निर्गम
१३ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “इस्राएली लोकांमधून पहिल्या जन्मलेल्या प्रत्येक मुलाला* माझ्यासाठी वेगळं ठेव.* माणसांमधला आणि प्राण्यांमधला पहिला जन्मलेला प्रत्येक नर माझा आहे.”+
३ मग मोशे लोकांना म्हणाला: “हा दिवस आठवणीत ठेवा. कारण इजिप्त देशातून, तुमच्या गुलामगिरीच्या घरातून याच दिवशी यहोवाने तुम्हाला त्याच्या शक्तिशाली हाताने बाहेर आणलं.+ म्हणून तुम्ही खमीर* असलेलं काहीही खाऊ नका. ४ अबीब* महिन्याच्या या दिवशी तुम्ही इथून निघाला आहात.+ ५ जेव्हा यहोवा तुमच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे+ तुम्हाला कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबूसी यांच्या प्रदेशात,+ दूध आणि मध वाहत असलेल्या देशात नेईल,+ तेव्हा तुम्ही या महिन्यात हा विधी पाळावा. ६ तुम्ही सात दिवस बेखमीर* भाकरी खाव्यात+ आणि सातव्या दिवशी यहोवासाठी सण पाळावा. ७ त्या सात दिवसांत तुम्ही बेखमीर भाकरीच खाल्ल्या पाहिजेत;+ आणि तुमच्याजवळ खमीर असलेलं काहीही नसावं.+ तुमच्या सबंध प्रदेशात* कोणाजवळही खमीर असू नये. ८ त्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना असं सांगा, ‘इजिप्तमधून बाहेर निघताना यहोवाने माझ्यासाठी जे केलं, त्यामुळे मी हे करतोय.’+ ९ हा सण तुमच्यासाठी हातावर एक चिन्ह आणि कपाळावर* एक आठवण* म्हणून असेल,+ आणि त्यामुळे यहोवाचा नियम नेहमी तुमच्या ओठांवर* राहील. कारण यहोवाने आपल्या शक्तिशाली हाताने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणलं. १० तुम्ही दरवर्षी हा नियम ठरलेल्या वेळी पाळला पाहिजे.+
११ तुम्हाला हा देश देण्याबद्दल तुमच्या वाडवडिलांना आणि तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, जेव्हा यहोवा तुम्हाला कनानी लोकांच्या देशात नेईल,+ १२ तेव्हा तुम्ही पहिला जन्मलेला प्रत्येक मुलगा, तसंच, तुमच्या जनावरांपैकी पहिला जन्मलेला प्रत्येक नर* यहोवाला समर्पित करा. सगळे नर यहोवाचे आहेत.+ १३ पहिल्या जन्मलेल्या प्रत्येक गाढवाला सोडवण्यासाठी तुम्ही एक मेंढरू द्यावं. जर तुम्ही त्याला सोडवलं नाही, तर त्या गाढवाच्या मानेवर वार करून त्याला ठार मारा. आणि तुमच्या मुलांमधून प्रत्येक प्रथमपुत्राला सोडवून घ्या.+
१४ जर तुमच्या मुलाने नंतर तुम्हाला विचारलं, ‘याचा काय अर्थ होतो?’ तर तुम्ही त्याला सांगा, ‘यहोवाने आम्हाला इजिप्त देशातून, गुलामगिरीच्या घरातून त्याच्या शक्तिशाली हाताने बाहेर आणलं.+ १५ फारोने हट्टीपणाने आम्हाला जाऊ द्यायला नकार दिला,+ तेव्हा यहोवाने इजिप्त देशात माणसांपासून जनावरांपर्यंत सर्वांच्या पहिल्या जन्मलेल्यांना ठार मारलं.+ म्हणून मी सगळे पहिले जन्मलेले नर* यहोवाला बलिदान करतोय आणि माझ्या मुलांपैकी प्रत्येक प्रथमपुत्राला सोडवून घेतोय.’ १६ हे तुमच्या हातावर आणि कपाळावर* एक चिन्ह म्हणून असेल,+ कारण यहोवाने आपल्या शक्तिशाली हाताने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढलं.”
१७ फारोने लोकांना जाऊ दिलं, तेव्हा पलिष्टी लोकांच्या देशातून जाणारा मार्ग जवळचा असूनही देवाने त्या मार्गाने त्यांना नेलं नाही. कारण देव म्हणाला: “लढाई करावी लागली तर या लोकांचं मन बदलेल आणि ते इजिप्तला परत जातील.” १८ म्हणून, देवाने त्यांना वळसा घालून तांबड्या समुद्राच्या जवळ असलेल्या ओसाड रानातून जायला लावलं.+ इजिप्त देशातून निघताना इस्राएली लोक सैन्यांच्या तुकड्यांप्रमाणे निघाले होते. १९ मोशेने योसेफच्या अस्थीही* सोबत घेतल्या, कारण योसेफने इस्राएलच्या मुलांना अशी शपथ घ्यायला लावली होती: “देव नक्कीच तुमच्याकडे लक्ष देईल आणि तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी* आपल्यासोबत घेऊन जा.”+ २० ते सुक्कोथ इथून निघाले आणि त्यांनी ओसाड रानाच्या सीमेवर असलेल्या एथाममध्ये तळ ठोकला.
२१ आपल्या लोकांना दिवसा आणि रात्रीही प्रवास करता यावा, म्हणून यहोवा त्यांना दिवसा मार्ग दाखवण्यासाठी ढगाच्या खांबात आणि रात्री प्रकाश देण्यासाठी आगीच्या खांबात त्यांच्यापुढे जात होता.+ २२ दिवसा ढगाचा खांब, तसंच रात्री आगीचा खांब लोकांच्या समोरून कधीही दूर जायचा नाही.+