प्रेषितांची कार्यं
२४ पाच दिवसांनी, महायाजक हनन्या+ काही वडिलांना आणि तिर्तुल्ल नावाच्या एका वकिलाला* घेऊन आला. आणि त्यांनी पौलविरुद्ध आपले आरोप राज्यपालासमोर मांडले.+ २ तिर्तुल्ल याला इशारा करण्यात आला, तेव्हा तो पौलवर आरोप लावत म्हणाला:
“हे फेलिक्स महाराज! तुमच्यामुळे आम्हाला फार शांतता लाभली असून, तुमच्या दूरदृष्टीमुळेच या देशात बऱ्याच सुधारणा घडून येत आहेत. ३ ही गोष्ट आम्ही सगळ्या ठिकाणी नेहमीच मान्य करतो आणि त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. ४ आता तुमचा जास्त वेळ न घेता, मी तुम्हाला नम्रपणे इतकीच विनंती करतो, की कृपा करून आमची बाजू थोडक्यात ऐकून घ्या. ५ कारण हा माणूस खूप त्रासदायक* आहे+ आणि तो संपूर्ण जगातल्या सगळ्या यहुद्यांना बंड करायला चिथवतोय.+ शिवाय, तो नासरेथकरांच्या पंथाचा पुढारी आहे.+ ६ त्याने मंदिरही दूषित करायचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही त्याला धरलं.+ ७ *—— ८ तुम्ही स्वतः त्याची चौकशी कराल, तेव्हा आम्ही त्याच्यावर लावत असलेले हे सगळे आरोप खरे असल्याचं तुम्हाला दिसून येईल.”
९ तेव्हा, यहुदी लोकसुद्धा त्याच्या विरोधात बोलू लागले आणि या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत असं ठामपणे म्हणू लागले. १० राज्यपालाने पौलला बोलण्याचा मानेने इशारा केला, तेव्हा तो म्हणाला:
“तुम्ही बऱ्याच वर्षांपासून या देशाचा न्याय करत आला आहात, हे माहीत असल्यामुळे मला तुमच्यासमोर आपली बाजू मांडताना आनंद होतोय.+ ११ मी यरुशलेमला उपासना करायला गेलो, या गोष्टीला १२ दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले नाहीत.+ या गोष्टीची तुम्ही स्वतः खातरी करू शकता. १२ आणि मंदिरात मी कोणाशी वाद घालत असल्याचं, किंवा सभास्थानांत किंवा संपूर्ण शहरात जमावाला भडकवत असल्याचं त्यांना दिसलं नाही. १३ शिवाय, या क्षणी ज्या गोष्टींचा ते माझ्यावर आरोप लावत आहेत, त्या गोष्टीही ते सिद्ध करू शकत नाहीत. १४ पण एक गोष्ट मी कबूल करतो. ती म्हणजे, ज्या मार्गाला ते पंथ असं म्हणतात, त्या मार्गाप्रमाणे मी माझ्या पूर्वजांच्या देवाची पवित्र सेवा करतो.+ तसंच, नियमशास्त्रात आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांत लिहिलेल्या सगळ्या गोष्टींवर+ माझा विश्वास आहे. १५ शिवाय, नीतिमान आणि अनीतिमान+ अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे,*+ अशी या लोकांप्रमाणेच मीसुद्धा देवाकडून आशा बाळगतो. १६ आणि यामुळे, मी नेहमी देवासमोर आणि माणसांसमोर माझा विवेक शुद्ध* ठेवायचा प्रयत्न करतो.+ १७ आता बऱ्याच वर्षांनंतर मी माझ्या देशातल्या लोकांना दान द्यायला+ आणि देवाला अर्पणं वाहायला आलो. १८ त्यांनी मला मंदिरात या गोष्टी करताना पाहिलं, तेव्हा मी आधीच विधीप्रमाणे शुद्धीकरण केलेलं होतं.+ माझ्यासोबत लोकांचा जमाव नव्हता किंवा मी कोणतीही खळबळ माजवत नव्हतो. पण आशिया प्रांतातून आलेले काही यहुदी तिथे होते. १९ खरंतर, त्यांना माझ्याविरुद्ध काही तक्रार असेल, तर त्यांनी इथे तुमच्यासमोर येऊन माझ्यावर दोष लावायला पाहिजे होता.+ २० किंवा इथे उपस्थित असलेल्या या माणसांनी सांगावं, की मी न्यायसभेपुढे* उभा असताना त्यांना माझ्यावर दोष लावण्यासारखं काय सापडलं? २१ काही दोष असेल, तर तो इतकाच की मी त्यांच्यामध्ये उभा राहून मोठ्याने म्हणालो: ‘मेलेल्यांच्या पुनरुत्थानावरून आज तुमच्यासमोर माझी न्यायचौकशी केली जात आहे!’ ”+
२२ पण फेलिक्सला प्रभूच्या मार्गाबद्दल चांगली माहिती असल्यामुळे+ त्याने त्यांना असं म्हणून टाळलं: “सेनापती लुसिया आल्यावर, मी तुमच्या प्रकरणाचा निकाल लावीन.” २३ मग त्याने सैन्याच्या अधिकाऱ्याला असा हुकूम दिला, की पौलला कैदेत ठेवावं, पण त्याला थोडीफार मोकळीक द्यावी आणि त्याच्या लोकांना त्याची सेवा करायची परवानगी द्यावी.
२४ काही दिवसांनी, फेलिक्स आपली बायको द्रुसिल्ला, जी यहुदी होती तिला घेऊन आला. त्याने पौलला बोलावून घेतलं आणि ख्रिस्त येशूवरच्या विश्वासाबद्दल त्याच्याकडून ऐकलं.+ २५ पण पौल नीतिमत्त्व, संयम आणि येणाऱ्या न्यायदंडाबद्दल बोलू लागला,+ तेव्हा फेलिक्स घाबरला आणि म्हणाला: “आता तू जा. वेळ मिळाला म्हणजे मी तुला परत बोलावून घेईन.” २६ पण त्याच वेळी, पौल आपल्याला पैसे देईल अशीही त्याला आशा होती. म्हणून तो त्याला वारंवार बोलावून घ्यायचा आणि त्याच्याशी बोलायचा. २७ अशा रितीने दोन वर्षं उलटून गेल्यावर पुर्क्य फेस्त फेलिक्सच्या जागी आला. पण फेलिक्सला यहुद्यांची मर्जी राखायची इच्छा असल्यामुळे+ त्याने पौलला कैदेतच ठेवलं.