निर्गम
२८ तू इस्राएली लोकांमधून याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन+ आणि त्याची मुलं+ म्हणजे नादाब, अबीहू,+ एलाजार आणि इथामार+ यांना माझ्यासमोर आण.+ २ तू गौरवासाठी आणि शोभेसाठी तुझा भाऊ अहरोन याच्याकरता पवित्र वस्त्रं तयार कर.+ ३ ज्यांच्याकडे कौशल्य आहे* आणि ज्यांना मी बुद्धी दिली आहे+ अशा सर्वांशी तू बोल, म्हणजे अहरोनला पवित्र करण्यासाठी ते वस्त्रं बनवतील आणि तो याजक म्हणून माझी सेवा करेल.
४ त्यांनी ही वस्त्रं बनवावी: ऊरपट,*+ एफोद,*+ बिनबाह्यांचा झगा,+ चौकटींचा अंगरखा, पगडी+ आणि कमरबंद.+ तुझा भाऊ अहरोन याने याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी आणि त्याच्या मुलांसाठी ही वस्त्रं त्यांना बनवायला सांग. ५ कारागिरांनी सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल वापरावी.
६ त्यांनी सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून एफोद बनवावं आणि त्यावर भरतकाम करावं.+ ७ त्याला दोन खांदपट्टे असावेत आणि ते वरच्या टोकांना जोडलेले असावेत. ८ एफोदला बांधून ठेवण्यासाठी जो विणलेला पट्टा*+ त्याला जोडला जाईल, तोसुद्धा त्याच गोष्टींपासून बनवला जावा, म्हणजे सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल.
९ तू दोन गोमेद रत्नं+ घेऊन त्यांवर इस्राएलच्या मुलांची नावं कोर.+ १० त्यांच्या जन्माच्या क्रमाप्रमाणे, एका रत्नावर सहा नावं आणि दुसऱ्या रत्नावर सहा नावं असावीत. ११ कोरीव काम करणाऱ्या कारागिराने, मुद्रेवर कोरतात त्याप्रमाणे त्या दोन रत्नांवर इस्राएलच्या मुलांची नावं कोरावीत.+ मग ती रत्नं सोन्याच्या कोंदणांत* बसवावीत. १२ ती दोन रत्नं इस्राएलच्या मुलांची आठवण म्हणून एफोदच्या खांदपट्ट्यांवर ठेवावीत.+ यहोवासमोर जाताना अहरोनने त्यांची नावं दोन खांदपट्ट्यांवर आठवण म्हणून न्यावीत. १३ तू सोन्याची कोंदणं बनव, १४ आणि शुद्ध सोन्याचे दोन गोफ बनवून ते कोंदणांना जोड.+
१५ तू भरतकाम करणाऱ्या कारागिराकडून न्यायाचा ऊरपट बनवून घे.+ तोसुद्धा एफोदसारखाच सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून बनवावा.+ १६ तो दुमडल्यावर चौकोनी असावा. त्याची लांबी एक वीत* आणि रुंदी एक वीत असावी. १७ त्यावर रत्नांच्या चार ओळी असाव्यात. ती रत्नं कोंदणांत बसवलेली असावीत. पहिल्या ओळीत माणीक, पुष्कराज, आणि पाचू असावेत. १८ दुसऱ्या ओळीत पिरोजा, नीलमणी, आणि यास्फे ही रत्नं असावीत. १९ तिसऱ्या ओळीत लेशेम,* लसण्या, आणि जमुनिया, २० तर चौथ्या ओळीत चंद्रकांत, गोमेद आणि मर्गझ ही रत्नं असावीत. ती सोन्याच्या कोंदणांत बसवलेली असावीत. २१ ही रत्नं इस्राएलच्या १२ मुलांच्या नावांप्रमाणे असावीत. एकेका रत्नावर इस्राएलच्या १२ वंशांपैकी प्रत्येकाचं नाव, मुद्रेवर कोरतात तसं कोरलं जावं.
२२ तू ऊरपटावर शुद्ध सोन्याच्या गोफांसारख्या पिळदार साखळ्या बनव.+ २३ ऊरपटासाठी सोन्याच्या दोन कड्या बनव आणि त्या ऊरपटाच्या दोन टोकांना* जोड. २४ सोन्याचे ते दोन गोफ ऊरपटाच्या टोकांना असलेल्या दोन कड्यांमधून घाल. २५ तू त्या दोन गोफांची दोन टोकं, दोन कोंदणांमधून घाल आणि त्यांना एफोदच्या खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला जोड. २६ सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या एफोदच्या समोर, ऊरपटाच्या आतल्या बाजूला खालच्या दोन टोकांना लाव.+ २७ तू एफोदच्या समोरच्या बाजूला, खांदपट्ट्यांच्या खाली लावण्यासाठी सोन्याच्या आणखी दोन कड्या बनव. एफोदच्या विणलेल्या पट्ट्याच्या* वर, जिथे त्याला जोडलं आहे तिथे त्या दोन कड्या लाव.+ २८ ऊरपटाच्या कड्यांना एफोदच्या कड्यांशी निळ्या दोरीने बांधून ठेव, म्हणजे विणलेल्या पट्ट्याच्या* वरती असलेला ऊरपट एफोदवरून सरकणार नाही.
२९ यहोवासमोर कायम आठवण राहावी म्हणून अहरोनने पवित्र स्थानात जाताना इस्राएलच्या मुलांची नावं असलेला न्यायाचा ऊरपट आपल्या छातीवर* घालावा. ३० तू उरीम आणि थुम्मीम*+ न्यायाच्या ऊरपटात ठेव आणि अहरोन यहोवासमोर जाईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावेत. इस्राएली लोकांचा न्याय करण्याच्या या वस्तू अहरोनने कायम यहोवासमोर आपल्या हृदयावर बाळगाव्यात.
३१ तू एफोदच्या आत घालायचा बिनबाह्यांचा झगा पूर्णपणे निळ्या सुताने बनव.+ ३२ डोकं घालण्यासाठी झग्याला मधोमध गळा असावा. चिलखताच्या गळ्याला असते तशी त्याच्याभोवती हातमागाच्या* कारागिराने केलेली किनार असावी, म्हणजे तो फाटणार नाही. ३३ त्याच्या खालच्या सबंध किनारीला निळं सूत, जांभळी लोकर, आणि गडद लाल रंगाचं सूत यांपासून डाळिंबं बनवावीत आणि त्यांच्यामध्ये सोन्याच्या घंट्या लावाव्यात. ३४ बिनबाह्यांच्या झग्याच्या खालच्या सबंध किनारीला, तू सोन्याची एक घंटी आणि एक डाळिंब आलटूनपालटून लाव. ३५ सेवा करताना अहरोनने तो झगा घालावा. तो यहोवासमोर उपासना मंडपात जाईल आणि बाहेर येईल, तेव्हा घंट्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे, म्हणजे तो मरणार नाही.+
३६ तू शुद्ध सोन्याची एक चकाकणारी पट्टी बनव आणि मुद्रेवर कोरतात तसं तिच्यावर हे शब्द कोर: ‘पावित्र्य यहोवाचं आहे.’+ ३७ ती तू पगडीवर+ निळ्या दोरीने बांध; ती नेहमी पगडीच्या पुढच्या बाजूला राहील. ३८ ती अहरोनच्या कपाळावर असेल आणि इस्राएली लोकांनी पवित्र अर्पणं म्हणून पवित्र केलेल्या वस्तूंच्या विरोधात जर एखाद्याने अपराध केला, तर त्याची जबाबदारी अहरोनवर राहील.+ ही पट्टी नेहमी अहरोनच्या कपाळावर असावी, म्हणजे यहोवा लोकांचा स्वीकार करेल.
३९ तू चांगल्या प्रतीच्या मलमलीपासून एक चौकटींचा अंगरखा वीण, तसंच, एक पगडी आणि एक विणलेला कमरबंद बनव.+
४० शिवाय, तू गौरवासाठी आणि शोभेसाठी+ अहरोनच्या मुलांकरता झगे, कमरबंद, आणि पगड्या बनव.+ ४१ तू तुझा भाऊ अहरोन आणि त्याच्या मुलांना ही वस्त्रं घाल आणि त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांचा अभिषेक कर,+ त्यांना नियुक्त कर*+ आणि त्यांना पवित्र कर. ४२ त्यांची नग्नता झाकण्यासाठी तू त्यांच्यासाठी मलमलीची अंतर्वस्त्रंही* बनव.+ ही कमरेपासून मांडयांपर्यंत असावीत. ४३ अहरोन आणि त्याची मुलं भेटमंडपात येतील किंवा पवित्र ठिकाणी वेदीजवळ सेवा करायला जातील, तेव्हा त्यांनी ही अंतर्वस्त्रं घातलेली असावीत, म्हणजे त्यांच्यावर दोष येऊन ते मरणार नाहीत. हा अहरोनसाठी आणि त्याच्या संततीसाठी* कायमचा नियम आहे.