यहेज्केल
३ मग तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, तुझ्यासमोर जे आहे ते खा. ही गुंडाळी खा आणि इस्राएलच्या घराण्याशी जाऊन बोल.”+
२ तेव्हा ती गुंडाळी खाण्यासाठी मी आपलं तोंड उघडलं, आणि त्याने मला ती गुंडाळी खायला लावली. ३ मग तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, ही जी गुंडाळी मी तुला दिली आहे ती खाऊन आपलं पोट भर.” मी ती खाऊ लागलो, तेव्हा ती मला मधासारखी गोड लागली.+
४ नंतर तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांकडे जा आणि माझा संदेश त्यांना सांग. ५ मी काही तुला अशा लोकांकडे पाठवत नाही ज्यांची भाषा समजणं कठीण आहे किंवा ज्यांची बोली तुला माहीत नाही; तर मी तुला इस्राएलच्या घराण्याकडे पाठवतोय. ६ मी काही तुला अशा राष्ट्रांकडे पाठवत नाही ज्यांची भाषा तुला कळत नाही, ज्यांची बोली तुला माहीत नाही किंवा ज्यांचे शब्द तुला समजत नाहीत. मी जर तुला त्यांच्याकडे पाठवलं असतं, तर त्यांनी तुझं ऐकलं असतं.+ ७ पण इस्राएलचं घराणं मात्र तुझं ऐकणार नाही, कारण त्यांना माझं ऐकायचंच नाही.+ इस्राएलच्या घराण्यातले सगळे लोक कठोर मनाचे आणि अडेल वृत्तीचे आहेत.+ ८ बघ! मी तुझा चेहरा त्यांच्या चेहऱ्याइतकाच कठोर आणि तुझं कपाळ त्यांच्या कपाळाइतकंच कठीण केलंय.+ ९ मी तुझं कपाळ हिऱ्यासारखं कठीण, गारगोटीच्या दगडापेक्षाही कठीण केलंय.+ तू त्यांना घाबरू नकोस किंवा त्यांचे चेहरे पाहून भिऊ नकोस.+ ते तर एक बंडखोर घराणं आहे.”
१० पुढे तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, मी जे काही तुला सांगतोय ते सगळं लक्षपूर्वक ऐक आणि त्याकडे आपलं मन लाव. ११ बंदिवासात असलेल्या आपल्या लोकांकडे जा+ आणि त्यांच्याशी बोल. त्यांच्याशी बोलताना, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो,’ असं बोलून सुरुवात कर; मग ते तुझं ऐकोत किंवा न ऐकोत.”+
१२ मग पवित्र शक्ती* मला उचलून घेऊन गेली+ आणि मला माझ्या मागून एक मोठी गर्जना झाल्यासारखा आवाज ऐकू आला. तो आवाज म्हणाला: “यहोवाच्या निवासस्थानातून त्याच्या वैभवाची स्तुती होवो.” १३ तसंच, जिवंत प्राण्यांचे पंख एकमेकांना लागून होणारा आवाज,+ त्यांच्या शेजारी असलेल्या चाकांच्या फिरण्याचा आवाज+ आणि एका मोठ्या गर्जनेसारखा आवाज मला ऐकू आला. १४ पवित्र शक्ती* मला उचलून घेऊन गेली, तेव्हा माझ्या मनात कटुता आणि राग होता. आणि यहोवाची शक्ती माझ्यावर जोरदारपणे कार्य करू लागली. १५ मग मी तेल-अबीबमध्ये खबार नदीजवळ बंदिवासात असलेल्या लोकांकडे गेलो+ आणि त्यांच्यासोबत राहिलो. मी सात दिवसांपर्यंत भयचकित होऊन+ त्यांच्यामध्ये राहिलो.
१६ सात दिवसांनी मला यहोवाकडून असा संदेश मिळाला:
१७ “मनुष्याच्या मुला, मी तुला इस्राएलच्या घराण्याचा पहारेकरी म्हणून नेमलंय.+ तुला माझ्याकडून संदेश मिळाला, की तो तू माझ्या वतीने त्यांना बजावून सांग.+ १८ मी जर एखाद्या दुष्ट माणसाला म्हणालो, ‘तू नक्की मरशील,’ आणि तू जर त्याला ताकीद दिली नाहीस, किंवा त्याने त्याचा वाईट मार्ग सोडून आपला जीव वाचवावा, म्हणून तू जर त्याच्याशी बोलला नाहीस,+ तर तो त्याच्या वाईट कामांमुळे तर मरेलच,+ पण त्याच्या रक्ताचा हिशोब मी तुझ्याकडून घेईन.+ १९ पण जर तू एखाद्या दुष्ट माणसाला ताकीद देऊनही तो त्याच्या दुष्ट कामांपासून आणि वाईट मार्गापासून मागे वळला नाही, तर तो त्याच्या वाईट कामांमुळे तर मरेलच, पण तू मात्र स्वतःचा जीव वाचवशील.+ २० तसंच, एखादा नीतिमान माणूस नीतीने वागायचं सोडून वाईट काम* करू लागला, तर मी त्याच्यासमोर एक अडखळण ठेवीन आणि तो मरेल.+ तू जर त्याला ताकीद दिलेली नसेल, तर तो त्याच्या पापामुळे मरेल आणि त्याने केलेली नीतीची कामंही आठवली जाणार नाहीत. पण त्याच्या रक्ताचा हिशोब मात्र मी तुझ्याकडून घेईन.+ २१ पण एखाद्या नीतिमान माणसाने पाप करू नये, म्हणून तू जर त्याला ताकीद दिलीस आणि त्याने पाप केलं नाही, तर तो नक्की वाचेल; कारण त्याला ताकीद देण्यात आली होती.+ आणि तूही स्वतःचा जीव वाचवशील.”
२२ मग तिथे यहोवाची शक्ती माझ्यावर आली, आणि देव मला म्हणाला: “ऊठ आणि खोऱ्यात* जा, तिथे मी तुझ्याशी बोलीन.” २३ म्हणून मी उठलो आणि खोऱ्यात गेलो. आणि पाहा! यहोवाचं तेज तिथे पसरलं होतं.+ मी खबार नदीजवळ असताना पाहिलं होतं तसंच ते तेज होतं.+ ते तेज पाहून मी जमिनीवर पालथा पडलो. २४ मग, देवाची पवित्र शक्ती माझ्यामध्ये आली आणि तिने मला माझ्या पायांवर उभं केलं.+ त्यानंतर देव माझ्याशी बोलला आणि म्हणाला:
“जा आणि स्वतःला आपल्या घरात कोंडून घे. २५ मनुष्याच्या मुला, तुला बाहेर लोकांकडे जाता येऊ नये, म्हणून ते तुला दोरांनी बांधतील. २६ मी तुझी जीभ तुझ्या टाळूला चिकटायला लावीन. तू मुका होशील आणि तुला त्या लोकांची कानउघाडणी करता येणार नाही. कारण ते एक बंडखोर घराणं आहे. २७ पण जेव्हा मी तुझ्याशी बोलीन, तेव्हा मी तुला तुझी वाचा परत देईन. मग लोकांशी बोलताना+ तू, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो,’ असं बोलून सुरुवात कर; ज्याला ऐकायचं असेल तो ऐकेल+ आणि ज्याला ऐकायचं नसेल तो ऐकणार नाही, कारण ते बंडखोर घराणं आहे.+