१ इतिहास
२८ दावीदने मग इस्राएलच्या सगळ्या अधिकाऱ्यांना यरुशलेममध्ये एकत्र जमवलं. त्याने सर्व वंशांचे प्रमुख, राजाच्या सेवेसाठी असलेले सैन्य-गटांचे प्रमुख,+ हजारांवर व शंभरांवर असलेले अधिकारी,+ राजाच्या आणि त्याच्या मुलांच्या मालमत्तेची व गुराढोरांची देखरेख करणारे अधिकारी;+ तसंच, दरबारातले अधिकारी, प्रत्येक शूरवीर आणि विश्वासू असलेले सर्व जण+ यांना एकत्र जमवलं. २ मग दावीद उभा राहून म्हणाला:
“माझ्या भावांनो! माझ्या लोकांनो! माझ्याकडे लक्ष द्या. आपला देव यहोवा याच्या कराराच्या पेटीसाठी विसाव्याचं स्थान म्हणून आणि त्याच्या पायांसाठी आसन म्हणून, एक मंदिर* बांधायची माझी मनापासून इच्छा होती.+ आणि त्यासाठी मी तयारीसुद्धा केली होती.+ ३ पण खरा देव मला म्हणाला: ‘माझ्या नावाच्या गौरवासाठी तू मंदिर बांधणार नाहीस.+ कारण, तू बरीच युद्धं लढली आहेस आणि खूप रक्तपात केला आहेस.’+ ४ इस्राएलचा देव यहोवा याने माझ्या वडिलांच्या संपूर्ण घराण्यातून मला इस्राएलवर कायमचा राजा होण्यासाठी निवडलं.+ त्याने यहूदाला पुढारी म्हणून निवडलं,+ आणि यहूदाच्या घराण्यातून माझ्या वडिलांचं घराणं निवडलं.+ मग माझ्या वडिलांच्या सगळ्या मुलांमधून त्याने मला संपूर्ण इस्राएलचा राजा होण्यासाठी पसंत केलं.+ ५ आणि यहोवाने मला बरीच मुलं देऊन आशीर्वादित केलं.+ माझ्या सगळ्या मुलांमधून त्याने माझा मुलगा शलमोन+ याला यहोवाच्या राजासनावर बसायला आणि इस्राएलवर राज्य करायला निवडलं.+
६ देव मला म्हणाला: ‘तुझा मुलगा शलमोन हा माझं मंदिर आणि त्याची अंगणं बांधेल. कारण मी त्याला माझा मुलगा म्हणून निवडलंय. आणि मी त्याचा पिता होईन.+ ७ तो आता जसं माझ्या आज्ञा आणि माझे नियम पाळतोय, तसंच जर त्याने त्या पाळत राहण्याचा निश्चय केला,+ तर मी त्याचं राजासन स्थापन करून ते कायमचं स्थिर करीन.’+ ८ म्हणून आता मी संपूर्ण इस्राएलसमोर, म्हणजे यहोवाच्या मंडळीसमोर आणि आपल्या देवासमोर असं म्हणतो, की तुमचा देव यहोवा याच्या सर्व आज्ञा समजून घ्या आणि त्या काळजीपूर्वक पाळा. म्हणजे तुम्ही या चांगल्या देशात+ कायमचं राहाल आणि तुमच्या मुलाबाळांसाठीही हा देश कायमचा वारसा म्हणून ठेवाल.
९ आणि माझ्या मुला शलमोन, तू आपल्या वडिलांच्या देवाला जाणून घे आणि पूर्ण हृदयाने*+ व आनंदी मनाने* त्याची सेवा कर. कारण यहोवा सगळ्यांची मनं पारखतो+ आणि मनातले सगळे विचार व हेतू त्याला कळतात.+ तू त्याला शोधलंस तर तो तुला सापडेल.+ पण जर तू त्याला सोडून दिलंस, तर तो तुझ्याकडे कायमची पाठ फिरवेल.+ १० हे बघ, यहोवाने तुला त्याचं पवित्र ठिकाण, त्याचं मंदिर बांधण्यासाठी निवडलंय. म्हणून हिंमत धर आणि काम सुरू कर.”
११ दावीदने मग आपला मुलगा शलमोन याला मंदिराच्या बांधकामाचा नमुना दिला.+ त्याने त्याला मंदिराचा द्वारमंडप,+ त्याच्या खोल्या, कोठारं, छतावरच्या खोल्या, आतल्या खोल्या आणि प्रायश्चित्ताची खोली*+ यांचा नमुना दिला. १२ दावीदला देवाच्या पवित्र शक्तीच्या* प्रेरणेने मंदिराच्या संपूर्ण बांधकामाचा जो नमुना मिळाला होता, तो त्याने शलमोनला दिला. त्याने त्याला यहोवाच्या मंदिराच्या अंगणांचे,+ त्याच्या सभोवती असलेल्या जेवणाच्या सगळ्या खोल्यांचे, खऱ्या देवाच्या मंदिरातल्या भांडारांचे आणि पवित्र* केलेल्या वस्तूंच्या भांडारांचे+ नमुने दिले. १३ तसंच, त्याने त्याला याजक व लेवी यांच्या गटांच्या बाबतीत,+ यहोवाच्या मंदिरातल्या सगळ्या सेवांच्या बाबतीत आणि यहोवाच्या मंदिरात सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व भांड्यांच्या बाबतीत सूचना दिल्या. १४ याशिवाय, त्याने वेगवेगळ्या सेवेत वापरली जाणारी सोन्याची भांडी बनवण्यासाठी किती सोनं वापरावं; आणि चांदीची भांडी बनवण्यासाठी किती चांदी वापरावी हे सांगितलं. १५ तसंच, त्याने सोन्याचे वेगवेगळे दीपवृक्ष*+ आणि दिवे यांच्यासाठी किती सोनं वापरावं; आणि चांदीच्या वेगवेगळ्या दीपवृक्षांसाठी आणि दिव्यांसाठी किती चांदी वापरावी हे सांगितलं. १६ शिवाय, भाकरीच्या थप्प्या* ठेवायच्या सोन्याच्या प्रत्येक मेजासाठी किती सोनं वापरावं,+ आणि चांदीच्या प्रत्येक मेजासाठी किती चांदी वापरावी हे त्याने सांगितलं. १७ तसंच शुद्ध सोन्याचे काटे, वाट्या आणि सुरया बनवण्यासाठी व सोन्याची प्रत्येक लहान वाटी+ बनवण्यासाठी किती सोनं वापरावं; आणि चांदीची प्रत्येक छोटी वाटी बनवण्यासाठी किती चांदी वापरावी हे त्याने सांगितलं. १८ आणि शुद्ध सोन्याची धूपवेदी+ बनवण्यासाठी किती सोनं वापरावं आणि रथाची प्रतिमा,+ म्हणजे यहोवाच्या कराराच्या पेटीवर पंख पसरून सावली पाडणारे करूब+ बनवण्यासाठी किती सोनं वापरावं हे त्याने सांगितलं. १९ दावीद म्हणाला: “यहोवाने माझं मार्गदर्शन केलं* आणि त्यानेच मला बांधकामाच्या नमुन्याचे सगळे तपशील+ लिहून काढायला+ बुद्धी दिली.”
२० मग दावीद आपला मुलगा शलमोन याला म्हणाला: “हिंमत धर, खंबीर हो आणि कामाला सुरुवात कर. घाबरू नकोस किंवा भिऊ नकोस. कारण माझा देव यहोवा तुझ्यासोबत आहे.+ तो तुला कधीही सोडणार नाही आणि तुझा कधीही त्याग करणार नाही.+ यहोवाच्या मंदिराचं सगळं बांधकाम पूर्ण होईपर्यंत तो तुझ्यासोबत राहील. २१ आणि बघ, खऱ्या देवाच्या मंदिरातल्या सेवेसाठी याजकांचे+ व लेव्यांचे गट+ नेमलेले आहेत. आणि सर्व प्रकारची कामं करणारे कुशल कारागीर तुझ्यासाठी काम करायला तयार आहेत.+ तसंच, सर्व अधिकारी+ आणि सर्व लोकही तुझ्यासोबत आहेत; ते तुझ्या सगळ्या सूचना पाळतील.”