सोमवार, २८ जुलै
जो तुमच्यासोबत ऐक्यात आहे, तो जगासोबत ऐक्यात असणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.—१ योहा. ४:४.
तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा भविष्यात सैतानाचा नाश केल्यावर यहोवा आपल्यासाठी काय करणार आहे, यावर मनन करा. याबद्दल २०१४ च्या प्रांतीय अधिवेशनात एक प्रात्यक्षिक दाखवलं होतं. त्यात एका वडिलांनी आपल्या कुटुंबासोबत चर्चा केली होती. आणि चर्चेत २ तीमथ्य ३:१-५ या वचनांत नंदनवनाबद्दल जर सांगितलं असतं तर त्यातले शब्द कसे असते ते बोलून दाखवलं होतं. ते म्हणाले होते: “नवीन जगात आनंदच आनंद असेल. कारण तेव्हा माणसं इतरांवर प्रेम करणारी आणि आध्यात्मिक गोष्टींवर प्रेम करणारी, मर्यादा असलेली, नम्र, देवाचा गौरव करणारी, आईवडिलांचं ऐकणारी, उपकारांची जाणीव ठेवणारी, एकनिष्ठ, कुटुंबासाठी माया ममता असलेली, एकमेकांशी सहमत असलेली, इतरांबद्दल चांगलं बोलणारी, संयमी, सौम्य, चांगल्याबद्दल प्रेम असणारी, भरवशालायक, ऐकून घेणारी, मनाने लीन असलेली, चैनीच्या गोष्टींची आवड धरण्यापेक्षा देवावर प्रेम करणारी, देवाची भक्ती करण्याचा फक्त दिखावा न करता त्याची मनापासून भक्ती करणारी असतील. अशा लोकांसोबत मिळून राहा.” नवीन जग कसं असेल याबद्दल तुम्ही आपल्या कुटुंबातल्या लोकांशी किंवा भाऊबहिणींशी चर्चा करता का? टेहळणी बुरूज२४.०१ ६¶१३-१४
मंगळवार, २९ जुलै
तू माझं मन आनंदित केलं आहेस.—लूक ३:२२.
यहोवाची त्याच्या लोकांना एक गट या नात्याने स्वीकृती आहे या गोष्टीम़ुळे आपल्याला किती उत्तेजन मिळतं! बायबल म्हणतं: “यहोवाला आपले लोक प्रिय आहेत.” (स्तो. १४९:४) पण कधीकधी काही लोक इतके निराश होऊ शकतात की ‘यहोवा माझ्यावर खूश आहे का?’ अशी शंका त्यांना वाटू शकते. बायबल काळातल्या यहोवाच्या काही विश्वासू सेवकांनासुद्धा असंच वाटलं होतं. (१ शमु. १:६-१०; ईयो. २९:२, ४; स्तो. ५१:११) बायबल स्पष्टपणे दाखवतं, की आपण अपरिपूर्ण असलो तरी आपण यहोवाचं मन आनंदी करू शकतो आणि त्याच्या नजरेत एक चांगलं नाव कमावू शकतो. कसं? त्यासाठी आपण येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतला पाहिजे. (योहा. ३:१६) अशा प्रकारे सर्वांसमोर बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपण हे दाखवत असतो, की आपण आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केलाय आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी त्याला वचन दिलंय. (प्रे. कार्यं २:३८; ३:१९) आपण जेव्हा त्याच्यासोबत नातं जोडण्यासाठी अशा प्रकारे पाऊल उचलतो, तेव्हा यहोवाला आनंद होतो. आणि आपण जर आपल्या समर्पणाच्या वचनाप्रमाणे जगत राहिलो तर यहोवा आपल्यावर खूश होईल आणि आपल्याला त्याचे जवळचे मित्र समजेल.—स्तो. २५:१४. टेहळणी बुरूज२४.०३ २६ ¶१-२
बुधवार, ३० जुलै
ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.—प्रे. कार्यं ४:२०.
सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्याला प्रचारकार्य बंद करायला सांगितलं तरी प्रचारकार्य करत राहून आपण शिष्यांचं अनुकरण करू शकतो. आपणसुद्धा अशी खातरी बाळगू शकतो की यहोवा आपल्याला सेवाकार्य करत राहण्यासाठी मदत करेल. आपणही धैर्य आणि बुद्धीसाठी यहोवाला प्रार्थना करू शकतो. तसंच, समस्यांचा सामना करण्यासाठी आपण यहोवाकडे मदत मागू शकतो. आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. कोणाला आजाराचा तर कोणाला भावनिक समस्यांचा. काहींच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, कोणाला कौटुंबिक समस्या आहेत, तर कोणाला छळ किंवा इतर काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यातच महामाऱ्या आणि युद्धं यांमुळे या समस्यांचा सामना करणं आणखीनच कठीण झालं आहे. पण अशा वेळी यहोवाजवळ आपलं मन मोकळं करा. एखाद्या जवळच्या मित्राला जसं तुम्ही सांगाल तसं तुमच्या परिस्थितीबद्दल सगळं काही यहोवाला सांगा. आणि याची खातरी बाळगा की ‘तो तुमच्या वतीने कार्य करेल.’ (स्तो. ३७:३, ५) आपण जर यहोवाला प्रार्थना करत राहिलो तर “संकटात धीर” धरायला आपल्याला मदत होईल. (रोम. १२:१२) आपले सेवक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे यहोवाला माहीत आहे आणि ‘तो त्यांच्या मदतीची याचना’ ऐकतो.—स्तो. १४५:१८, १९. टेहळणी बुरूज२३.०५ ५-६ ¶१२-१५