यहेज्केल
३८ मग यहोवाकडून मला परत एकदा संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २ “मनुष्याच्या मुला! तू मागोग देशाच्या गोगकडे,+ म्हणजे मेशेख आणि तुबालच्या मुख्य प्रधानाकडे*+ तोंड करून भविष्यवाणी कर.+ ३ तू असं म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “हे गोग! मेशेख आणि तुबालच्या मुख्य प्रधाना! बघ, मी तुझ्या विरोधात उठलोय. ४ मी तुला मागे वळायला लावीन. मी तुझ्या जबड्यात आकडे टाकून+ तुला आणि तुझ्या संपूर्ण सैन्याला, तुझ्या सगळ्या घोड्यांना आणि सुंदर कपडे घातलेल्या तुझ्या सगळ्या घोडेस्वारांना खेचून बाहेर काढीन;+ मोठ्या व छोट्या ढाली* घेतलेल्या आणि तलवारी चालवणाऱ्या या मोठ्या लोकसमुदायाला मी तुझ्यासकट खेचून बाहेर काढीन. ५ त्यांच्यात छोट्या ढाली घेतलेले आणि डोक्यावर टोप घातलेले पर्शियाचे, इथियोपियाचे आणि पूटचे+ सैनिकसुद्धा असतील. ६ तसंच, गोमर आणि त्याच्या सैनिकांच्या सगळ्या तुकड्या, आणि थेट उत्तरेकडच्या सर्वात दूरच्या भागांतलं तोगार्माचं घराणंही+ आपल्या सैनिकांच्या सगळ्या तुकड्यांसोबत त्यांच्यात असेल. अशा अनेक राष्ट्रांना मी तुझ्यासोबत ओढून बाहेर काढीन.+
७ तू तयार राहा! तुझ्यासोबत जमलेल्या तुझ्या सगळ्या सैन्यांना घेऊन तू तयार राहा. तू त्यांचा सेनापती असशील.
८ मग बऱ्याच दिवसांनंतर तुझ्याकडे लक्ष दिलं जाईल.* ज्या देशातल्या लोकांना तलवारीपासून वाचवून परत आणण्यात आलंय त्या देशावर तू शेवटल्या वर्षांमध्ये हल्ला करशील; ज्या देशातल्या लोकांना पुष्कळ राष्ट्रांमधून गोळा करून इस्राएलच्या डोंगरांवर आणलंय आणि जो देश बऱ्याच काळापासून उद्ध्वस्त अवस्थेत पडून होता, त्या देशावर तू शेवटल्या वर्षांमध्ये हल्ला करशील. त्या देशातल्या रहिवाशांना राष्ट्रांमधून गोळा करून परत आणण्यात आलंय, आणि आता ते सगळे सुरक्षितपणे राहत आहेत.+ ९ तू एखाद्या वादळासारखा त्यांच्या विरोधात येशील आणि ढगांसारखं देशाला झाकून टाकशील. तुझ्यासोबत तुझ्या सैनिकांच्या सगळ्या तुकड्या आणि अनेक राष्ट्रं असतील.”’
१० सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘त्या दिवशी तुझ्या मनात वेगवेगळे विचार येतील, आणि तू एक कट रचशील. ११ तू म्हणशील: “मी सुरक्षेच्या भिंती नसलेल्या वस्त्यांच्या विरोधात जाईन.+ जे सुखशांतीने आणि निश्चिंतपणे राहत आहेत, जे सुरक्षेच्या भिंती, दरवाजे आणि अडसर नसलेल्या वस्त्यांमध्ये राहत आहेत त्या सगळ्यांच्या विरोधात मी जाईन.” १२ लोकांची लूटमार करायला आणि भरपूर माल जमा करायला तू असं करशील. जी ठिकाणं एकेकाळी ओसाड झाली होती, पण आता तिथे लोकवस्ती आहे त्यांवर हल्ला करायला तू असं करशील.+ तसंच, ज्या लोकांना राष्ट्रांतून परत गोळा करण्यात आलंय,+ जे भरपूर धनसंपत्ती आणि मालमत्ता जमा करत आहेत,+ आणि जे पृथ्वीच्या मधोमध राहत आहेत त्यांच्यावर हल्ला करायला तू असं करशील.
१३ शबा+ आणि ददान,+ तसंच तार्शीशचे+ व्यापारी आणि त्याचे सगळे योद्धे तुला असं विचारतील: “तू भरपूर माल जमा करायला आणि लूटमार करायला त्यांच्या विरोधात उठला आहेस का? तू आपल्या सैन्याला सोनं-चांदी, धनसंपत्ती, मालमत्ता आणि मोठ्या प्रमाणात लुटीचा माल घेऊन जाण्यासाठी जमा केलं आहेस का?”’
१४ म्हणून, हे मनुष्याच्या मुला! भविष्यवाणी कर आणि गोगला म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “माझे इस्राएली लोक सुरक्षितपणे राहतील त्या दिवशी तुला ते कळणार नाही का?+ १५ तू तुझ्या ठिकाणांहून, उत्तरेकडच्या सर्वात दूरच्या भागांतून येशील.+ तुझ्यासोबत अनेक राष्ट्रंही येतील; घोड्यांवर स्वार होऊन येणाऱ्यांचा तो एक मोठा समूह, एक अफाट सैन्य असेल.+ १६ देशाला झाकून टाकणाऱ्या ढगांप्रमाणे तू माझ्या इस्राएली लोकांच्या विरोधात येशील. शेवटल्या काळात मी तुला माझ्या देशाविरुद्ध घेऊन येईन.+ म्हणजे, तुझ्याद्वारे जेव्हा मी राष्ट्रांच्या नजरेत स्वतःला पवित्र करीन, तेव्हा हे गोग! राष्ट्रांना कळून येईल की मी कोण आहे.”’+
१७ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘मी पूर्वीच्या काळी माझ्या सेवकांद्वारे, म्हणजे इस्राएलमधल्या माझ्या संदेष्ट्यांद्वारे ज्याच्याबद्दल सांगितलं होतं तो तूच नाहीस का? तुला इस्राएली लोकांविरुद्ध आणलं जाईल अशी ते बऱ्याच वर्षांपासून भविष्यवाणी करत नव्हते का?’
१८ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘ज्या दिवशी गोग इस्राएल देशावर हल्ला करेल, त्या दिवशी माझा क्रोध भयंकर भडकेल.+ १९ मी रागाने पेटून उठेन आणि मोठ्या संतापाने बोलेन; आणि त्या दिवशी इस्राएल देशात मोठा भूकंप होईल. २० माझ्यामुळे समुद्रातले मासे, आकाशातले पक्षी, जंगलातले प्राणी, सगळे सरपटणारे प्राणी आणि पृथ्वीवरची सगळी माणसं थरथर कापतील. तसंच, डोंगर जमीनदोस्त होतील,+ कडेकपारी पडतील आणि प्रत्येक भिंत कोसळून पडेल.’
२१ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘मी माझ्या सगळ्या डोंगरांवर गोगच्या विरोधात तलवार चालवायचा हुकूम देईन. आणि प्रत्येक जण आपल्या भावावर तलवार चालवेल.+ २२ मी रोगराईने+ आणि रक्तपाताने गोगला शिक्षा करीन. मी त्याच्यावर, त्याच्या सैन्यावर आणि त्याच्यासोबत असलेल्या अनेक राष्ट्रांवर+ मुसळधार पाऊस पाडीन, गारांचा मारा करीन+ आणि आगीचा+ व गंधकाचा वर्षाव करीन.+ २३ मी पुष्कळ राष्ट्रांसमोर स्वतःचा गौरव करीन, स्वतःला पवित्र करीन, आणि त्यांना दाखवून देईन की मी कोण आहे. तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे.’