यहेज्केल
४५ ‘तुम्ही वारसा म्हणून देशाच्या जमिनीची वाटणी कराल,+ तेव्हा त्यातला एक भाग यहोवासाठी दान म्हणून वेगळा काढा. तो देशातला पवित्र भाग असेल.+ हा भाग २५,००० हात* लांब आणि १०,००० हात रुंद असावा.+ हा संपूर्ण भाग पवित्र असेल. २ जमिनीच्या या भागात ५०० हात लांब आणि ५०० हात रुंद चौरस जागा पवित्र ठिकाणासाठी असेल.+ आणि त्याच्या प्रत्येक बाजूला ५० हात जागा कुरणांसाठी असेल.+ ३ मोजमाप केलेल्या जागेतून तू २५,००० लांबीचं आणि १०,००० रुंदीचं क्षेत्र मोजून काढ. त्या क्षेत्रात मंदिर असेल आणि ते परमपवित्र असेल. ४ हा देशातला पवित्र भाग आहे. तो याजकांसाठी, म्हणजे यहोवाची सेवा करायला त्याच्यासमोर येणाऱ्या मंदिरातल्या सेवकांसाठी आहे.+ ही जागा त्यांच्या घरादारांसाठी आणि मंदिराच्या पवित्र ठिकाणासाठी आहे.
५ मंदिरात सेवा करणाऱ्या लेव्यांसाठी २५,००० हात लांब आणि १०,००० हात रुंद जागा असेल.+ आणि जेवणाच्या २० खोल्या+ त्यांच्या हिश्शाच्या असतील.
६ तुम्ही शहराचा हिस्सा म्हणून २५,००० हात लांब (म्हणजे पवित्र दानाच्या जमिनीच्या लांबीइतकी) आणि ५,००० हात रुंद जागा वेगळी काढा.+ ही जागा इस्राएलच्या संपूर्ण घराण्याची असेल.
७ पवित्र दानाच्या जमिनीच्या दोन्ही बाजूंना आणि शहराच्या दोन्ही बाजूंना प्रधानासाठी जमीन असेल. ही जमीन पवित्र दानाच्या जमिनीला आणि शहराच्या जमिनीला लागून असेल. पूर्वेकडे ती देशाच्या पूर्व सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडे ती देशाच्या पश्चिम सीमेपर्यंत असेल. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत त्या जमिनीची लांबी, तिला लागून असलेल्या वंशांच्या जमिनीच्या लांबीइतकी असेल.+ ८ इस्राएलमध्ये प्रधानाचा हा वाटा असेल. त्यानंतर माझे प्रधान माझ्या लोकांना कधीही वाईट वागणूक देणार नाहीत.+ आणि इस्राएलच्या घराण्याच्या वंशांप्रमाणे ते त्यांना देश वाटून देतील.’+
९ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘हे इस्राएलच्या प्रधानांनो! खूप झालं तुमचं, आता बस्स!’
‘तुम्ही करत असलेला हिंसाचार आणि जुलूम बंद करा. नीतीने वागा आणि योग्य ते करा.+ माझ्या लोकांची मालमत्ता हडपण्याचं बंद करा,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. १० ‘मोजमाप करताना तुम्ही अचूक तराजू, तसंच अचूक एफा* आणि बथ* माप वापरा.+ ११ एफा मापासाठी आणि बथ मापासाठी ठरलेलं माप असावं. बथ माप हा होमर* मापाचा दहावा भाग असावा. आणि एफा मापही होमरचा दहावा भाग असावा. दोन्ही मापांसाठी होमर माप आधार असेल. १२ २० गेरा* मापाचं एक शेकेल*+ माप असावं. आणि २० शेकेल, २५ शेकेल आणि १५ शेकेल मिळून तुमच्यासाठी एक मानेह* माप असावं.’
१३ ‘तुम्ही दान म्हणून हे सगळं आणावं: गव्हाच्या एक होमर मापातून एफाचा सहावा भाग, आणि जवाच्या एक होमर मापातून एफाचा सहावा भाग. १४ दान देण्यासाठी तेलाचा ठरलेला भाग बथ मापाप्रमाणे असावा. बथ हा कोरचा* दहावा भाग आहे. आणि दहा बथ म्हणजे एक होमर; कारण दहा बथ हे एक होमर आहे. १५ आणि इस्राएलच्या गुराढोरांच्या कळपांतून २०० मेंढरांमागे एक मेंढरू द्यावं. ही सगळी दानं लोकांच्या प्रायश्चित्तासाठी+ अन्नार्पण,+ होमार्पण+ आणि शांती-अर्पणं म्हणून असतील,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.
१६ ‘देशातले सगळे लोक ही दानं+ इस्राएलच्या प्रधानाकडे आणून देतील. १७ पण, सणांच्या वेळी, नवचंद्राच्या दिवसांच्या* वेळी, शब्बाथाच्या दिवशी+ आणि इस्राएलच्या घराण्यासाठी असलेल्या सर्व सणांच्या दिवशी+ होमार्पणांची,+ अन्नार्पणांची+ आणि पेयार्पणांची जबाबदारी प्रधानाची असेल.+ इस्राएलच्या घराण्याच्या प्रायश्चित्तासाठी पापार्पण, अन्नार्पण, होमार्पण आणि शांती-अर्पण द्यायला ज्या गोष्टी लागतात त्या पुरवायची जबाबदारी प्रधानाची असेल.’
१८ सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘तू पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी गुराढोरांतून दोष नसलेला एक गोऱ्हा* घे, आणि मंदिर पापापासून शुद्ध कर.+ १९ याजक त्या पापार्पणाचं थोडं रक्त घेऊन मंदिराच्या दाराच्या चौकटीला,+ वेदीच्या भागाच्या चारही कोपऱ्यांना आणि आतल्या अंगणातल्या दाराच्या चौकटीला लावेल. २० एखाद्याच्या हातून चुकून किंवा नकळत पाप घडू शकतं, म्हणून महिन्याच्या सातव्या दिवशीही तू असंच कर.+ अशा प्रकारे तुम्ही मंदिर पापापासून शुद्ध करा.+
२१ पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवशी तुम्ही वल्हांडणाचा सण पाळावा.+ आणि सात दिवस तुम्ही बेखमीर* भाकरी खाव्यात.+ २२ त्या दिवशी प्रधान स्वतःसाठी आणि देशातल्या सगळ्या लोकांसाठी पापार्पण द्यायला एक गोऱ्हा पुरवेल.+ २३ आणि तो सणाचे सातही दिवस दररोज यहोवासाठी होमार्पण म्हणून दोष नसलेले सात गोऱ्हे आणि सात मेंढे,+ तसंच पापार्पण म्हणून दररोज एक बकरा पुरवेल. २४ शिवाय, तो प्रत्येक गोऱ्ह्यासोबत आणि प्रत्येक मेंढ्यासोबत एकेक एफा माप अन्नार्पण पुरवेल. आणि प्रत्येक एफा मापासोबत तो एक हिन* माप तेल पुरवेल.
२५ सातव्या महिन्याच्या १५ व्या दिवसापासून, सणाचे सातही दिवस+ तो अशाच प्रकारे पापार्पण, होमार्पण, अन्नार्पण आणि तेल पुरवेल.’”