मत्तयने सांगितलेला संदेश
२७ सकाळ झाल्यावर, सगळे मुख्य याजक आणि वडीलजन यांनी येशूला ठार मारण्यासाठी आपसात चर्चा केली.+ २ मग ते त्याला बांधून तिथून घेऊन गेले आणि त्यांनी त्याला राज्यपाल पिलात याच्या हवाली केलं.+
३ येशूला मृत्युदंड सुनावण्यात आला आहे, हे पाहून त्याचा विश्वासघात करणाऱ्या यहूदाचं मन त्याला खाऊ लागलं आणि तो त्याला दिलेली चांदीची ३० नाणी घेऊन मुख्य याजक आणि वडीलजनांकडे गेला,+ ४ आणि म्हणाला: “मी एका निर्दोष माणसाच्या रक्ताचा सौदा करून पाप केलंय.” पण ते त्याला म्हणाले: “आमचं त्याच्याशी काय घेणं-देणं? तुझं तूच बघ!”* ५ तेव्हा त्याने ती चांदीची नाणी मंदिरात फेकून दिली आणि जाऊन गळफास घेतला.+ ६ पण मुख्य याजक ती चांदीची नाणी घेऊन म्हणाले: “हे पैसे मंदिराच्या खजिन्यात टाकणं योग्य नाही, कारण हे रक्ताचं मोल आहे.” ७ मग आपसात चर्चा करून त्यांनी त्या पैशांनी परक्यांना पुरण्यासाठी कुंभाराचं शेत विकत घेतलं. ८ म्हणून त्या शेताला आजपर्यंत ‘रक्ताचं शेत’ असं म्हणतात.+ ९ तेव्हा यिर्मया संदेष्ट्याद्वारे जे सांगण्यात आलं होतं ते पूर्ण झालं: “त्यांनी त्या माणसासाठी ठरवण्यात आलेली किंमत, म्हणजे चांदीची ती ३० नाणी घेतली; इस्राएलच्या मुलांपैकी काहींनी त्याच्या जिवासाठी ठरवलेली ही किंमत होती १० आणि यहोवाने* मला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे पैसे देऊन कुंभाराचं शेत विकत घेतलं.”+
११ येशू राज्यपालासमोर उभा होता तेव्हा राज्यपालाने त्याला विचारलं: “तू यहुद्यांचा राजा आहेस का?” येशू त्याला म्हणाला: “तुम्ही स्वतःच तसं म्हणत आहात.”+ १२ पण मुख्य याजक आणि वडीलजन त्याच्यावर आरोप लावत होते, तेव्हा त्याने काहीच उत्तर दिलं नाही.+ १३ म्हणून पिलात त्याला म्हणाला: “ते तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देत आहेत हे तू ऐकत नाहीस का?” १४ पण त्याने त्याला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. तेव्हा राज्यपालाला फार आश्चर्य वाटलं.
१५ दरवर्षी त्या सणाच्या वेळी, लोकांच्या इच्छेप्रमाणे, कोणत्याही एका कैद्याची सुटका करण्याची राज्यपालाची रीत होती.+ १६ त्या वेळी, बरब्बा नावाचा एक कुख्यात कैदी तुरुंगात होता. १७ म्हणून, लोक जमलेले असताना पिलात त्यांना म्हणाला: “मी कोणाची सुटका करावी अशी तुमची इच्छा आहे, बरब्बाची की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूची?” १८ कारण त्यांनी द्वेषामुळे येशूला पकडून दिलं होतं हे पिलातला माहीत होतं. १९ शिवाय, तो न्यायासनावर बसलेला असताना त्याच्या बायकोने त्याला असा निरोप पाठवला, की “त्या सज्जन माणसाच्या प्रकरणात पडू नकोस, कारण आज मला त्याच्याबद्दल एक स्वप्न पडून खूप त्रास झाला.” २० पण मुख्य याजकांनी आणि वडिलांनी लोकांना असं पटवून दिलं, की त्यांनी बरब्बाच्या सुटकेची+ आणि येशूला मृत्युदंड सुनावण्याची मागणी करावी.+ २१ राज्यपालाने पुन्हा एकदा त्यांना विचारलं: “दोघांपैकी मी कोणाची सुटका करावी अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले: “बरब्बाची.” २२ पिलात त्यांना म्हणाला: “मग ख्रिस्त म्हटलेल्या येशूचं मी काय करावं?” तेव्हा ते सगळे म्हणाले: “त्याला वधस्तंभावर* खिळा!”*+ २३ तो म्हणाला: “पण, का? त्याने कोणतं वाईट काम केलंय?” तेव्हा ते आणखी जास्त ओरडू लागले: “त्याला वधस्तंभावर खिळा!”+
२४ लोकांवर काहीच परिणाम होत नाही, उलट गोंधळ वाढतच चालला आहे हे पाहून पिलातने पाणी घेऊन सगळ्या लोकांसमोर आपले हात धुतले आणि तो म्हणाला: “मी या माणसाच्या रक्तापासून निर्दोष आहे. तुम्हीच याला जबाबदार आहात.” २५ तेव्हा सगळ्या लोकांनी उत्तर दिलं: “त्याच्या रक्ताचा दोष आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो.”+ २६ मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याने बरब्बाची सुटका केली, पण येशूला चाबकाचे फटके मारून+ वधस्तंभावर खिळण्यासाठी सैनिकांच्या हाती दिलं.+
२७ मग सैनिकांनी येशूला राज्यपालाच्या भवनात नेलं आणि इतर सगळ्या सैनिकांना त्याच्याभोवती जमवलं.+ २८ त्यांनी त्याचे कपडे उतरवून त्याला एक गडद लाल रंगाचं वस्त्र घातलं.+ २९ आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्यांनी तो त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याच्या उजव्या हातात वेताची एक काठी दिली. मग त्याच्यासमोर गुडघे टेकून ते असं म्हणून त्याची थट्टा करू लागले: “यहुद्यांच्या राजाचा जयजयकार असो!”* ३० ते त्याच्यावर थुंकले+ आणि त्याच्या हातातली वेताची काठी घेऊन त्याच्या डोक्यावर मारू लागले. ३१ शेवटी, त्याची अशी थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावर घातलेलं वस्त्र काढलं. मग त्याला त्याचा झगा घालून ते त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी घेऊन गेले.+
३२ ते बाहेर जात असताना त्यांना मूळचा कुरेनेचा असणारा शिमोन नावाचा एक माणूस दिसला. तेव्हा त्यांनी येशूचा वधस्तंभ उचलून नेण्यासाठी त्याला भाग पाडलं.+ ३३ मग जेव्हा ते गुलगुथा, म्हणजेच कवटीची जागा या ठिकाणी आले,+ ३४ तेव्हा त्यांनी येशूला कडू पदार्थ मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला.+ पण तो चाखल्यावर त्याने तो प्यायला नकार दिला. ३५ त्याला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्यांनी त्याच्या कपड्यांसाठी चिठ्ठ्या टाकून ते आपसात वाटून घेतले.+ ३६ मग त्याच्यावर पहारा देत ते तिथेच बसून राहिले ३७ आणि त्याच्याविरुद्ध असलेला आरोप लिहून त्यांनी तो वधस्तंभावर, त्याच्या डोक्याच्या वर लावला. त्यावर असं लिहिलं होतं: “हा यहुद्यांचा राजा येशू आहे.”+
३८ येशूसोबत दोन चोरांनाही वधस्तंभांवर लटकवण्यात आलं होतं, एकाला त्याच्या उजवीकडे आणि दुसऱ्याला डावीकडे.+ ३९ त्या वेळी तिथून येणारे-जाणारे लोक डोकं हलवून+ त्याची निंदा करत होते+ ४० आणि असं म्हणत होते: “तू मंदिर पाडून तीन दिवसांत पुन्हा उभं करणार होतास ना?+ मग आता स्वतःला वाचव! तू देवाचा मुलगा असशील तर वधस्तंभावरून खाली येऊन दाखव!”+ ४१ त्याच प्रकारे मुख्य याजक, शास्त्री आणि वडीलजनसुद्धा त्याची अशी थट्टा करू लागले:+ ४२ “याने दुसऱ्यांना वाचवलं; पण याला स्वतःला वाचवता येत नाही! इस्राएलचा राजा+ आहे हा; मग आता वधस्तंभावरून खाली ये म्हणावं, मग आम्हीही तुझ्यावर विश्वास ठेवू. ४३ याचा देवावर भरवसा आहे ना? मग आता देवाची याच्यावर मर्जी असेल, तर त्याने याला वाचवावं,+ कारण हा म्हणतो, ‘मी देवाचा मुलगा आहे.’”+ ४४ तसंच, वधस्तंभांवर त्याच्या बाजूला असलेले चोरही त्याची निंदा करत होते.+
४५ मग, दुपारी सुमारे बारा वाजेपासून* सुमारे तीन वाजेपर्यंत* पृथ्वीवर अंधार पसरला.+ ४६ तीन वाजण्याच्या सुमारास येशू मोठ्याने म्हणाला: “एली, एली, लामा साबाखतानी?” म्हणजेच, “माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?”+ ४७ हे ऐकून तिथे उभे असलेले काही लोक म्हणू लागले: “तो एलीयाला हाक मारतोय.”+ ४८ तेव्हा लगेच त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन एक बोळा आणला आणि तो आंबट द्राक्षारसात बुडवून एका वेताच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला.+ ४९ पण बाकीचे लोक म्हणाले: “असू दे! एलीया याला वाचवायला येतो का ते पाहू या.” ५० मग येशू पुन्हा मोठ्याने ओरडला आणि त्याने प्राण सोडला.+
५१ पाहा! त्याच क्षणी मंदिराच्या पवित्र स्थानाचा पडदा+ वरपासून खालपर्यंत+ फाटून त्याचे दोन भाग झाले,+ आणि भूकंप होऊन खडक फुटले. ५२ कबरी* उघडल्या गेल्या आणि मरण पावलेल्या बऱ्याच पवित्र जनांचे मृतदेह बाहेर पडले ५३ आणि कबरस्तानात असलेल्या बऱ्याच लोकांनी ते पाहिले. (कबरींजवळ गेलेले काही लोक येशूला पुन्हा उठवण्यात आल्यानंतर पवित्र शहरात आले.)* ५४ पण जेव्हा सैन्याच्या अधिकाऱ्याने आणि येशूवर पहारा ठेवणाऱ्या इतरांनी तो भूकंप आणि बाकीच्या गोष्टी घडताना पाहिल्या, तेव्हा त्यांना खूप भीती वाटली आणि ते म्हणाले: “खरंच, हा देवाचा मुलगा होता!”+
५५ येशूची सेवा करायला गालीलहून त्याच्यामागे आलेल्या बऱ्याच स्त्रियासुद्धा+ दुरून हे सगळं पाहत होत्या. ५६ त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, याकोब आणि योसे यांची आई मरीया आणि जब्दीच्या मुलांची आई यासुद्धा होत्या.+
५७ मग दुपार टळून गेल्यावर, अरिमथाई इथला योसेफ नावाचा एक श्रीमंत माणूस आला. तोही येशूचा शिष्य झाला होता.+ ५८ या माणसाने पिलातकडे जाऊन येशूचा मृतदेह आपल्याला द्यावा अशी विनंती केली.+ तेव्हा पिलातने तो त्याला देण्याची आज्ञा केली.+ ५९ योसेफने त्याचा मृतदेह नेऊन तो उत्तम प्रतीच्या, स्वच्छ मलमलीच्या कापडात गुंडाळला,+ ६० आणि त्याने खडकात खोदलेल्या त्याच्या नव्या कबरेत* तो ठेवला.+ मग त्याने एक मोठा दगड लोटून कबरेचं* दार बंद केलं आणि तो निघून गेला. ६१ पण मग्दालीया मरीया आणि दुसरी मरीया तिथेच कबरेसमोर बसून राहिल्या.+
६२ दुसऱ्या दिवशी, म्हणजे शब्बाथाच्या तयारीनंतरच्या दिवशी+ मुख्य याजक आणि परूशी पिलातसमोर जमले ६३ आणि म्हणाले: “महाराज, ‘तीन दिवसांनंतर मला उठवलं जाईल,’ असं तो ठक जिवंत असताना म्हणाला होता+ हे आम्हाला चांगलं आठवतं. ६४ म्हणून, तिसऱ्या दिवसापर्यंत कबरेवर पहारा ठेवण्याची आज्ञा द्या, नाहीतर त्याचे शिष्य येऊन त्याचा मृतदेह चोरून नेतील+ आणि लोकांना असं सांगतील, की ‘त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलंय!’ असं झालं तर ही शेवटची फसवणूक आधीपेक्षा वाईट ठरेल.” ६५ पिलात त्यांना म्हणाला: “तुम्ही पहारेकऱ्यांना नेऊ शकता. जा, तुम्हाला जमेल तसा बंदोबस्त करा.” ६६ तेव्हा ते गेले आणि त्यांनी कबरेचं दार पूर्णपणे बंद करून तिथे पहारेकरी ठेवले.