निर्गम
१० मग यहोवा मोशेला म्हणाला: “फारोकडे जा. बघ, मी त्याचं आणि त्याच्या सेवकांचं मन कठोर होऊ दिलं आहे.+ म्हणजे मला त्याच्यादेखत, माझी ही चिन्हं दाखवता येतील.+ २ मी इजिप्तला किती कडक शिक्षा दिली आणि तिथे कोणती चिन्हं दाखवली, हे तू तुझ्या मुलांना आणि नातवंडांना सांग.+ यावरून तुम्हाला कळेल, की मी यहोवा आहे.”
३ तेव्हा मोशे आणि अहरोन फारोसमोर गेले आणि त्याला म्हणाले: “इब्री लोकांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘तू माझ्यासमोर झुकायला कधीपर्यंत नकार देत राहशील?+ माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करू शकतील. ४ तू असाच माझ्या लोकांना जाऊ द्यायला नकार देत राहिलास, तर बघ मी उद्या तुझ्या देशात टोळ आणीन. ५ टोळांनी सगळी पृथ्वी झाकून जाईल आणि जमीनही दिसणार नाही. जे गारांपासून उरलं, ते टोळ खाऊन टाकतील. शेतात वाढत असलेली सगळी झाडं ते फस्त करतील.+ ६ तुझी, तुझ्या सेवकांची आणि इजिप्तमधली सगळी घरं टोळांनी भरून जातील. या देशात तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत कधी पाहिले नसतील, इतके टोळ येतील.’”+ असं बोलून तो फारोसमोरून निघून गेला.
७ तेव्हा फारोचे सेवक त्याला म्हणाले: “हा माणूस कधीपर्यंत आपल्याला असाच त्रास* देत राहील? त्या लोकांना त्यांच्या यहोवा देवाची उपासना करायला जाऊ द्या. इजिप्त देशाचा नाश झालाय, हे तुम्हाला अजूनही कसं कळत नाही?” ८ मग मोशे आणि अहरोन यांना पुन्हा फारोसमोर आणण्यात आलं. फारो त्यांना म्हणाला: “जा, तुमचा देव यहोवा याची उपासना करा; फक्त कोणकोण जाणार ते सांगा.” ९ यावर मोशे म्हणाला: “आम्ही आमच्या लहानमोठ्यांना, मुलामुलींना, मेंढरांना आणि गुराढोरांना घेऊन जाऊ,+ कारण आम्हाला यहोवासाठी सण साजरा करायचा आहे.”+ १० तेव्हा फारो म्हणाला: “मी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना पाठवीन, असं तुम्हाला खरंच वाटतं का? असं झालं तर मग यहोवा नक्की तुमच्यासोबत आहे!+ मला माहीत आहे, यामागे तुमचा काहीतरी वाईट हेतू आहे. ११ पण मी तो पूर्ण होऊ देणार नाही. फक्त तुमच्यातले पुरुष जाऊन यहोवाची उपासना करू शकतात, कारण तुम्ही हीच मागणी केली होती.” मग त्यांना फारोसमोरून घालवून देण्यात आलं.
१२ त्यानंतर यहोवा मोशेला म्हणाला: “इजिप्त देशावर आपला हात उगार, म्हणजे टोळ येऊन देशातलं सगळं पीक खाऊन टाकतील. जे गारांपासून उरलं, ते सगळं टोळ फस्त करतील.” १३ मोशेने लगेच आपली काठी इजिप्तवर उगारली आणि यहोवाने सबंध दिवस आणि सबंध रात्र पूर्वेकडचा वारा देशात वाहायला लावला. सकाळ झाली आणि पूर्वेकडच्या वाऱ्यासोबत टोळ आले. १४ इजिप्तच्या संपूर्ण देशात टोळ पसरले आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेले.+ ही पीडा खूप मोठी होती.+ याआधी कधीच इतके टोळ आले नव्हते आणि यापुढे कधीही येणार नव्हते. १५ टोळांनी सगळी जमीन झाकून टाकली आणि देशात त्यांच्यामुळे अंधार पडला. गारांपासून उरलेलं सगळं पीक आणि झाडांवरची सगळी फळं त्यांनी फस्त केली. इजिप्तच्या शेतांमध्ये आणि झाडांवर काहीच हिरवळ उरली नाही.
१६ तेव्हा फारोने लगेच मोशे आणि अहरोन यांना बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला: “तुमचा देव यहोवा आणि तुमच्याविरुद्ध मी पाप केलं आहे. १७ आता कृपा करून एकदाच माझं हे पाप माफ करा आणि तुमचा देव यहोवा याला विनंती करा, की त्याने ही भयंकर पीडा माझ्यापासून दूर करावी.” १८ तेव्हा तो* फारोसमोरून निघून गेला आणि त्याने यहोवाला विनंती केली.+ १९ मग यहोवाने वाऱ्याची दिशा बदलली आणि पश्चिमेकडून जोराचा वारा वाहू लागला. त्या वाऱ्याने सगळ्या टोळांना उडवून तांबड्या समुद्रात बुडवलं. संपूर्ण इजिप्त देशात एकही टोळ उरला नाही. २० पण यहोवाने फारोचं मन कठोर होऊ दिलं+ आणि फारोने इस्राएली लोकांना जाऊ दिलं नाही.
२१ मग यहोवा मोशेला म्हणाला: “आपला हात वर आकाशाकडे उगार, म्हणजे संपूर्ण इजिप्त देशात काळाकुट्ट अंधार पडेल.” २२ मोशेने लगेच आपला हात आकाशाकडे उगारला आणि संपूर्ण इजिप्त देशात तीन दिवस काळाकुट्ट अंधार पडला.+ २३ तीन दिवस इजिप्तचे लोक एकमेकांना पाहू शकले नाहीत आणि कोणीच जागचं हललं नाही. पण इस्राएली लोक राहत होते तिथे उजेड होता.+ २४ मग फारो मोशेला बोलावून म्हणाला: “जा यहोवाची उपासना करा.+ तुमच्या मुलांनाही घेऊन जा. पण तुमची मेंढरं आणि गुरंढोरं इथेच राहतील.” २५ तेव्हा मोशे म्हणाला: “आमचा देव यहोवा याला अर्पण करण्यासाठी बलिदानं आणि होमार्पणं,+ तुम्ही स्वतः आम्हाला द्याल.* २६ आम्ही आमची जनावरंही आमच्यासोबत नेऊ. आम्ही एकालाही* इथे ठेवणार नाही, कारण आमचा देव यहोवा याची उपासना करण्यासाठी त्यांच्यापैकी काही आम्ही वापरू. आणि यहोवाच्या उपासनेसाठी काय अर्पण करायचं, हे आम्हाला तिथे गेल्यावरच कळेल.” २७ तेव्हा यहोवाने फारोचं मन कठोर होऊ दिलं आणि तो त्यांना जाऊ द्यायला तयार झाला नाही.+ २८ फारो मोशेला म्हणाला: “चालता हो इथून! पुन्हा चुकूनही माझ्यासमोर येऊ नकोस. ज्या दिवशी तू माझ्यासमोर येशील त्या दिवशी तू मरशील.” २९ यावर मोशे म्हणाला: “ठीक आहे, मी पुन्हा तुमच्यासमोर येणार नाही.”