लेवीय
१६ यहोवासमोर गेल्यामुळे अहरोनच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर,+ यहोवा मोशेशी बोलला. २ यहोवा त्याला म्हणाला: “तुझा भाऊ अहरोन याला सांग, की त्याने पडद्यामागे परमपवित्र स्थानात, साक्षपेटीच्या झाकणासमोर वाटेल तेव्हा येऊ नये,+ नाहीतर तो मरेल;+ कारण, मी झाकणावर एका ढगात प्रकट होईन.+
३ परमपवित्र स्थानात येण्याआधी अहरोनने पापार्पणासाठी एक गोऱ्हा*+ आणि होमार्पणासाठी एक मेंढा+ अर्पण करावा. ४ त्याने मलमलीचा पवित्र झगा+ घालावा आणि मलमलीच्या अंतर्वस्त्रांनी*+ त्याचं अंग* झाकलेलं असावं. तसंच, त्याने कमरेला मलमलीचा कमरबंद+ बांधावा आणि डोक्यावर मलमलीची पगडी+ घालावी. ही पवित्र वस्त्रं आहेत.+ त्याने अंघोळ केल्यानंतर+ ही वस्त्रं घालावीत.
५ त्याने इस्राएली लोकांकडून+ पापार्पणासाठी दोन बकरे आणि होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा.
६ मग अहरोनने स्वतःसाठी असलेला पापार्पणाचा गोऱ्हा आणावा आणि आपल्यासाठी+ व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावं.
७ यानंतर त्याने ते दोन बकरे घेऊन त्यांना भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ यहोवापुढे उभं करावं. ८ अहरोनने त्या दोन बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्यात; एक चिठ्ठी यहोवासाठी आणि एक अजाजेलसाठी.* ९ ज्या बकऱ्यावर यहोवाच्या नावाची चिठ्ठी+ निघेल, तो बकरा अहरोन पापार्पण म्हणून देईल. १० पण ज्या बकऱ्यावर अजाजेलची* चिठ्ठी निघेल, त्याला यहोवासमोर जिवंत उभं करावं आणि त्याच्यावर प्रायश्चित्ताचा विधी करावा; नंतर, त्याला अजाजेलसाठी रानात सोडून द्यावं.+
११ अहरोनने स्वतःसाठी असलेला पापार्पणाचा गोऱ्हा आणावा आणि आपल्यासाठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावं. त्यानंतर, त्याने स्वतःसाठी असलेला तो पापार्पणाचा गोऱ्हा कापावा.+
१२ मग त्याने यहोवासमोर असलेल्या वेदीतले जळते कोळसे+ धूप जाळण्याच्या पात्रात+ भरावेत आणि दोन मुठी भरून धूपही+ घ्यावा. त्याने या गोष्टी पडद्यामागे परमपवित्र स्थानात आणाव्यात.+ १३ मग त्याने यहोवासमोर आगीवर धूप अशा प्रकारे टाकावा,+ की त्यामुळे साक्षपेटीवर+ असलेलं झाकण+ धूपाच्या धुराने झाकून जाईल, म्हणजे तो मरणार नाही.
१४ त्याने गोऱ्ह्याचं काही रक्त+ घेऊन झाकणासमोर, पूर्वेकडे बोटाने शिंपडावं. त्याने ते सात वेळा आपल्या बोटाने झाकणासमोर शिंपडावं.+
१५ मग त्याने लोकांसाठी असलेल्या पापार्पणाचा बकरा कापावा+ आणि त्याचं रक्त परमपवित्र स्थानात, पडद्याच्या आत आणावं+ आणि गोऱ्ह्याच्या रक्तासोबत केलं होतं, तसंच करावं;+ त्याने ते झाकणासमोर शिंपडावं.
१६ त्याने इस्राएली लोकांच्या अशुद्ध कामांबद्दल आणि त्यांच्या अपराधांबद्दल व पापांबद्दल+ परमपवित्र स्थानासाठी प्रायश्चित्त करावं. भेटमंडपासाठीही त्याने तसंच करावं, कारण तो अशुद्ध कामं करणाऱ्या लोकांच्या मध्ये आहे.
१७ प्रायश्चित्त करण्यासाठी अहरोन परमपवित्र स्थानात गेल्यानंतर, तो बाहेर येईपर्यंत कोणीही भेटमंडपात जाऊ नये. तो आपल्यासाठी आणि आपल्या घराण्यासाठी,+ तसंच इस्राएलच्या संपूर्ण मंडळीसाठी+ प्रायश्चित्त करेल.
१८ मग त्याने बाहेर, यहोवासमोर असलेल्या वेदीजवळ यावं+ आणि तिच्यासाठी प्रायश्चित्त करावं. यानंतर गोऱ्ह्याचं आणि बकऱ्याचं काही रक्त घेऊन त्याने ते वेदीच्या चारही बाजूंना असलेल्या शिंगांना लावावं. १९ तसंच, त्याने आपल्या बोटाने काही रक्त सात वेळा वेदीवर शिंपडावं आणि तिला इस्राएली लोकांच्या अशुद्ध कामांपासून पवित्र आणि शुद्ध करावं.
२० परमपवित्र स्थान, भेटमंडप आणि वेदी+ यांच्यासाठी प्रायश्चित्त+ केल्यानंतर त्याने जिवंत बकराही आणावा.+ २१ अहरोनने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांच्या सर्व चुका, अपराध आणि पापं कबूल करावीत आणि ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवावीत.+ मग, त्याने नेमलेल्या माणसाच्या* हातून त्या बकऱ्याला रानात पाठवून द्यावं. २२ अशा रितीने, अहरोन त्या बकऱ्याला पाठवून देईल आणि तो बकरा इस्राएली लोकांचे सर्व अपराध स्वतःवर घेऊन+ रानात निघून जाईल.+
२३ मग अहरोनने भेटमंडपात जावं आणि परमपवित्र स्थानात जाताना जी मलमलीची वस्त्रं त्याने घातली होती, ती काढून ठेवावीत. २४ त्याने एका पवित्र ठिकाणी अंघोळ करून+ आपली वस्त्रं घालावीत.+ मग त्याने बाहेर येऊन आपल्यासाठी असलेलं होमार्पण+ आणि लोकांसाठी असलेलं होमार्पण+ द्यावं आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्त करावं.+ २५ त्याने पापार्पणाची चरबी वेदीवर जाळावी.
२६ ज्या माणसाने अजाजेलसाठी*+ असलेल्या बकऱ्याला रानात सोडलं, त्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि मग तो छावणीत येऊ शकतो.
२७ पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचं आणि पापार्पणाच्या ज्या बकऱ्याचं रक्त प्रायश्चित्त करण्यासाठी परमपवित्र स्थानात नेण्यात आलं होतं, त्यांना छावणीबाहेर घेऊन जावं. त्यांची कातडी, मांस आणि शेण जाळून टाकावं.+ २८ ते जाळून टाकणाऱ्याने आपले कपडे धुवावेत, अंघोळ करावी आणि मग तो छावणीत येऊ शकतो.
२९ तुमच्यासाठी हा एक कायमचा नियम आहे: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही आपल्या पापांबद्दल शोक करावा.* त्या दिवशी तुम्ही कोणतंही काम करू नये.+ देशातल्या रहिवाशाने, तसंच, तुमच्यामध्ये राहणाऱ्या विदेश्यानेही कोणतंच काम करू नये. ३० त्या दिवशी, तुम्हाला शुद्ध घोषित करण्याकरता तुमच्यासाठी प्रायश्चित्त+ केलं जाईल; म्हणजे तुम्ही यहोवासमोर आपल्या सर्व पापांपासून शुद्ध व्हाल.+ ३१ तो तुमच्यासाठी पूर्ण विश्रांतीचा शब्बाथ आहे आणि त्या दिवशी तुम्ही आपल्या पापांसाठी शोक करावा.+ हा एक कायमचा नियम आहे.
३२ याजक म्हणून+ आपल्या वडिलांच्या जागी सेवा करण्यासाठी+ ज्याला अभिषेक+ करून नियुक्त केलं जाईल,* तो प्रायश्चित्त करेल आणि मलमलीपासून बनवलेली पवित्र वस्त्रं घालेल.+ ३३ त्याने परमपवित्र स्थान,+ भेटमंडप+ आणि वेदी+ यांच्यासाठी; तसंच, याजकांसाठी आणि इस्राएलच्या मंडळीतल्या सर्व लोकांसाठी+ प्रायश्चित्त करावं. ३४ इस्राएली लोकांच्या सर्व पापांसाठी वर्षातून एकदा प्रायश्चित्त करण्याबद्दलचा+ हा नियम, तुमच्यासाठी कायमचा नियम असेल.”+
यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच त्याने केलं.