मत्तयने सांगितलेला संदेश
३ नंतर बाप्तिस्मा* देणारा योहान+ यहूदीयाच्या ओसाड रानात आला आणि अशी घोषणा करू लागला:+ २ “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय.”+ ३ याच योहानबद्दल यशया संदेष्ट्याने असं सांगितलं होतं:+ “ओसाड रानात घोषणा करणाऱ्या एकाचा आवाज ऐकू येतोय: ‘यहोवासाठी* मार्ग तयार करा! त्याच्यासाठी रस्ते मोकळे करा.’”+ ४ योहान उंटाच्या केसांचे कपडे घालायचा आणि कमरेला चामड्याचा पट्टा बांधायचा.+ तो टोळ आणि रानातला मध खायचा.+ ५ मग यरुशलेमचे, तसंच यहूदीया आणि यार्देन नदीच्या आसपासच्या सगळ्या प्रदेशांतले लोक त्याच्याकडे येऊ लागले.+ ६ त्यांनी आपल्या पापांची उघडपणे कबुली देऊन त्याच्याकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.+
७ बऱ्याच परूशी* आणि सदूकी*+ लोकांना त्या ठिकाणी येताना पाहून तो त्यांना म्हणाला: “अरे विषारी सापाच्या पिल्लांनो!+ देवाच्या येणाऱ्या क्रोधापासून तुम्ही वाचू शकता असं तुम्हाला कोणी सांगितलं?+ ८ आधी तुमचा पश्चात्ताप तुमच्या कामांतून दाखवा.* ९ ‘आपण तर अब्राहामचे वंशज आहोत,’ अशा भ्रमात राहू नका.+ कारण मी तुम्हाला सांगतो, देवाला पाहिजे असेल तर तो अब्राहामसाठी या दगडांपासूनसुद्धा मुलं उत्पन्न करू शकतो. १० कुऱ्हाड तर केव्हाच झाडाच्या मुळाशी ठेवण्यात आली आहे. जे झाड चांगलं फळ देत नाही ते तोडून आगीत टाकलं जाईल.+ ११ मी तुमच्या पश्चात्तापामुळे तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देतो;+ पण, जो माझ्या मागून येतोय त्याला माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे. मी तर त्याचे जोडे काढायलाही योग्य नाही.+ तो तुम्हाला पवित्र शक्तीने*+ आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल.+ १२ त्याच्या हातात धान्यापासून भुसा वेगळा करायचं फावडं आहे आणि तो त्याचं खळं* पूर्णपणे स्वच्छ करेल. तो गहू कोठारांत जमा करेल, तर भुसा अशा आगीत जाळून टाकेल+ जी विझवता येत नाही.”
१३ मग येशू बाप्तिस्मा घेण्यासाठी गालीलहून यार्देन नदीजवळ योहानकडे आला.+ १४ पण योहान त्याला अडवायचा प्रयत्न करू लागला आणि म्हणाला: “खरंतर मी तुझ्याकडून बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. तू माझ्याकडे कसा काय आलास?” १५ येशू त्याला म्हणाला: “मला अडवू नकोस, कारण आपण देवाच्या इच्छेप्रमाणे सगळं काही करावं हेच योग्य आहे.” त्यानंतर त्याने त्याला अडवलं नाही. १६ बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि बघा! आकाश उघडलं+ आणि देवाची पवित्र शक्ती* कबुतरासारखी येशूवर उतरताना योहानला दिसली.+ १७ आणि त्याच वेळी स्वर्गातून असा आवाज ऐकू आला:+ “हा माझा मुलगा+ मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय.”+