निर्गम
२५ मग यहोवा मोशेला म्हणाला: २ “इस्राएली लोकांना माझ्यासाठी दान गोळा करायला सांग; ज्या कोणाला मनापासून इच्छा होईल, त्या प्रत्येक व्यक्तीकडून माझ्यासाठी दान गोळा करा.+ ३ दान म्हणून तुम्ही या गोष्टी त्यांच्याकडून स्वीकारा: सोनं,+ चांदी,+ तांबं,+ ४ निळं सूत, जांभळी लोकर,* गडद लाल रंगाचं सूत,* चांगल्या प्रतीचं मलमलीचं कापड, बकरीचे केस, ५ लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी, तहशाची* कातडी, बाभळीचं लाकूड,+ ६ दिव्यांसाठी तेल,+ अभिषेकाच्या तेलासाठी+ आणि सुगंधित धूपासाठी+ बाल्सम,* ७ तसंच एफोद*+ आणि ऊरपटावर*+ लावण्यासाठी गोमेद आणि इतर रत्नं. ८ मी तुमच्यामध्ये राहावं,* म्हणून माझ्यासाठी एक उपासनेचं स्थान बनवा.+ ९ मी तुला जो नमुना* दाखवत आहे, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही उपासना मंडप आणि त्यातलं सर्व साहित्य बनवा.+
१० तुम्ही बाभळीच्या लाकडापासून एक पेटी* बनवा. ती अडीच हात* लांब, दीड हात रुंद आणि दीड हात उंच असावी.+ ११ मग तिला शुद्ध सोन्याने मढवा.+ तिला आतून व बाहेरून सोन्याने मढवून तिच्यासभोवती सोन्याची किनार* बनवा.+ १२ तिच्यासाठी साच्यांमध्ये ओतून सोन्याच्या चार कड्या बनवा आणि पेटीच्या चार पायांच्या वरती त्या बसवा. एका बाजूला दोन कड्या आणि दुसऱ्या बाजूला दोन कड्या बसवा. १३ तुम्ही बाभळीच्या लाकडापासून दांडे बनवा आणि ते सोन्याने मढवा.+ १४ साक्षपेटी उचलण्यासाठी तिच्या दोन्ही बाजूंना असलेल्या कड्यांमध्ये ते दांडे घाला. १५ दांडे साक्षपेटीच्या कड्यांमध्येच राहतील; ते त्यांतून काढू नका.+ १६ साक्षलेखाच्या ज्या पाट्या मी तुला देईन, त्या तू साक्षपेटीत ठेव.+
१७ शुद्ध सोन्याचं एक झाकण बनव. ते अडीच हात लांब आणि दीड हात रुंद असावं.+ १८ झाकणाच्या दोन टोकांवर हातोडीने ठोकून सोन्याचे दोन करूब* घडव.+ १९ दोन टोकांवर, म्हणजे झाकणाच्या प्रत्येक टोकावर एक करूब बनवा. २० त्या करुबांचे दोन पंख वरच्या बाजूला पसरलेले असावेत. त्यांनी आपल्या पंखांनी झाकणाला झाकलेलं असावं+ आणि ते एकमेकांच्या समोरासमोर असावेत. त्यांचे चेहरे खाली झाकणाकडे वळलेले असावेत. २१ तू ते झाकण+ साक्षपेटीवर ठेव आणि ज्या साक्षलेखाच्या पाट्या मी तुला देईन, त्या तू साक्षपेटीत ठेव. २२ मी तिथे तुझ्यासमोर प्रकट होईन आणि झाकणावरून तुझ्याशी बोलीन.+ इस्राएली लोकांना द्यायच्या सर्व आज्ञा, मी तुला साक्षपेटीवर असलेल्या दोन करुबांच्या मधून सांगीन.
२३ तू बाभळीच्या लाकडाचं एक मेजही बनव.+ त्याची लांबी दोन हात, रुंदी एक हात आणि उंची दीड हात असावी.+ २४ त्याला शुद्ध सोन्याने मढव आणि त्याच्यासभोवती सोन्याची किनार* बनव. २५ तू मेजाला चार बोटं* रुंदीची एक चौकट बनव आणि त्या चौकटीला सोन्याची किनार* बनव. २६ तू मेजासाठी सोन्याच्या चार कड्या बनव आणि चारही कोपऱ्यांवर, जिथे मेजाचे चार पाय जोडलेले आहेत तिथे त्या कड्या लाव. २७ कड्या चौकटीला लागून असाव्यात, म्हणजे त्यांतून मेज उचलण्यासाठी दांडे घालता येतील. २८ तू ते दांडे बाभळीच्या लाकडापासून बनव आणि त्यांना सोन्याने मढव. ते दांडे मेज उचलण्यासाठी वापरले जावेत.
२९ तसंच तू ताटं व प्याले आणि पेयार्पणं ओतण्यासाठी सुरया आणि वाट्या बनव. तू त्या शुद्ध सोन्याच्या बनव.+ ३० माझ्यासमोर मेजावर कायम अर्पणाच्या भाकरी* ठेव.+
३१ तू शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष* बनव.+ तो हातोडीने ठोकून घडव. त्याचा तळ, बुंधा, फांद्या, फुलं, कळ्या आणि पाकळ्या एकाच अखंड तुकड्याच्या असाव्यात.+ ३२ दीपवृक्षाच्या बाजूंनी सहा फांद्या असाव्यात. एका बाजूला तीन फांद्या आणि दुसऱ्या बाजूला तीन फांद्या असाव्यात. ३३ एका बाजूच्या प्रत्येक फांदीवर बदामाच्या फुलाच्या आकाराची तीन फुलं असावीत आणि आलटूनपालटून कळ्या आणि पाकळ्या असाव्यात. दुसऱ्या बाजूच्या प्रत्येक फांदीचीही अशीच रचना असावी. दीपवृक्षाच्या सर्व सहा फांद्यांची रचना अशीच कर. ३४ दीपवृक्षाच्या बुंध्याला बदामाच्या फुलासारखी चार फुलं असावीत आणि त्याला आलटूनपालटून कळ्या आणि पाकळ्या असाव्यात. ३५ बुंध्यातून निघणाऱ्या सहा फांद्यांपैकी पहिल्या दोन फांद्यांखाली एक कळी, त्यानंतरच्या दोन फांद्यांखाली एक कळी आणि त्यानंतरच्या दोन फांद्यांखाली एक कळी असावी. ३६ कळ्या, फांद्या आणि संपूर्ण दीपवृक्ष हा शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून, हातोडीने ठोकून घडवलेला असावा.+ ३७ दीपवृक्षासाठी तू सात दिवे बनव. दिवे पेटवल्यावर दीपवृक्षाच्या समोरच्या बाजूला त्यांचा प्रकाश पडेल.+ ३८ त्याचे चिमटे आणि धूप जाळण्याची पात्रं* शुद्ध सोन्याची असावीत.+ ३९ ही सर्व भांडी आणि दीपवृक्ष एक तालान्त* वजनाच्या शुद्ध सोन्यापासून बनवावा. ४० तुला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणेच* या सर्व गोष्टी काळजीपूर्वक बनव.+