मार्कने सांगितलेला संदेश
३ तो पुन्हा एका सभास्थानात गेला, तेव्हा तिथे वाळलेल्या* हाताचा एक माणूस होता.+ २ येशू त्याला शब्बाथाच्या दिवशी बरं करतो का, हे पाहायला परूशी त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. कारण त्यांना त्याच्यावर आरोप लावायचा होता. ३ येशू त्या वाळलेल्या* हाताच्या माणसाला म्हणाला: “ऊठ, इथे मधे ये.” ४ मग तो त्यांना म्हणाला: “शब्बाथाच्या दिवशी काय करणं योग्य आहे? एखाद्याचं भलं करणं की वाईट करणं? एखाद्याचा जीव वाचवणं की जीव घेणं?”+ पण ते काहीच बोलले नाहीत. ५ त्यांची मनं किती कठोर आहेत+ हे पाहून त्याला खूप दुःख झालं. तेव्हा त्याने रागाने त्यांच्यावर एक नजर टाकली आणि तो त्या माणसाला म्हणाला: “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात बरा झाला. ६ हे पाहून परूशी बाहेर गेले आणि लगेच हेरोदच्या पक्षाच्या लोकांसोबत+ मिळून येशूला ठार मारायचा कट रचू लागले.
७ पण, येशू आपल्या शिष्यांसोबत समुद्राकडे निघून गेला. तेव्हा गालील आणि यहूदीया इथून आलेल्या लोकांचा मोठा समुदाय त्याच्यामागे निघाला.+ ८ तो करत असलेल्या बऱ्याच चमत्कारांबद्दल ऐकून यरुशलेम, इदोम आणि यार्देन नदीच्या पलीकडच्या भागांतून; तसंच, सोर आणि सीदोन यांच्या आसपासच्या प्रदेशांतूनही मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे आले. ९ गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना आपल्यासाठी एक लहानशी नाव तयार ठेवायला सांगितलं. १० येशूने पुष्कळ लोकांना बरं केलं होतं. त्यामुळे गंभीर आजार असलेले सगळे लोक त्याला हात लावण्यासाठी+ त्याच्याभोवती गर्दी करू लागले. ११ तसंच, जेव्हा दुष्ट स्वर्गदूतांनी*+ पछाडलेले लोक त्याला पाहायचे, तेव्हा ते त्याच्यासमोर पडून मोठ्याने ओरडून म्हणायचे: “तू देवाचा मुलगा आहेस.”+ १२ पण त्याने त्यांना वारंवार बजावून सांगितलं, की त्यांनी त्याच्याबद्दल कोणालाही सांगू नये.+
१३ मग तो एका डोंगरावर गेला आणि त्याने आपल्या शिष्यांपैकी काहींना आपल्यासोबत यायला सांगितलं,+ तेव्हा ते त्याच्यासोबत गेले.+ १४ मग त्याने १२ जणांना निवडलं* आणि त्यांना प्रेषित असं नावही दिलं. ते त्याच्यासोबत असायचे आणि त्याने त्यांना प्रचार करायला पाठवलं. १५ तसंच, दुष्ट स्वर्गदूत काढायचा अधिकारही त्याने त्यांना दिला.+
१६ त्याने निवडलेल्या* १२ जणांची+ नावं अशी: शिमोन, ज्याला त्याने पेत्र असंही नाव दिलं,+ १७ जब्दीचा मुलगा याकोब आणि याकोबचा भाऊ योहान (त्याने त्यांना बोआनेर्गेस असंही नाव दिलं. त्याचा अर्थ “गर्जनेची मुलं” असा होतो),+ १८ अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी* १९ आणि ज्याने पुढे त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कर्योत.
मग येशू एका घरात गेला, २० तेव्हा पुन्हा लोकांची इतकी गर्दी जमली, की येशू आणि त्याचे शिष्य जेवूसुद्धा शकले नाहीत. २१ या सगळ्या गोष्टी त्याच्या घरच्यांना कळल्या, तेव्हा ते त्याला आपल्यासोबत घेऊन येण्यासाठी निघाले. कारण ते म्हणत होते, “त्याला वेड लागलंय.”+ २२ तसंच, यरुशलेममधून जे शास्त्री आले होते तेही असं म्हणत होते, की “याच्यात बालजबूल* आहे आणि या दुष्ट स्वर्गदूतांच्या अधिकाऱ्याच्या मदतीनेच हा दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+ २३ त्यामुळे येशूने त्यांना आपल्याजवळ बोलावलं आणि उदाहरणं देऊन तो त्यांना म्हणाला: “सैतानच सैतानाला कसा काढू शकतो? २४ एखाद्या राज्यात फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही.+ २५ आणि एखाद्या घरात फूट पडली तर ते घरही टिकू शकत नाही. २६ तसंच, सैतान जर स्वतःविरुद्धच उठला असेल आणि त्याच्यात फूट पडली असेल, तर तो टिकू शकणार नाही, उलट त्याचा अंत होईल. २७ जर कोणाला एखाद्या ताकदवान माणसाच्या घरात शिरून चोरी करायची असेल, तर त्याला आधी त्या माणसाला बांधून ठेवावं लागेल, तरच त्याला त्याचं घर लुटता येईल. २८ मी तुम्हाला खरं सांगतो, माणसांनी कोणतंही पाप केलं किंवा कोणत्याही प्रकारची निंदा केली, तरी त्यांना त्याबद्दल क्षमा केली जाईल. २९ पण जो पवित्र शक्तीविरुद्ध* बोलून तिची निंदा करतो, त्याला कधीच क्षमा केली जाणार नाही.+ तर त्या पापाचा दोष कायमचा त्याच्यावर राहील.”+ ३० त्यांनी, “त्याच्यात दुष्ट स्वर्गदूत आहे,”+ असं म्हटल्यामुळे तो हे बोलला.
३१ मग त्याची आई आणि भाऊ तिथे आले.+ ते बाहेरच थांबले आणि त्यांनी त्याला बोलावून आणण्यासाठी निरोप पाठवला.+ ३२ तेव्हा त्याच्याभोवती बसलेल्या लोकांपैकी एक त्याला म्हणाला: “बाहेर तुमची आई आणि तुमचे भाऊ तुम्हाला भेटायला आले आहेत.”+ ३३ पण येशू म्हणाला: “माझी आई आणि माझे भाऊ कोण?” ३४ मग आपल्याभोवती बसलेल्या लोकांकडे पाहून तो म्हणाला: “पाहा, माझी आई आणि माझे भाऊ हेच आहेत!+ ३५ जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई.”+