अनुवाद
१६ अबीब* महिन्यात तुमचा देव यहोवा याचा वल्हांडणाचा सण पाळायला विसरू नका,+ कारण अबीब महिन्यातच तुमचा देव यहोवा याने तुम्हाला रात्रीच्या वेळी इजिप्त देशातून बाहेर आणलं होतं.+ २ तुमचा देव यहोवा आपल्या नावाच्या गौरवासाठी जे ठिकाण निवडेल,+ तिथे तुम्ही आपल्या गुराढोरांच्या आणि मेंढरांच्या वा बकऱ्यांच्या कळपातून+ तुमचा देव यहोवा याच्यासाठी वल्हांडणाचा प्राणी अर्पण करा.+ ३ तुम्ही त्यासोबत खमीर* असलेलं काहीही खाऊ नका,+ तर सात दिवस बेखमीर* भाकर, म्हणजेच दुःखाची भाकर खा, कारण तुम्ही इजिप्त देशातून घाईघाईने बाहेर आलात.+ ज्या दिवशी तुम्ही तिथून बाहेर आलात, तो दिवस आयुष्यभर तुमच्या लक्षात राहावा म्हणून असं करा.+ ४ तुमच्या सबंध प्रदेशात सात दिवसांपर्यंत कोणाजवळही खमीर असू नये.+ तसंच, पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी दिलेल्या अर्पणातल्या मांसातून, दुसऱ्या दिवसापर्यंत काहीही राहू नये.+ ५ तुमचा देव यहोवा तुम्हाला देत असलेल्या शहरांपैकी, वाटेल त्या शहरात तुम्हाला वल्हांडणाचा प्राणी अर्पण करता येणार नाही. ६ तर तुमचा देव यहोवा आपल्या नावाच्या गौरवासाठी जे ठिकाण निवडेल, त्या ठिकाणी तुम्ही तो अर्पण करा. तुम्ही वल्हांडणाचा प्राणी संध्याकाळी सूर्य मावळताच,+ म्हणजे तुम्ही इजिप्तमधून ज्या ठरलेल्या वेळी बाहेर आला होता, त्याच वेळी अर्पण करा. ७ तुमचा देव यहोवा जे ठिकाण निवडेल,+ तिथे तुम्ही तो शिजवा आणि खा.+ मग सकाळी तुम्ही आपापल्या तंबूंमध्ये परत जा. ८ सहा दिवस तुम्ही बेखमीर भाकर खा. सातव्या दिवशी तुमचा देव यहोवा याच्या सन्मानात पवित्र सभा असेल. त्या दिवशी तुम्ही कोणतंही काम करू नका.+
९ तुम्ही आपल्या शेतातल्या पिकाला पहिल्यांदा विळा लावाल, त्या दिवसापासून सात आठवडे मोजा.+ १० मग तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा.+ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला दिलेल्या आशीर्वादांच्या प्रमाणात त्याच्यासाठी स्वेच्छेने अर्पण आणा.+ ११ आणि तुमचा देव यहोवा आपल्या नावाच्या गौरवासाठी जे ठिकाण निवडेल, तिथे तुम्ही आणि तुमची मुलं, तुमच्या मुली, तुमचे दासदासी, तुमच्या शहरांमध्ये* राहणारे लेवी, तुमच्यात राहणारे विदेशी, अनाथ मुलं* आणि विधवा यांच्यासोबत तुमचा देव यहोवा याच्यासमोर आनंद करा.+ १२ हे सर्व नियम काळजीपूर्वक पाळा. तुम्ही इजिप्तमध्ये गुलाम होता हे विसरू नका.+
१३ तुम्ही आपलं धान्य, तेल आणि द्राक्षारस यांचं उत्पन्न गोळा कराल, तेव्हा सात दिवसांसाठी मंडपांचा* सण+ साजरा करा. १४ या सणात तुम्ही आणि तुमची मुलं, तुमच्या मुली, तुमचे दासदासी, तुमच्या शहरांमध्ये राहणारे लेवी, विदेशी, अनाथ मुलं आणि विधवा या सर्वांनी आनंद साजरा करावा.+ १५ यहोवाने निवडलेल्या ठिकाणी, तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यासाठी सात दिवस हा सण साजरा करा,+ कारण तुमचा देव यहोवा तुमच्या सगळ्या उत्पन्नावर आणि तुमच्या सर्व कामांवर तुम्हाला आशीर्वाद देईल.+ तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल.+
१६ वर्षातून तीन वेळा, म्हणजे बेखमीर भाकरींच्या,+ सप्ताहांच्या+ आणि मंडपांच्या* सणाच्या+ वेळी तुमच्यातल्या सर्व पुरुषांनी, तुमचा देव यहोवा याने निवडलेल्या ठिकाणी त्याच्यासमोर जावं. कोणीही यहोवासमोर रिकाम्या हाती येऊ नये. १७ प्रत्येकाने आपला देव यहोवा याने दिलेल्या आशीर्वादाच्या प्रमाणात त्याच्यासाठी अर्पण आणावं.+
१८ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला दिलेल्या सर्व शहरांमध्ये* तुम्ही प्रत्येक वंशासाठी न्यायाधीश+ आणि अधिकारी नेमा आणि त्यांनी नीतीने लोकांचा न्याय करावा. १९ तुम्ही अन्याय करू नका,+ पक्षपात करू नका+ आणि लाच घेऊ नका, कारण लाच माणसाला आंधळं बनवते+ आणि नीतिमान माणसाला आपले निर्णय बदलायला लावते. २० नेहमी न्यायाने वागा,+ म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि जो देश तुमचा देव यहोवा तुम्हाला देत आहे, त्याचा ताबा तुम्ही घ्याल.
२१ तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यासाठी वेदी बांधाल, तेव्हा तिच्याजवळ पूजेचा खांब* म्हणून कोणतंही झाड लावू नका.+
२२ तसंच आपल्यासाठी पूजेचा स्तंभ उभारू नका,+ कारण तुमचा देव यहोवा याला अशा गोष्टींची घृणा आहे.