तीमथ्य याला दुसरं पत्र
४ मी तुला देवासमोर आणि जो प्रकट होऊन+ आपल्या राज्याद्वारे+ जिवंतांचा आणि मेलेल्यांचा+ न्याय करणार आहे,+ त्या ख्रिस्त येशूसमोर असा आदेश देतो: २ वचनाची घोषणा कर;+ काळाची गरज ओळखून चांगल्या आणि वाईट दोन्ही काळांत आवेशाने हे काम कर; पूर्ण सहनशीलतेने आणि कुशलतेने शिकवत असताना+ चूक करणाऱ्याचं ताडन कर,+ त्याला ताकीद आणि प्रोत्साहन दे. ३ कारण असा एक काळ येईल, जेव्हा ते फायदेकारक* शिक्षण नाकारतील.+ उलट, त्यांना ऐकायच्या आहेत अशाच गोष्टी ऐकण्यासाठी,* ते स्वतःच्या इच्छांप्रमाणे आपल्याभोवती शिक्षक गोळा करतील.+ ४ ते सत्याकडे पाठ फिरवतील आणि काल्पनिक कहाण्यांकडे लक्ष देतील. ५ तू मात्र सगळ्या बाबतींत सावध राहा, संकटात धीर धर,+ प्रचारकाचं काम कर* आणि आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण कर.+
६ कारण मला पेयार्पणासारखं ओतलं जात आहे+ आणि माझ्या सुटकेची वेळ अगदी जवळ आली आहे.+ ७ मी चांगल्या उद्देशासाठी असलेली लढाई लढलो आहे;+ मी धाव पूर्ण केली आहे+ आणि विश्वास टिकवून ठेवला आहे. ८ आता यापुढे माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट राखून ठेवण्यात आला आहे;+ प्रभू म्हणजेच नीतिमान न्यायाधीश+ त्या दिवशी तो मुकुट मला बक्षीस म्हणून देईल;+ आणि फक्त मलाच नाही, तर जे आतुरतेने त्याच्या प्रकट होण्याची वाट पाहतात त्या सगळ्यांना तो देईल.
९ माझ्याकडे लवकरात लवकर यायचा प्रयत्न कर. १० कारण देमासला+ सध्याच्या जगाच्या व्यवस्थेची* ओढ असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकाला गेला आहे. क्रेस्केस हा गलतीयाला आणि तीत दालमतियाला गेला आहे. ११ फक्त लूक माझ्याबरोबर आहे. येताना मार्कला आपल्यासोबत घेऊन ये, कारण सेवाकार्यात मला त्याची खूप मदत होईल. १२ पण तुखिकला+ मी इफिसला पाठवून दिलं आहे. १३ तू येशील तेव्हा, मी त्रोवसमध्ये कार्प याच्याजवळ ठेवलेला माझा झगा घेऊन ये. तसंच, गुंडाळ्या आणि खासकरून चर्मपत्रंही* घेऊन ये.
१४ तांब्याची कामं करणारा आलेक्सांद्र याने मला खूप त्रास दिला आहे. यहोवा* त्याच्या कृत्यांप्रमाणे त्याची परतफेड करेल.+ १५ तूही त्याच्यापासून सांभाळून राहा, कारण त्याने आपल्या संदेशाचा खूप विरोध केला आहे.
१६ माझ्या पहिल्या सुनावणीच्या वेळी, माझी बाजू घेण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. उलट, सगळे मला सोडून गेले; मी प्रार्थना करतो, की याबद्दल देवाने त्यांना जबाबदार धरू नये. १७ पण, प्रभू माझ्याजवळ उभा राहिला आणि माझ्याद्वारे संदेशाचा पूर्णपणे प्रचार केला जावा आणि सर्व राष्ट्रांना तो ऐकायला मिळावा,+ म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि सिंहाच्या जबड्यातून माझी सुटका केली.+ १८ प्रभू प्रत्येक दुष्ट कार्यापासून माझी सुटका करेल आणि आपल्या स्वर्गीय राज्यासाठी माझा बचाव करेल.+ त्यालाच सदासर्वकाळ गौरव मिळो. आमेन.
१९ प्रिस्का आणि अक्विल्ला,+ तसंच अनेसिफरचं घराणं+ यांना माझा नमस्कार सांग.
२० एरास्त+ करिंथमध्येच राहिला, पण, त्रफिम+ आजारी असल्यामुळे मी त्याला मिलेतामध्ये ठेवून आलो. २१ हिवाळ्याच्या आधी इथे यायचा होईल तितका प्रयत्न कर.
यूबूल आणि पुदेस; लीन आणि क्लौदिया तसंच, सगळे बांधव तुला नमस्कार सांगतात.
२२ तू दाखवत असलेल्या योग्य मनोवृत्तीमुळे प्रभू तुझ्यासोबत असो. त्याची अपार कृपा तुझ्यावर असो.