उत्पत्ती
२ अशा प्रकारे, आकाश व पृथ्वी आणि त्यांत असलेलं सर्वकाही* बनवून पूर्ण झालं.+ २ देव करत असलेलं काम सातवा दिवस सुरू होईपर्यंत पूर्ण झालं होतं आणि आपण करत असलेल्या सर्व कामातून त्याने सातव्या दिवशी विश्रांती घ्यायला सुरुवात केली.+ ३ मग देवाने सातव्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि त्याला पवित्र ठरवलं. कारण देवाने ज्या सर्व गोष्टी बनवण्याचं ठरवलं होतं,* त्या निर्माण करण्याच्या कामातून तो त्या दिवसापासून विश्रांती घेत आहे.
४ आकाश आणि पृथ्वी बनवण्यात आली त्या काळाचा, म्हणजेच यहोवा* देवाने पृथ्वी आणि आकाश निर्माण केलं+ त्या दिवसाचा हा वृत्तान्त आहे.
५ पृथ्वीवर अजून कोणतीही झाडंझुडपं उगवली नव्हती, कारण यहोवा देवाने पृथ्वीवर अजून पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यासाठी कोणी माणूस नव्हता. ६ पण पृथ्वीवरून धुकं वर जायचं आणि सगळ्या जमिनीला भिजवायचं.
७ मग यहोवा देवाने जमिनीतली माती घेऊन माणूस बनवला+ आणि त्याच्या नाकपुड्यांमध्ये जीवनाचा श्वास फुंकला,+ तेव्हा तो माणूस जिवंत प्राणी* बनला.+ ८ नंतर यहोवा देवाने पूर्वेकडे एदेनमध्ये एक बाग+ लावली आणि आपण बनवलेल्या माणसाला+ तिथे ठेवलं. ९ यहोवा देवाने दिसायला सुंदर आणि चांगली फळं देणारं प्रत्येक झाड जमिनीतून उगवायला लावलं. तसंच, बागेच्या मधोमध त्याने जीवनाचं झाड+ आणि चांगल्यावाइटाचं ज्ञान देणारं झाडही+ उगवायला लावलं.
१० बागेला पाणी देण्यासाठी एदेनमधून एक नदी वाहायची. पुढे तिला फाटे फुटून चार नद्या झाल्या. ११ पहिल्या नदीचं नाव पीशोन; ही नदी संपूर्ण हवीला देशाला वळसा घालते; तिथे सोनं सापडतं. १२ त्या देशाचं सोनं चांगल्या प्रतीचं आहे. तिथे गुग्गुळाचा डिंक आणि गोमेद रत्नंही आहेत. १३ दुसऱ्या नदीचं नाव गीहोन आहे. ती संपूर्ण कूश देशाला वळसा घालते. १४ तिसऱ्या नदीचं नाव हिद्दकेल*+ आहे. ही नदी अश्शूरच्या+ पूर्वेकडे वाहते आणि चौथी नदी फरात+ आहे.
१५ यहोवा देवाने माणसाला एदेन बागेची मशागत करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी तिथे ठेवलं.+ १६ यहोवा देवाने माणसाला अशी आज्ञाही दिली: “तू बागेतल्या सगळ्या झाडांची फळं पोटभर खाऊ शकतोस.+ १७ पण चांगल्यावाइटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू त्याचं फळ खाशील त्या दिवशी तू नक्की मरशील.”+
१८ मग यहोवा देव म्हणाला: “माणसाने एकटं राहावं हे चांगलं नाही. मी त्याच्यासाठी एक सहायक, एक योग्य असा साथीदार बनवीन.”+ १९ यहोवा देव मातीपासून सर्व प्रकारचे जंगली प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी व जीवजंतू बनवत होता. माणूस त्यांना काय नावं देतो हे पाहण्यासाठी तो त्यांना त्याच्याकडे आणू लागला; आणि त्याने प्रत्येक प्राण्याला* जे नाव दिलं तेच त्याचं नाव पडलं.+ २० मग माणसाने सर्व प्रकारच्या जंगली आणि पाळीव प्राण्यांना, तसंच, आकाशातल्या पक्ष्यांना आणि जीवजंतूंना नावं दिली, पण त्याच्यासाठी कोणीही योग्य सहायक नव्हता. २१ म्हणून यहोवा देवाने माणसाला गाढ झोप आणली आणि तो झोपेत असताना, त्याने त्याची एक फासळी* काढून ती जागा मांसाने भरून काढली. २२ मग यहोवा देवाने माणसातून काढलेल्या फासळीची स्त्री बनवली आणि तिला त्याच्याकडे आणलं.+
२३ तेव्हा माणूस म्हणाला:
“ही तर माझ्या हाडांतलं हाड;
माझ्या मांसातलं मांस आहे.
हिला स्त्री म्हटलं जाईल,
कारण हिला पुरुषापासून बनवलं आहे.”+
२४ म्हणून माणूस आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायकोसोबत राहील* आणि ते दोघं एकदेह होतील.+ २५ तो पुरुष आणि त्याची बायको दोघंही नग्न होते+ तरी त्यांना लाज वाटत नव्हती.