१ राजे
८ मग शलमोनने इस्राएलच्या वडीलजनांना, म्हणजे इस्राएल वंशांच्या सगळ्या प्रधानांना आणि घराण्यांच्या प्रमुखांना बोलावून घेतलं.+ ते सगळे दावीदपुरातून, म्हणजे सीयोनमधून+ यहोवाच्या कराराची पेटी आणण्यासाठी+ यरुशलेममध्ये शलमोन राजाकडे एकत्र जमले. २ इस्राएलचे हे सर्व पुरुष एथानीम* महिन्यात, म्हणजे सातव्या महिन्यात+ सणाच्या* वेळी शलमोन राजासमोर एकत्र जमले. ३ इस्राएलचे सर्व वडीलजन आले, तेव्हा याजकांनी कराराची पेटी उचलली.+ ४ याजक आणि लेवी हे यहोवाच्या कराराची पेटी, भेटमंडप+ आणि मंडपातली सर्व पवित्र भांडी घेऊन आले. ५ शलमोन राजा आणि इस्राएलच्या ज्या लोकांना त्याने बोलावलं होतं ते सर्व कराराच्या पेटीपुढे उभे होते. त्या वेळी, इतक्या मोठ्या प्रमाणात मेंढरांची आणि गाय-बैलांची बलिदानं दिली जात होती,+ की त्यांची संख्या मोजणं शक्य नव्हतं.
६ याजकांनी मग यहोवाच्या कराराची पेटी तिच्या जागेवर आणून ठेवली;+ त्यांनी ती मंदिराच्या आतल्या खोलीत, म्हणजे परमपवित्र स्थानात करुबांच्या पंखांखाली ठेवली.+
७ कराराच्या पेटीच्या जागेवर करुबांचे पंख अशा प्रकारे पसरले होते, की कराराची पेटी आणि तिचे दांडे करुबांमुळे वरून झाकले गेले होते.+ ८ कराराच्या पेटीचे दांडे+ इतके मोठे होते, की त्यांची टोकं आतल्या खोलीसमोर असलेल्या पवित्र स्थानातूनही दिसायची. पण बाहेरून मात्र ती दिसायची नाहीत. आणि आजपर्यंत ते तिथे तसेच आहेत. ९ कराराच्या पेटीत दोन दगडी पाट्यांशिवाय+ दुसरं काहीच नव्हतं; इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आले+ तेव्हा यहोवाने त्यांच्याशी एक करार केला होता.+ आणि त्या वेळी होरेब इथे मोशेने त्या दगडी पाट्या कराराच्या पेटीत ठेवल्या होत्या.+
१० याजक जेव्हा पवित्र स्थानातून बाहेर आले, तेव्हा यहोवाचं मंदिर ढगाने+ भरून गेलं.+ ११ या ढगामुळे याजक तिथे उभे राहून सेवा करू शकले नाहीत, कारण यहोवाचं मंदिर यहोवाच्या तेजाने भरून गेलं होतं.+ १२ त्या वेळी शलमोन म्हणाला: “यहोवाने म्हटलं होतं, की तो गडद अंधारात राहील.+ १३ मी यशस्वीपणे तुझ्यासाठी एक भव्य मंदिर बांधलंय, तुझ्यासाठी एक कायमचं निवासस्थान बांधलंय.”+
१४ मग राजा मागे वळला आणि तिथे उभ्या असलेल्या इस्राएलच्या संपूर्ण मंडळीला त्याने आशीर्वाद दिला.+ १५ तो म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा याची स्तुती होवो. त्याने स्वतः आपल्या मुखाने माझ्या वडिलांना, दावीदला वचन दिलं होतं आणि स्वतःच्या हाताने त्याने ते पूर्णही केलंय. त्याने म्हटलं होतं: १६ ‘ज्या दिवशी मी माझ्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणलं, त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या नावाच्या गौरवासाठी+ घर बांधायला मी इस्राएलच्या कोणत्याही वंशातलं शहर निवडलं नाही. पण माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करायला मी दावीदला निवडलं.’ १७ इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी एक घर* बांधायची माझ्या वडिलांची, दावीदची मनापासून इच्छा होती.+ १८ पण यहोवा माझ्या वडिलांना, दावीदला म्हणाला, ‘तुला माझ्या नावाच्या गौरवासाठी एक घर बांधायची मनापासून इच्छा आहे आणि तुझी ही इच्छा चांगलीच आहे. १९ असं असलं, तरी तू माझ्यासाठी घर बांधणार नाहीस; तर तुला जो मुलगा होईल तो माझ्या नावाच्या गौरवासाठी घर बांधेल.’+ २० यहोवाने आपलं वचन पूर्ण केलंय. कारण यहोवाने वचन दिल्याप्रमाणे मी माझ्या वडिलांच्या, दावीदच्या जागी इस्राएलच्या राजासनावर बसलो. आणि इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी मी मंदिरही बांधलं.+ २१ शिवाय, आपल्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर आणल्यावर यहोवाने त्यांच्यासोबत जो करार केला होता, तो करार असलेली पेटी+ ठेवण्यासाठी मी मंदिरात एक स्थानही तयार केलं.”
२२ मग शलमोन इस्राएलच्या संपूर्ण मंडळीपुढे यहोवाच्या वेदीसमोर उभा राहिला. त्याने आपले हात वर आकाशाकडे पसरले,+ २३ आणि तो म्हणाला: “हे इस्राएलच्या देवा, यहोवा! वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर तुझ्यासारखा कोणीही देव नाही;+ तू आपला करार पाळतोस आणि तुझ्या मार्गांवर पूर्ण मनाने चालणाऱ्या आपल्या सेवकांवर एकनिष्ठ प्रेम करतोस.+ २४ तू तुझ्या सेवकाला, माझे वडील दावीद यांना दिलेलं वचन पूर्ण केलंस. तू स्वतः आपल्या मुखाने वचन दिलं होतं आणि आज तू स्वतःच्या हाताने ते पूर्ण केलंस.+ २५ आता हे इस्राएलच्या देवा यहोवा तू तुझ्या सेवकाला, माझे वडील दावीद यांना दिलेलं हे वचन पूर्ण कर. तू म्हणाला होतास: ‘तुझ्या मुलांनी जर आपल्या वागणुकीकडे लक्ष दिलं आणि ते तुझ्यासारखंच माझ्यासमोर चालत राहिले, तर इस्राएलच्या राजासनावर बसायला तुझ्या वंशाचा एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.’+ २६ तर आता हे इस्राएलच्या देवा, तू तुझ्या सेवकाला, माझे वडील दावीद यांना दिलेलं हे वचन खरं ठरो.
२७ पण देव खरोखर पृथ्वीवर राहील काय?+ पाहा! आकाशात आणि आकाशांच्या आकाशातही तू मावू शकत नाहीस,+ तर मी बांधलेल्या या मंदिरात तू कसा मावणार!+ २८ आता हे माझ्या देवा यहोवा, तुझ्या या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि तो कृपेसाठी करत असलेल्या विनंतीकडे लक्ष दे. आज तुझा हा सेवक मदतीसाठी करत असलेला धावा ऐक आणि तो तुझ्यासमोर करत असलेली प्रार्थना ऐक. २९ ज्या स्थानाविषयी तू म्हणाला होतास, की ‘माझं नाव तिथे राहील,’+ त्या स्थानावर, म्हणजे या मंदिरावर दिवसरात्र तुझी नजर असू दे. तुझा सेवक या स्थानाकडे वळून प्रार्थना करेल, तेव्हा ती ऐकण्यासाठी तुझी दृष्टी या स्थानावर असू दे.+ ३० तुझा सेवक जेव्हा कृपेसाठी विनंती करेल आणि तुझे इस्राएली लोक या स्थानाकडे वळून विनंती करतील तेव्हा तू ती ऐक; स्वर्गातल्या आपल्या निवासस्थानातून तू ती विनंती ऐक+ आणि त्यांना क्षमा कर.+
३१ एखाद्या माणसाला, आपल्या सोबत्याविरुद्ध पाप केल्याबद्दल शपथ घ्यायला लावण्यात आली* आणि त्या शपथेच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारलेली असताना जर तो या मंदिरात तुझ्या वेदीसमोर आला,+ ३२ तर तू स्वर्गातून त्याचं ऐक आणि आपल्या सेवकांचा न्याय कर. दुष्टाला दोषी ठरवून त्याचा गुन्हा त्याच्याच माथ्यावर मार. आणि नीतिमानाला निर्दोष ठरवून त्याच्या नीतिमान कार्यांप्रमाणे त्याला प्रतिफळ दे.+
३३ तुझे इस्राएली लोक तुझ्याविरुद्ध पाप करत राहिल्यामुळे शत्रूंकडून त्यांचा पराभव झाला,+ आणि त्यांनी पुन्हा तुझ्याकडे वळून जर तुझ्या नावाचा गौरव केला+ आणि तुझ्या या मंदिरात प्रार्थना करून तुझ्याकडे कृपेची भीक मागितली,+ ३४ तर तू स्वर्गातून आपल्या इस्राएली लोकांचं ऐक आणि त्यांच्या पापांची क्षमा कर आणि त्यांच्या पूर्वजांना तू जो देश दिला होता त्यात त्यांना परत आण.+
३५ ते तुझ्याविरुद्ध पाप करत राहिल्यामुळे+ जर आकाशाची दारं बंद होऊन पाऊस पडला नाही,+ पण तू त्यांना नम्र व्हायला* लावल्यामुळे त्यांनी या स्थानाकडे वळून प्रार्थना केली आणि तुझ्या नावाचा गौरव केला आणि त्यांनी आपला पापी मार्ग सोडून दिला,+ ३६ तर तू स्वर्गातून त्यांचं ऐक आणि तुझ्या सेवकांच्या, तुझ्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा कर. ज्या चांगल्या मार्गाने त्यांनी चाललं पाहिजे तो मार्ग त्यांना शिकव;+ आणि तुझ्या लोकांना तू वारसा म्हणून दिलेल्या तुझ्या देशात पाऊस पाड.+
३७ देशात जर दुष्काळ पडला,+ रोगाची साथ पसरली, पिकांना करपून टाकणारा उष्ण वारा आला, पिकांना बुरशी लागली,+ टोळधाड किंवा पीक फस्त करणारे नाकतोडे आले, किंवा देशातल्या एखाद्या शहराला त्यांच्या शत्रूने वेढा घातला, त्यांच्यावर इतर कुठलीही पीडा आली किंवा रोगराई पसरली,+ ३८ आणि त्यांच्यापैकी कोणत्याही माणसाने किंवा तुझ्या सगळ्या इस्राएली लोकांनी या मंदिराकडे आपले हात पसरून प्रार्थना किंवा कृपेसाठी कोणतीही विनंती केली,+ (कारण प्रत्येकाला आपल्या मनातलं दुःख माहीत असतं),+ ३९ तर तू स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून+ ती ऐक. त्यांना क्षमा करून+ मदत कर. आणि प्रत्येकाला आपल्या कामांप्रमाणे प्रतिफळ दे;+ कारण तू प्रत्येकाचं मन ओळखू शकतोस (तूच फक्त प्रत्येक माणसाचं मन खऱ्या अर्थाने ओळखू शकतोस).+ ४० म्हणजे मग तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात ते जोपर्यंत राहतील तोपर्यंत तुझं भय बाळगतील.
४१ तसंच, तुझ्या इस्राएली लोकांपैकी नसलेला विदेशी माणूस जर तुझं नाव* ऐकून दूरच्या देशातून आला,+ ४२ (कारण ते तुझ्या महान नावाविषयी,+ तुझ्या सामर्थ्यशाली हाताविषयी आणि तुझ्या पराक्रमी बाहूविषयी ऐकतील), आणि त्याने तुझ्या या मंदिराकडे वळून प्रार्थना केली, ४३ तर तू स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून+ ती ऐक. आणि तो विदेशी जी काही विनंती करेल ती तू पूर्ण कर. म्हणजे तुझ्या इस्राएली लोकांप्रमाणेच पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना तुझं नाव समजेल आणि ते तुझं भय बाळगतील.+ तसंच, मी बांधलेल्या या मंदिराला तुझं नाव दिलेलं आहे हेसुद्धा त्यांना समजेल.
४४ तू आपल्या लोकांना त्यांच्या शत्रूंशी लढायला कुठेही पाठवलं+ आणि त्यांनी जर तू निवडलेल्या शहराकडे+ आणि मी तुझ्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून+ तुला प्रार्थना केली+ तर हे यहोवा, ४५ तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना आणि कृपेसाठी त्यांनी केलेली विनंती ऐक आणि त्यांना मदत कर.*
४६ त्यांनी जर तुझ्याविरुद्ध पाप केलं (कारण असा कोणताही माणूस नाही जो पाप करत नाही),+ आणि तुझा राग त्यांच्यावर भडकला व तू त्यांना शत्रूच्या हाती दिलं, आणि शत्रूने त्यांना बंदी करून आपल्या देशात नेलं; मग तो जवळचा देश असो किंवा दूरचा देश असो;+ ४७ आणि बंदी करून नेलेल्या देशात ते जर भानावर आले+ आणि शत्रूंच्या देशात ते तुझ्याकडे वळले+ आणि ‘आम्ही पाप केलं आणि चुकीचं वागलो; आम्ही दुष्टपणे वागलो,’+ असं म्हणून त्यांनी कृपेची भीक मागितली,+ ४८ आणि ज्या शत्रूंनी त्यांना बंदी करून नेलं, त्यांच्या देशात असताना ते जर पूर्ण मनाने आणि जिवाने तुझ्याकडे वळले,+ आणि तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे व तू निवडलेल्या शहराकडे आणि मी तुझ्या नावाच्या गौरवासाठी बांधलेल्या मंदिराकडे वळून त्यांनी प्रार्थना केली,+ ४९ तर स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून+ त्यांची प्रार्थना आणि कृपेसाठी त्यांनी केलेली विनंती ऐक आणि त्यांना मदत कर.* ५० तुझ्याविरुद्ध पाप केलेल्या तुझ्या लोकांना क्षमा कर. त्यांनी तुझ्याविरुद्ध केलेले सगळे अपराध माफ कर. शत्रूंना त्यांची कीव यावी म्हणून त्यांच्या शत्रूंच्या मनात दया उत्पन्न कर.+ ५१ (कारण ते तुझे लोक आणि तुझा वारसा आहेत.+ तू त्यांना इजिप्तमधून,+ लोखंड वितळवणाऱ्या भट्टीतून बाहेर आणलंस.)+ ५२ तुझ्या सेवकाच्या आणि तुझ्या इस्राएली लोकांनी कृपेसाठी केलेल्या विनंतीकडे तुझं लक्ष असू दे.*+ ते जेव्हा-केव्हा मदतीसाठी तुझा धावा करतील* तेव्हा तू त्यांचं ऐक.+ ५३ कारण हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तू आमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर आणल्यावर तुझा सेवक मोशे याच्याद्वारे सांगितलं होतं, त्याप्रमाणे तू पृथ्वीवरच्या सर्व लोकांमधून तुझ्या इस्राएली लोकांना आपला वारसा होण्यासाठी वेगळं केलंय.”+
५४ अशा प्रकारे, यहोवाच्या वेदीपुढे गुडघे टेकून आणि स्वर्गाकडे हात पसरून यहोवाला प्रार्थना आणि कृपेसाठी विनंती केल्यावर शलमोन उठला.+ ५५ मग तो इस्राएलच्या संपूर्ण मंडळीसमोर उभा राहिला आणि त्याने त्यांना आशीर्वाद दिला. तो मोठ्या आवाजात म्हणाला: ५६ “यहोवाची स्तुती असो! कारण त्याने वचन दिल्याप्रमाणे आपल्या इस्राएली लोकांना विसाव्याचं ठिकाण दिलंय.+ त्याने आपला सेवक मोशे याच्याद्वारे चांगल्या गोष्टींबद्दल जी सर्व अभिवचनं दिली होती, त्यांपैकी एकही अभिवचन निष्फळ ठरलेलं नाही.+ ५७ आपला देव यहोवा जसा आपल्या पूर्वजांसोबत होता,+ तसाच तो आपल्यासोबतही असो. तो आपला त्याग न करो किंवा आपल्याला सोडून न देवो.+ ५८ आपण त्याच्या सर्व मार्गांनी चालावं, आणि त्याने आपल्या पूर्वजांना ज्या आज्ञा, कायदे आणि नियम पाळायला सांगितले होते त्यांचं आपणही पालन करावं, म्हणून तो आपली अंतःकरणं त्याच्याकडे आकर्षित करो.+ ५९ आपला देव यहोवा याच्याकडे कृपेसाठी केलेल्या विनंतीचे माझे हे शब्द दिवसरात्र यहोवासमोर असोत. आणि दररोज गरज पडेल त्याप्रमाणे तो आपल्या सेवकाला व आपल्या इस्राएली लोकांना न्याय देवो, ६० म्हणजे पृथ्वीवरच्या सर्व लोकांना कळेल, की यहोवा हाच खरा देव आहे.+ त्याच्याशिवाय दुसरा कोणीही नाही!+ ६१ तेव्हा, आजच्या सारखंच तुम्ही पुढेही पूर्ण मनाने*+ आपला देव यहोवा याच्या कायद्यांप्रमाणे चालत राहा आणि त्याच्या आज्ञांचं पालन करत राहा.”
६२ मग राजाने आणि संपूर्ण इस्राएलने यहोवासमोर खूप मोठ्या प्रमाणात बलिदानं अर्पण केली.+ ६३ शलमोनने यहोवाला ही शांती-अर्पणं+ वाहिली: २२,००० गाय-बैल आणि १,२०,००० मेंढरं. अशा प्रकारे, राजाने आणि संपूर्ण इस्राएलने यहोवाच्या मंदिराचं उद्घाटन केलं.+ ६४ त्या दिवशी होमार्पणं, शांती-अर्पणांची चरबी+ व अन्नार्पणं वाहण्यासाठी राजाला यहोवाच्या मंदिरासमोर असलेल्या अंगणाचा मधला भाग पवित्र करावा लागला. कारण, ही अर्पणं वाहण्यासाठी यहोवासमोर असलेली तांब्याची वेदी+ खूप लहान पडत होती. ६५ त्या वेळी, शलमोनने संपूर्ण इस्राएलसोबत, म्हणजे लेबो-हमाथपासून* ते थेट इजिप्तच्या ओढ्यापर्यंतच्या+ मोठ्या मंडळीसोबत सण साजरा केला.+ त्या सगळ्यांनी आपला देव यहोवा याच्यासमोर सात दिवस आणि त्यानंतर आणखी सात दिवस, असे एकूण १४ दिवस सण साजरा केला. ६६ आणि दुसऱ्या* दिवशी राजाने लोकांना निरोप दिला. मग लोकांनी राजाला आशीर्वाद दिला आणि मोठा जल्लोष करत ते आपापल्या घरी गेले. यहोवाने आपला सेवक दावीद याला आणि आपल्या इस्राएली लोकांना जो चांगुलपणा+ दाखवला होता, त्यामुळे त्यांची मनं आनंदाने भरून गेली होती.