निर्गम
२६ उपासनेचा मंडप दहा कापडांपासून बनव.+ ती कापडं चांगल्या प्रतीची मलमल, निळं सूत, जांभळी लोकर आणि गडद लाल रंगाचं सूत यांपासून बनवलेली असावीत. त्यांवर भरतकामाने करूब* बनव.+ २ प्रत्येक कापडाची लांबी २८ हात* आणि रुंदी चार हात असावी. सगळी कापडं एकाच मापाची असावीत.+ ३ पाच कापडं एकापाठोपाठ एक जोडून एक अखंड कापड तयार कर. उरलेली पाच कापडंही तशीच एकापाठोपाठ एक जोडून आणखी एक अखंड कापड तयार कर. ४ एका कापडाच्या कडेवर निळ्या सुताचे फास* बनव. ते दुसऱ्या कापडाला जोडण्यासाठी, दुसऱ्या कापडाच्या कडेलाही तसेच फास बनव. ५ एका कापडाच्या कडेला ५० फास आणि दुसऱ्या कापडाच्या कडेलाही ५० फास बनव. ते जोडले जातील तेव्हा समोरासमोर असतील. ६ सोन्याचे ५० आकडे बनव आणि त्यांनी दोन्ही कापडांना एकत्र जोड, म्हणजे एकच अखंड उपासनेचा मंडप तयार होईल.+
७ अशाच प्रकारे, तू बकरीच्या केसांपासूनही उपासना मंडपावर टाकण्यासाठी कापडं बनव.+ एकूण ११ कापडं बनव.+ ८ प्रत्येक कापडाची लांबी ३० हात आणि रुंदी चार हात असावी. सर्व ११ कापडं एकाच मापाची असावीत. ९ तू त्यांपैकी पाच कापडं जोडून एक अखंड कापड तयार कर आणि उरलेली सहा कापडं जोडून आणखी एक अखंड कापड तयार कर. त्यातलं सहावं कापड मंडपाच्या समोरच्या बाजूला वर दुमडून ठेव. १० एका कापडाच्या कडेला, म्हणजे जोडलेल्या कापडांपैकी शेवटच्या कापडाच्या कडेला ५० फास बनव. ते दुसऱ्या कापडाला जोडण्यासाठी, दुसऱ्या कापडाच्या कडेलाही ५० फास बनव. ११ तू तांब्याचे ५० आकडे बनव आणि ते आकडे फासांमध्ये अडकवून दोन्ही कापडं एकत्र जोड, म्हणजे उपासनेच्या मंडपाला झाकण्यासाठी त्यांचं एक अखंड कापड तयार होईल. १२ कापडांचा उरलेला भाग लोंबता सोडावा. कापडाचा जो अर्धा भाग उरेल, तो मंडपाच्या मागच्या बाजूला लोंबता राहील. १३ कापडांच्या लांबीतला उरलेला भाग, उपासना मंडपाला झाकण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूंना एक हातभर लोंबता राहील.
१४ अशाच प्रकारे, तू उपासना मंडपाला झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातडीचं आणि त्याच्यावर टाकण्यासाठी तहशाच्या* कातडीचं आच्छादन* बनव.+
१५ तू उपासना मंडपासाठी बाभळीच्या लाकडापासून उभ्या चौकटी बनव.+ १६ प्रत्येक चौकट दहा हात उंच आणि दीड हात रुंद असावी. १७ प्रत्येक चौकटीला दोन समांतर कुसू* असतील. अशाच प्रकारे तू उपासना मंडपाच्या सगळ्या चौकटी बनव. १८ उपासना मंडपाच्या दक्षिणेकडच्या भागासाठी तू २० चौकटी तयार कर.
१९ तू त्या २० चौकटींच्या खाली खाच असलेल्या चांदीच्या ४० बैठका*+ बनव; एका चौकटीखालच्या दोन कुसूंसाठी, खाच असलेल्या दोन बैठका आणि त्यानंतर प्रत्येक चौकटीखालच्या दोन कुसूंसाठी, खाच असलेल्या दोन बैठका बनव.+ २० उपासना मंडपाच्या दुसऱ्या भागासाठी, म्हणजे उत्तरेकडच्या भागासाठी २० चौकटी बनव, २१ आणि त्यांच्यासाठी खाच असलेल्या चांदीच्या ४० बैठका बनव. एका चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका आणि त्यानंतर प्रत्येक चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका बनव. २२ उपासना मंडपाच्या मागच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिमेकडच्या बाजूसाठी सहा चौकटी बनव.+ २३ उपासना मंडपाच्या मागच्या दोन कोपऱ्यांसाठी दोन चौकटी बनव. २४ यांपैकी प्रत्येक चौकटीचे खालून वरपर्यंत दोन भाग असावेत आणि ते पहिल्या कडीजवळ जोडलेले असावेत. दोन्ही चौकटी अशाच प्रकारे बनवल्या जाव्यात. त्या चौकटी मंडपाच्या दोन्ही कोपऱ्यांना असतील. २५ अशा रितीने, आठ चौकटी आणि खाच असलेल्या त्यांच्या चांदीच्या १६ बैठका असतील. एका चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका आणि त्यानंतर प्रत्येक चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका असतील.
२६ उपासना मंडपाच्या एका बाजूच्या चौकटींसाठी तू बाभळीच्या लाकडापासून पाच दांडे बनव.+ २७ उपासना मंडपाच्या दुसऱ्या बाजूच्या चौकटींसाठी पाच दांडे बनव आणि उपासना मंडपाच्या मागच्या बाजूच्या, म्हणजे पश्चिमेकडच्या चौकटींसाठी पाच दांडे बनव. २८ चौकटींच्या मध्यभागी लावला जाणारा दांडा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेल इतका लांब असावा.
२९ तू चौकटींना सोन्याने मढव+ आणि दांडे अडकवण्याच्या त्यांच्या कड्या सोन्याच्या बनव. दांड्यांनाही तू सोन्याने मढव. ३० पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे तू उपासना मंडप उभा कर.+
३१ तू निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून एक पडदा बनव.+ त्याच्यावर भरतकामाने करूब बनव. ३२ हा पडदा तू सोन्याने मढवलेल्या बाभळीच्या खांबांवर लटकव. त्यांचे आकडे सोन्याचे असावेत. हे खांब, खाच असलेल्या चांदीच्या चार बैठकांवर बसवलेले असावेत. ३३ हा पडदा तू आकड्यांखाली लटकव आणि साक्षपेटी+ पडद्यामागे आणून ठेव. हा पडदा पवित्र स्थान+ आणि परमपवित्र स्थान+ यांना वेगळं करेल. ३४ मग तू परमपवित्र स्थानात साक्षपेटीवर झाकण ठेव.
३५ पडद्याच्या बाहेरच्या बाजूला मेज ठेव आणि मेजासमोर म्हणजे उपासना मंडपात दक्षिणेकडे दीपवृक्ष+ ठेव. मेज उत्तरेकडच्या बाजूला असेल. ३६ मंडपात प्रवेश करण्याच्या ठिकाणी तू निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून विणलेला एक पडदा बनव.+ ३७ पडदा लावण्यासाठी बाभळीचे पाच खांब बनव आणि त्यांना सोन्याने मढव. त्यांचे आकडे सोन्याचे असावेत आणि तू त्यांच्यासाठी खाच असलेल्या तांब्याच्या पाच बैठका साच्यांमध्ये ओतून बनव.