मार्कने सांगितलेला संदेश
४ मग तो पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर शिकवू लागला, तेव्हा लोकांचा खूप मोठा समुदाय त्याच्याजवळ जमला. म्हणून, तो नावेत बसून किनाऱ्यापासून काही अंतरावर गेला आणि सगळे लोक किनाऱ्यावर उभे राहिले.+ २ तो त्यांना उदाहरणं देऊन बऱ्याच गोष्टी शिकवू लागला.+ तो म्हणाला:+ ३ “लक्ष देऊन ऐका! एक शेतकरी पेरणी करायला निघाला.+ ४ तो पेरणी करत असताना काही बी रस्त्याच्या कडेला पडलं आणि पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकलं. ५ काही बी खडकाळ जमिनीवर पडलं. तिथे जास्त माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे लगेच रोपं उगवली.+ ६ पण सूर्य वर येताच कडक उन्हामुळे ती वाळून गेली, कारण त्यांनी मूळ धरलं नव्हतं. ७ काही बी काटेरी झुडपांत पडलं आणि ती झुडपं वाढल्यावर त्यांनी रोपांची वाढ खुंटवली. यामुळे त्यांनी पीक दिलं नाही.+ ८ पण काही बी चांगल्या जमिनीवर पडलं. ते उगवून वाढू लागलं आणि पीक देऊ लागलं; काही तीसपट, काही साठपट आणि काही शंभरपट.”+ ९ मग तो असंही म्हणाला: “ज्याला कान आहेत, त्याने ऐकावं.”+
१० तो एकटा असताना, त्याचे १२ प्रेषित आणि इतर शिष्य त्याच्याजवळ येऊन त्याने दिलेल्या उदाहरणांबद्दल प्रश्न विचारू लागले.+ ११ तो त्यांना म्हणाला: “देवाच्या राज्याच्या पवित्र रहस्याची+ समज तुम्हाला देण्यात आली आहे, पण बाहेरच्यांसाठी ही फक्त उदाहरणं आहेत.+ १२ म्हणून ते पाहतील, पण त्यांना दिसणार नाही आणि ते ऐकतील, पण त्यांना अर्थ कळणार नाही. तसंच, ते कधीच मागे फिरणार नाहीत आणि त्यांच्या पापांची क्षमा त्यांना मिळणार नाही.”+ १३ मग तो त्यांना म्हणाला: “हे उदाहरण जर तुम्हाला समजलं नाही, तर इतर उदाहरणं कशी समजतील?
१४ शेतकऱ्याने पेरलेलं बी म्हणजे देवाचं वचन.+ १५ त्यामुळे, जे रस्त्याच्या कडेला पेरलेल्या बीसारखे आहेत ते लोक वचन तर ऐकतात, पण लगेच सैतान येऊन+ त्यांच्यामध्ये पेरलेलं बी काढून घेतो.+ १६ तसंच, जे खडकाळ जमिनीवर पेरलेल्या बीसारखे आहेत ते लोक वचन ऐकताच आनंदाने स्वीकारतात.+ १७ पण मूळ न धरल्यामुळे ते फक्त काही काळ टिकून राहतात. मग वचनामुळे संकट आलं किंवा छळ झाला तर ते लगेच अडखळून पडतात. १८ आणि असेही काही आहेत जे काटेरी झुडपांत पेरलेल्या बीसारखे असतात. ते असे लोक आहेत ज्यांनी वचन ऐकलंय,+ १९ पण या जगाच्या व्यवस्थेच्या* चिंता,+ पैशाची फसवी ताकद+ आणि इतर सगळ्या गोष्टींची इच्छा+ त्यांच्या मनात येऊन वचनाची वाढ खुंटवते आणि ते निष्फळ ठरतं. २० शेवटी, जे चांगल्या जमिनीवर पेरलेल्या बीसारखे आहेत ते लोक वचन ऐकतात आणि आनंदाने स्वीकारतात. मग, काही तीसपट, तर काही साठपट आणि काही शंभरपट असं पीक देतात.”+
२१ तो त्यांना असंही म्हणाला: “दिवा लावून कधी टोपलीखाली किंवा पलंगाखाली ठेवला जातो का? नाही. उलट, तो घरात एखाद्या उंच ठिकाणी ठेवला जातो. नाही का?+ २२ कारण अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही, जी उघड होणार नाही. आणि काळजीपूर्वक लपवून ठेवलेली अशी कोणतीही गोष्ट नाही, जी उजेडात येणार नाही.+ २३ ज्याला कान आहेत, त्याने ऐकावं.”+
२४ पुढे तो त्यांना म्हणाला: “तुम्ही जे ऐकत आहात त्याकडे लक्ष द्या.+ ज्या मापाने तुम्ही मापून देता, त्याच मापाने तुम्हाला मापून दिलं जाईल; खरंतर, आणखी जास्त दिलं जाईल. २५ कारण ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी देण्यात येईल,+ पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडून जे आहे तेसुद्धा काढून घेतलं जाईल.”+
२६ मग तो पुढे म्हणाला: “देवाचं राज्य अशा एका माणसासारखं आहे, जो जमिनीत बी टाकतो. २७ तो रोज रात्री झोपतो आणि सकाळी उठतो; यादरम्यान, पेरलेलं बी अंकुरतं आणि चांगलं वाढतं. पण हे नेमकं कसं घडलं हे त्याला कळत नाही. २८ हळूहळू, जमीन आपोआप पीक देते; आधी अंकुर, मग कणीस आणि शेवटी कणसात भरलेला दाणा. २९ मग, पीक तयार होताच तो विळा चालवतो कारण कापणीची वेळ आलेली असते.”
३० तो पुढे म्हणाला: “देवाच्या राज्याची तुलना आपल्याला कशाशी करता येईल? कोणत्या उदाहरणाने ते स्पष्ट करून सांगता येईल? ३१ ते मोहरीच्या दाण्यासारखं आहे. तो जमिनीत पेरताना पृथ्वीवरच्या सगळ्या बियांपेक्षा लहान असतो.+ ३२ पण, पेरल्यावर तो वाढतो आणि त्याचं रोप झाडासारखं होतं. त्याला मोठमोठ्या फांद्या फुटतात आणि आकाशातले पक्षी त्याच्या छायेत घरटी बांधून राहू लागतात.”
३३ तर, अशी बरीच उदाहरणं+ देऊन त्यांना समजू शकेल अशा प्रकारे तो त्यांना देवाचं वचन शिकवायचा. ३४ खरंतर तो कधीच उदाहरणांशिवाय त्यांच्याशी बोलत नव्हता. पण आपल्या शिष्यांना तो एकांतात सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगायचा.+
३५ त्या दिवशी संध्याकाळी तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “चला आपण पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊ या.”+ ३६ तेव्हा, जमलेल्या लोकांना निरोप दिल्यानंतर ते त्याला तसंच नावेतून आपल्यासोबत घेऊन गेले आणि त्याच्या नावेसोबत इतरही नावा होत्या.+ ३७ मग खूप जोरदार वादळ आलं. तेव्हा लाटा नावेवर आदळू लागल्या आणि नाव बुडायच्या बेतात होती.+ ३८ पण, येशू नावेच्या मागच्या बाजूला उशीवर डोकं टेकून झोपला होता. म्हणून त्यांनी त्याला उठवलं आणि म्हटलं: “गुरू, आपण बुडतोय याचं तुला काहीच वाटत नाही?” ३९ तेव्हा तो उठला आणि त्याने वाऱ्याला दटावलं. मग तो समुद्राला म्हणाला: “श्श्श! शांत हो!”+ तेव्हा वारा थांबला आणि समुद्र अगदी शांत झाला. ४० मग तो त्यांना म्हणाला: “इतकं का घाबरता?* अजूनही तुम्हाला विश्वास नाही का?” ४१ पण ते खूपच घाबरले होते. ते एकमेकांना म्हणू लागले: “हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्रही याचं ऐकतात.”+