल.
७ साहित्य सादरता म्हणून एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांत आपण टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांच्या वर्गण्या सादर करणार आहोत. कदाचित, यामुळे आणखीनही बऱ्याच जणांना थोडासा अधिक प्रयास करून पायनियरींग करण्याचे उत्तेजन मिळेल. आपण असे का म्हणतो बरे? कारण नियतकालिके सादर करणे अगदी सोपे असून सेवेत त्यांचा उपयोग करणे सुखकारक ठरते. सेवेच्या सर्वच पैलूंत—घरोघरचे आणि दुकाना-दुकानातील कार्य करताना तसेच रस्त्यावर, पार्कींगच्या क्षेत्रांत, उद्यानांत आणि इतर अनौपचारिक परिस्थितींत लोकांशी संभाषण सुरू करताना यांचा उचितपणे उपयोग केला जाऊ शकतो. सर्वात मुख्य म्हणजे, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! राज्य सत्यांचे समर्थक आहेत. ही नियतकालिके बायबल भविष्यवादांच्या पूर्णतेकडे लक्ष वेधतात आणि त्यावरून देवाचे राज्य शासन करत असल्याचे सिद्ध करतात. लोकांच्या खऱ्या गरजा समजदारीने हाताळून ते वाचकांच्या जीवनास स्पर्श करून जातात. या बहुमूल्य नियतकालिकांनी आपल्या स्वतःच्या जीवनास कसा स्पर्श केला याचा विचार केल्यास एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये यांचे सर्वाधिक प्रमाणात वितरण करण्याची आपल्याला प्रेरणा मिळेल.
८ या जोरदार नियतकालिक कार्यासाठी तयारी करताना पुढील लेख नजरेखालून घालणे लाभदायक ठरेल: “द वॉचटावर व अवेक!—सत्याची समयोचित नियतकालिके” (जानेवारी १, १९९४, टेहळणी बुरूज), “आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा” (जानेवारी १९९६ आमची राज्य सेवा), आणि “तुमची स्वतःची नियतकालिक प्रस्तुती तयार करा” (ऑक्टोबर १९९६ आमची राज्य सेवा).
९ वडिलांनो पुढाकार घ्या: मागच्या उन्हाळ्यात पायनियरींग करणाऱ्या अनेकानेक प्रचारकांच्या सोईसाठी एका मंडळीतील वडिलांनी सबंध मंडळीकरिता सेवा कार्याचा एक खास दिवस म्हणून महिन्यातला एक शनिवार राखून ठेवला. त्या दिवशी, अनेक निरनिराळ्या समयी भेटण्याच्या व्यवस्था केल्या गेल्या होत्या जेणेकरून मंडळीतील सर्वांना साक्षकार्याच्या विविध पैलूंत सहभाग घेण्याची संधी लाभली. यांत व्यापारी क्षेत्र उरकणे, रस्त्यावर साक्षकार्य करणे, घरोघर प्रचार करणे, पुनर्भेटी करणे, पत्रे लिहिणे आणि टेलिफोनद्वारे साक्ष देणे संमिलित होते. त्यांच्या या योजनेला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला कारण दिवसभरात ११७ प्रचारकांनी क्षेत्र सेवेत सहभाग घेतला. त्या सगळ्यांनी मिळून ५२१ तास सेवेत घालवले आणि ६१७ नियतकालिके, माहितीपत्रके आणि पुस्तकांचे वाटप केले! त्या शनिवारचा उत्साह रविवारी देखील दिसून आला जेव्हा जाहीर सभेची आणि टेहळणी बुरूज अभ्यासाला विक्रमी उपस्थिती होती.
१० एप्रिल आणि मे या महिन्यांमधील प्रत्येक सेवा सभेत पुढील सप्ताहाच्या क्षेत्र सेवा सभा केव्हा आणि कोठे भरविल्या जातील याची मंडळीला आठवण करून दिली जावी; विशेषतः, नेहमीच्या व्यवस्थांखेरीज काही अतिरिक्त व्यवस्था केल्या गेल्या असल्यास असे आवर्जून करावे. नियमित पायनियरांना तसेच सहायक पायनियरींग न करणाऱ्या प्रचारकांना उत्तेजन देण्यात येते, की त्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार या गट व्यवस्थांना पाठबळ द्यावे.
११ वारंवार प्रचार न झालेली क्षेत्रे उरकण्याच्या व्यवस्था करण्यासाठी सेवा पर्यवेक्षकाला क्षेत्र वाटून देणाऱ्या बांधवाची भेट घ्यावी लागेल. घरी नसलेल्यांवर, तसेच रस्त्यांवर आणि दुकाना-दुकानांत साक्षकार्य करण्यावर अधिक लक्ष दिले जाईल. विशेषतः, या महिन्यांत दिवस मोठा असल्यामुळे संध्याकाळच्या साक्षकार्यावर भर दिला जाऊ शकतो. हे जोरदार कार्य लक्षात घेऊन एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांसाठी नियतकालिकांच्या पुरेशा साठ्याची मागणी केली जावी.
१२ अनेक प्रचारक पात्र ठरू शकतात: सहायक पायनियर अर्जावरील पहिलेच वाक्य असे म्हणते: “यहोवावरील माझ्या प्रेमामुळे, तसेच त्याच्याबद्दल आणि त्याच्या प्रेमळ उद्देशांबद्दल शिकून घेण्यास इतरांना मदत करण्याच्या तीव्र इच्छेमुळे मी एक सहायक पायनियर म्हणून आपले नाव नोंदवून क्षेत्र सेवेतील माझा सहभाग वाढवू इच्छितो/इच्छिते.” यहोवावर प्रेम करणे आणि आध्यात्मिकरित्या इतरांना मदत करणे, आपल्या समर्पणाचा मूलाधार आहे. (१ तीम. ४:८, १०) सहायक पायनियरींगसाठी पात्र ठरावयाचे असल्यास एखाद्याचा बाप्तिस्मा झालेला असावा, त्याचे नैतिक आचरण उत्तम असावे शिवाय महिन्याभरात त्याला सेवेचे ६० तास भरून काढता यावेत. आपण सर्वजण आपापल्या परिस्थितींचे विश्लेषण करतो तेव्हा आपल्यापैकी ज्या काहींनी पूर्वी कधीच पायनियरींग केले नसेल, ते या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत करू शकतील का?
१३ मंडळ्यांतील अनेक जण, आपल्यासारखीच परिस्थिती असलेल्या इतरांना पायनियरींगसाठी नाव नोंदवताना पाहतात तेव्हा आपल्यालाही ते जमू शकते असे कदाचित त्यांना वाटेल. शाळेला जाणारी मुले, वयस्कर लोक, पूर्ण-वेळेची नोकरी करणारे तसेच वडील आणि सेवा सेवक व इतरांनीही यशस्वीरित्या सहायक पायनियरींग केले आहे! घरचे काम सांभाळून पूर्ण-वेळेची नोकरी करणाऱ्या एका दोन मुलांच्या आईने सहायक पायनियरींग केले, त्या एका महिन्यात ६० तास भरून काढले, १०८ नियतकालिकांचे वाटप केले आणि ३ बायबल अभ्यास सुरू केले. तिला हे कसे जमले बरे? तिने जेवणाच्या सुटीतील एका तासात जवळच्याच क्षेत्रात कार्य केले, पत्रे लिहून साक्षकार्य केले आणि वाहनतळांवर तसेच रस्त्यांवरही साक्षकार्य केले. तसेच साप्ताहिक सुटीच्या दिवशी क्षेत्र सेवेत मंडळीसोबत सहभाग घेऊन तिने या दिवसाचा सदुपयोग केला. सुरवातीला, सहायक पायनियरींग एक असाध्य ध्येय आहे असे तिला वाटले होते तरी इतरांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे तसेच एक व्यावहारिक आराखडा तयार केल्यामुळे अडचणींवर मात करता आली.
१४ येशूने आपल्या शिष्यांना असे आश्वासन दिले: “माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्त. ११:३०) हे, ऑगस्ट १५, १९९५, टेहळणी बुरूज नियतकालिकातील एका उत्तेजनात्मक लेखाचे शीर्षक होते. त्यामध्ये, थकवणारी पूर्ण-वेळेची नोकरी करणाऱ्या एका बहिणीविषयी सांगितले होते. आपल्याच्याने सहायक पायनियरींग कधीच होणार नाही असा तिने विचार केला का? नाही. उलट, प्रत्येक महिना सहायक पायनियरींग करणे तिला जमले. का? कारण तिला असे वाटले, की पायनियरींगने खरे तर संतुलन राखण्यास तिला मदत केली. बायबलचे सत्य शिकून घेण्यात लोकांना साहाय्य करणे आणि देवाचा अनुग्रह संपादन करण्याच्या हेतूने त्यांना आपल्या जीवनांत परिवर्तन करताना पाहणे हा तिच्या धकाधकीच्या जीवनात हर्षाचा सर्वात मोठा स्रोत होता.—नीति. १०:२२.
१५ पायनियरींग करण्यासाठी एखाद्याला वैयक्तिक त्याग आणि फेरबदल करण्याची आवश्यकता असली तरीसुद्धा त्यातून मिळणारे आशीर्वाद अप्रतिमच असतात. सहायक पायनियरींगच्या आपल्या अनुभवाबद्दल एका बहिणीने लिहिले: “स्वतःचाच विचार करत बसण्याऐवजी इतरांना साहाय्य करण्यास मला मदत मिळाली. . . . मी तर म्हणते, ज्यांना कुणाला शक्य असेल त्या सर्वांनी ते करून पाहावं.”
१६ त्यासाठी एक चांगला आराखडा हवा: या पुरवणीच्या शेवटच्या पृष्ठावर, फेब्रुवारी १९९७ ची आमची राज्य सेवा यात आढळणारे आराखड्यांचे नमुने दिलेले आहेत. कदाचित यांपैकी एक, तुमच्या परिस्थितीशी जुळणारा असेल. यांची उजळणी करताना तुमचा महिन्याभराचा नित्यक्रम विचारात घ्या. घरातली कोणती कामे पायनियरींग सुरू करण्याआधी उरकली जाऊ शकतात किंवा तात्पुरती बाजूला सारून नंतर हाताळली जाऊ शकतात? करमणूक, मनोरंजन किंवा विरंगुळ्याच्या इतर प्रकारांत घालवत असलेल्या वेळात तुम्ही कपात करू शकता का? आवश्यक असणाऱ्या एकूण ६० तासांचा विचार करण्याऐवजी दैनंदिन किंवा साप्ताहिक आराखडा तयार करा. सहायक पायनियरींग करण्यासाठी दर दिवशी केवळ २ तास किंवा दर आठवडी १५ तासांची गरज आहे. दिलेले आराखड्यांचे नमुने पाहा आणि पेन्सिल घेऊन, तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला कोणता वैयक्तिक सेवा आराखडा सोईस्कर असेल ते ठरवा.
१७ मागील वर्षी मंडळीने सेवेस दिलेला उत्तम प्रतिसाद व अतिरिक्त पाठिंब्यामुळे एका नियमित पायनियरचा उत्साह आणखीन वाढला; तिने लिहिले: “सहायक पायनियरींगला पाठिंबा मिळावा म्हणून अतिरिक्त प्रयास करण्याच्या तुमच्या प्रेमळ उत्तेजनासाठी मनस्वी आभारी. . . . तुम्ही सुचवलेल्या आराखड्यांनी, पूर्वी कधीच पायनियरींग न केलेल्या अनेकांना हे पाहण्यास मदत केली की ते देखील पायनियरींग करू शकतात. . . . यहोवाच्या संस्थेचा भाग असण्यास आणि विश्वासू आणि बुद्धिमान दासाच्या प्रेमळ नेतृत्वाचे अनुसरण करण्यास मी किती आनंदी आहे.”
१८ नीतिसूत्रे २१:५ आश्वासन देते: “उद्योग्याचे विचार समृद्धि करणारे असतात.” नीतिसूत्रे १६:३ असे प्रोत्साहन देते: “आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील.” होय, प्रार्थनेद्वारे यहोवाला आपल्या निर्णयात भागीदार केल्याने आणि यशस्वी होण्यास मदत मिळावी म्हणून सर्वार्थाने त्याच्यावर विसंबून राहिल्याने सहायक पायनियरींग करण्याच्या आपल्या योजनांबद्दल आपण सकारात्मक असू शकतो. कदाचित असेही होईल, की एखाददोन महिने आपला आराखडा कसा यशस्वी होतो याचे विश्लेषण केल्यानंतर सहायक पायनियरींगच्या अर्जावर असलेल्या त्या चौकटीत आपण खूण करू शकतो जेथे म्हटले आहे: “पुढील सूचना मिळेपर्यंत, तुम्ही अखंडपणे सहायक पायनियरींग करू इच्छित असल्यास येथे खूण करा.” परिस्थिती काहीही असो, आपण पुन्हा एकदा पाच सप्ताहांत असलेल्या ऑगस्ट महिन्यात पायनियरींग करण्याची आस धरू शकतो. ऑगस्ट महिन्यात सेवा वर्षाचा अंत होत असताना, प्रत्येकाला होता होईल तितक्या अधिक प्रमाणात सेवेत सहभाग घेण्याच्या उद्देशाने एकजुटीने प्रयत्न केले जातील.
१९ येशूने भाकीत केले: “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करितो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराहि करील, आणि त्यापेक्षा मोठी करील.” (योहा. १४:१२) या भविष्यवाणीची भव्य पूर्णता होत असताना देवाचे सहकारी या नात्याने सेवा करणे हा आपला एक सुखद विशेषाधिकार आहे. या कार्यासाठी संधी साधून एका अभूतपूर्व जोमाने सुवार्तेचा प्रचार करण्याची हीच वेळ आहे. (१ करिंथ. ३:९; कलस्सै. ४:५) शक्य तितक्या अधिक वेळा सहायक पायनियर सेवेत सहभाग घेणे, हा राज्याचे उद्घोषक या नात्याने आपला कार्यभाग पूर्ण करण्याचा सर्वोत्तम मार्ग होय. स्मारकविधीच्या काळादरम्यान सहायक पायनियरांच्या मुखी होणारे स्तुतीरूपी गायनवादन किती भव्यदिव्य असेल हे पाहण्यास आम्ही आतूर आहोत. (स्तोत्र २७:६) मागील वसंत ऋतूत निष्पन्न झालेल्या परिणामांचा विचार करता, ‘आपण पुन्हा करणार का?’ असा विचार येतो. आम्हाला खात्री आहे की आपण जरूर करू शकू!
तुम्ही सहायक पायनियरींग करू शकता का?
“तुम्ही बाप्तिस्मा झालेले आहात, चांगल्या नैतिक भूमिकेत आहात, तर क्षेत्रकार्यात ६० तासांचे ध्येय पूर्ण करण्याची व्यवस्था करू शकता आणि एक किंवा अधिक महिने सहायक पायनियर म्हणून सेवा करू शकता; सेवेच्या या विशेषाधिकाराकरता मंडळीच्या वडिलांना तुमच्या अर्जाचा विचार करायला आवडेल.”—आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित, पृष्ठ ११४.
[६ पानांवरील चौकट]
सहायक पायनियर वेळापत्रके
प्रत्येक आठवडी १५ तास प्रचारकार्य करावयाचा नमुना आराखडा
सोमवार ते शनिवार—सकाळी
रविवारच्या ऐवजी इतर कोणताही दिवस
दिवस समय तास
सोमवार सकाळ २ १/२
मंगळवार सकाळ २ १/२
बुधवार सकाळ २ १/२
गुरुवार सकाळ २ १/२
शुक्रवार सकाळ २ १/२
शनिवार सकाळ २ १/२
एकूण तास: १५
दोन पूर्ण दिवस
आठवड्यातील कोणतेही दोन दिवस निवडता येतील
दिवस समय तास
बुधवार पूर्ण दिवस ७ १/२
शनिवार पूर्ण दिवस ७ १/२
एकूण तास: १५
दोन सायंकाळ आणि सप्ताहांत
आठवड्यातील कोणत्याही दोन सायंकाळ निवडता येतील
दिवस समय तास
सोमवार सायंकाळ १ १/२
बुधवार सायंकाळ १ १/२
शनिवार पूर्ण दिवस ८
रविवार अर्धा दिवस ४
एकूण तास: १५
आठवड्यातील दुपार व शनिवार
रविवारच्या ऐवजी इतर कोणताही दिवस
दिवस समय तास
सोमवार दुपार २
मंगळवार दुपार २
बुधवार दुपार २
गुरुवार दुपार २
शुक्रवार दुपार २
शनिवार पूर्ण दिवस ५
एकूण तास: १५
माझे व्यक्तिगत सेवा वेळापत्रक
प्रत्येक समयी किती तास करणार ते ठरवा
दिवस समय तास
सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार
शुक्रवार
शनिवार
रविवार
एकूण तास: १५