एज्रा
४ बाबेलच्या बंदिवासातून परत आलेले यहुदी+ इस्राएलचा देव यहोवा याचं मंदिर बांधत आहेत, हे जेव्हा यहूदा आणि बन्यामीन यांच्या शत्रूंनी+ ऐकलं, २ तेव्हा ते लगेच जरूब्बाबेल आणि कुळांचे प्रमुख यांच्याकडे येऊन म्हणाले: “आम्हालाही तुमच्यासोबत बांधकाम करू द्या, कारण आम्हीसुद्धा तुमच्या देवाची उपासना करतो*+ आणि ज्याने आम्हाला इथे आणलं+ त्या अश्शूरच्या एसर-हद्दोन राजाच्या काळापासून,+ आम्ही तुमच्या देवाला बलिदानं अर्पण करत आहोत.” ३ पण जरूब्बाबेल, येशूवा आणि इस्राएलच्या कुळांचे बाकीचे प्रमुख त्यांना म्हणाले: “तुमचं आमचं काय घेणंदेणं? तुम्ही आमच्या देवाचं मंदिर बांधू शकत नाही.+ पर्शियाचा राजा कोरेश याने आम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे, इस्राएलचा देव यहोवा याचं मंदिर आम्ही स्वतःच बांधू.”+
४ मग यहूदाच्या लोकांनी मंदिर बांधू नये, म्हणून आजूबाजूच्या राष्ट्रांचे लोक सतत त्यांना निराश करू लागले* आणि त्यांचं मन खचवू लागले.+ ५ यहूदाच्या लोकांच्या योजना सफल होऊ नयेत, म्हणून त्यांनी पर्शियाचा राजा कोरेश याच्या शासनकाळापासून दारयावेश राजाच्या+ शासनकाळापर्यंत, पैसे देऊन सल्लागार नेमले.+ ६ अहश्वेरोश राजाच्या शासनकाळाच्या सुरुवातीला त्यांनी यहूदा आणि यरुशलेम यांच्या रहिवाशांविरुद्ध एक आरोपपत्र लिहिलं. ७ तसंच, पर्शियाचा राजा अर्तहशश्त याच्या काळात बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबेल आणि त्याच्या इतर सर्व सोबत्यांनी अर्तहशश्त राजाला पत्र लिहिलं. त्यांनी त्या पत्राचं अरामी भाषेत+ भाषांतर करून ते अरामी लिपीत लिहिलं.*
८ * राज्याचा मुख्य अधिकारी रहूम आणि शास्त्री असलेला शिमशय यांनी अर्तहशश्त राजाला यरुशलेमविरुद्ध पुढील पत्र लिहिलं: ९ (हे पत्र पुढील लोकांनी पाठवलं: राज्याचा मुख्य अधिकारी रहूम, शास्त्री असलेला शिमशय, त्यांचे बाकीचे सोबती, न्यायाधीश, उपराज्यपाल, सचिव, एरकचे रहिवासी,+ बाबेलचे लोक, शूशनचे रहिवासी+ म्हणजे एलामी लोक,+ १० आणि इतर राष्ट्रांचे लोक, ज्यांना महान आणि आदरणीय आसनपर याने बंदी बनवून आणलं आणि काहींना शोमरोनच्या शहरांमध्ये तर बाकीच्यांना नदीपलीकडच्या* प्रदेशात वसवलं.+ ११ त्यांनी राजाला पाठवलेल्या पत्राची ही प्रत आहे.)
“महाराज अर्तहशश्त यांना नदीपलीकडच्या प्रदेशात राहणाऱ्या त्यांच्या सेवकांकडून: प्रणाम. १२ महाराज, आम्हाला हे कळवायचं आहे, की तुमच्या इथून निघालेले यहुदी यरुशलेमला पोहोचले आहेत. त्यांनी ते बंडखोर आणि दुष्ट शहर पुन्हा बांधायला सुरुवात केली आहे. ते लोक शहराभोवतीच्या भिंती परत बांधत आहेत+ आणि पायाची डागडुजी करत आहेत. १३ महाराजांनी हे जाणावं, की जर हे शहर पुन्हा बांधलं गेलं आणि त्याच्या भिंतींचं काम पूर्ण झालं, तर हे लोक कर, खंडणी+ किंवा जकात देणार नाहीत. आणि यामुळे राजांच्या खजिन्याला मोठं नुकसान होईल. १४ आम्ही महाराजांना ही गोष्ट कळवत आहोत, कारण आम्ही राजवाड्याचं मीठ खातो,* आणि राजाला झालेलं नुकसान आम्हाला बघवणार नाही. १५ तुम्ही जर तुमच्या पूर्वजांच्या पुस्तकांत शोध केला,+ तर तुम्हाला कळेल, की हे राष्ट्र पूर्वीपासूनच बंडखोर आहे. ते राजांसाठी व इतर प्रांतांसाठी घातक आहे. आधीपासूनच या शहरात राजद्रोह करणारे लोक होते, आणि म्हणूनच या शहराचा नाश करण्यात आला होता.+ १६ तेव्हा, आम्हाला महाराजांना हे सांगायचं आहे, की जर हे शहर पुन्हा बांधलं गेलं आणि त्याच्या भिंती बांधून तयार झाल्या, तर नदीपलीकडच्या प्रदेशावर तुमचा अजिबात ताबा* राहणार नाही.”+
१७ मग राजाने मुख्य अधिकारी रहूम, शास्त्री असलेला शिमशय, शोमरोनात राहणारे त्यांचे बाकीचे सोबती आणि नदीपलीकडे राहणाऱ्या इतरांना हा संदेश पाठवला:
“सलाम! १८ तुम्ही पाठवलेलं पत्र माझ्यासमोर स्पष्टपणे वाचण्यात आलं आहे.* १९ माझ्या आज्ञेवरून तपास करण्यात आला आणि असं दिसून आलं आहे, की फार पूर्वीपासूनच हे शहर राजांविरुद्ध उठाव करत होतं, तसंच, तिथे अनेक बंड आणि विद्रोहसुद्धा झाले आहेत.+ २० यरुशलेममध्ये अनेक शक्तिशाली राजे होऊन गेले आणि ते नदीपलीकडच्या संपूर्ण प्रदेशावर राज्य करायचे. त्यांना कर, खंडणी आणि जकात दिली जायची. २१ तर आता या माणसांना त्यांचं काम थांबवण्याची आज्ञा दिली जावी आणि जोपर्यंत मी फर्मान काढत नाही, तोपर्यंत हे शहर पुन्हा बांधलं जाऊ नये. २२ ही आज्ञा लवकरात लवकर लागू केली जावी, म्हणजे राजाचं यापुढे आणखी नुकसान होणार नाही.”+
२३ अर्तहशश्त राजाचं हे राजपत्र जेव्हा मुख्य अधिकारी रहूम, शास्त्री असलेला शिमशय आणि त्यांचे सोबती यांच्यासमोर वाचण्यात आलं, तेव्हा ते लगेच यरुशलेमला यहुद्यांकडे गेले आणि त्यांनी जबरदस्तीने त्यांचं काम थांबवलं. २४ अशा प्रकारे, यरुशलेममध्ये असलेल्या देवाच्या मंदिराचं काम थांबलं आणि पर्शियाचा राजा दारयावेश याच्या शासनकाळाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत ते तसंच ठप्प पडून राहिलं.+