अनुवाद
२१ तुमचा देव यहोवा तुम्हाला ज्या देशाचा ताबा देणार आहे, त्या देशात जर एखाद्या मारून टाकलेल्या माणसाचा मृतदेह रानात सापडला आणि त्याला कोणी मारलं हे कळलं नाही, २ तर वडीलजनांनी आणि न्यायाधीशांनी+ जाऊन त्या मृतदेहापासून आसपासच्या शहरांपर्यंतचं अंतर मोजावं. ३ मग त्या मृतदेहापासून सर्वात जवळच्या शहरातल्या वडीलजनांनी, कोणत्याही कामाला न लावलेली किंवा मानेवर कधीही जू* न ठेवण्यात आलेली एक गाय घ्यावी. ४ त्यांनी तिला पाणी वाहत असलेल्या अशा खोऱ्यात न्यावं, जिथे कधीच नांगरणी किंवा पेरणी झालेली नाही. तिथे त्यांनी तिच्या मानेवर वार करून तिला मारून टाकावं.+
५ मग लेवीय याजकांनी पुढे यावं, कारण तुमचा देव यहोवा याने त्यांना आपली सेवा करण्यासाठी आणि यहोवाच्या नावाने आशीर्वाद देण्यासाठी निवडलं आहे.+ मारहाणीबद्दल असलेला कोणताही वाद कसा सोडवायचा हे ते सांगतील.+ ६ नंतर त्या मृतदेहापासून सर्वात जवळच्या शहरातल्या वडीलजनांनी, खोऱ्यात मारलेल्या त्या गायीवर आपले हात धुवावेत,+ ७ आणि त्यांनी असं म्हणावं, ‘आमच्या हातांनी हे रक्त सांडलं नाही किंवा ते सांडताना आमच्या डोळ्यांनी पाहिलं नाही. ८ म्हणून हे यहोवा, तू सोडवलेल्या तुझ्या इस्राएली लोकांना या रक्तदोषासाठी जबाबदार धरू नकोस+ आणि निरपराध रक्ताचा दोष तुझ्या इस्राएली लोकांवर राहू देऊ नकोस.’+ मग तो रक्तदोष त्यांच्यावर येणार नाही. ९ अशा रितीने, तुम्ही यहोवाच्या नजरेत जे योग्य आहे ते करून निरपराध रक्ताचा दोष आपल्यावरून काढून टाका.
१० जर तुम्ही आपल्या शत्रूंविरुद्ध युद्ध करायला गेलात आणि तुमचा देव यहोवा याने तुम्हाला त्यांच्यावर विजय मिळवून दिला आणि तुम्ही त्यांना बंदी बनवलं;+ ११ आणि जर त्या बंदिवानांमध्ये तुमच्यापैकी एखाद्याला एक सुंदर स्त्री दिसली आणि त्याला ती आवडली आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं असलं, १२ तर त्याने तिला आपल्या घरी घेऊन यावं. मग तिने आपल्या डोक्यावरचे केस काढावेत, नखं कापावीत, १३ आणि बंदिवासातले आपले कपडे बदलून त्याच्या घरात राहावं. तिने महिनाभर आपल्या आईवडिलांसाठी शोक करावा;+ मग तो तिच्याशी संबंध ठेवू शकतो. तो तिचा नवरा होईल आणि ती त्याची बायको होईल. १४ पण नंतर त्याला ती आवडली नाही, तर तिची इच्छा असेल तिथे त्याने तिला जाऊ द्यावं.+ पण त्याने तिला विकू नये किंवा तिला वाईट वागणूक देऊ नये, कारण त्याने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं आहे.
१५ जर एका माणसाच्या दोन बायका असतील आणि त्यांच्यापैकी एकीवर त्याचं जास्त प्रेम असेल* आणि दोघींनाही त्याच्यापासून मुलं झाली असतील आणि पहिला जन्मलेला मुलगा न आवडणाऱ्या बायकोचा असेल,+ १६ तर ज्या दिवशी तो आपला वारसा आपल्या मुलांना वाटेल, त्या दिवशी त्याला आपल्या न आवडणाऱ्या बायकोच्या मुलाऐवजी, म्हणजे प्रथमपुत्राऐवजी आवडत्या बायकोच्या मुलाला प्रथमपुत्राचा हक्क देता येणार नाही. १७ त्याने न आवडणाऱ्या बायकोच्या मुलाला आपल्या सगळ्या संपत्तीतला दुप्पट हिस्सा देऊन प्रथमपुत्राचा हक्क द्यावा. कारण तो त्याच्या पुरुषत्वाचं पहिलं फळ आहे. प्रथमपुत्र असण्याचा हक्क त्याचाच आहे.+
१८ जर एखाद्या माणसाला हट्टी आणि बंडखोर मुलगा असेल आणि तो आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळत नसेल+ आणि त्यांनी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करूनही तो त्यांचं ऐकत नसेल,+ १९ तर त्याच्या आईवडिलांनी त्याला धरून शहराच्या फाटकाजवळ वडीलजनांकडे न्यावं. २० आणि त्यांना असं सांगावं, ‘आमचा हा मुलगा हट्टी आणि बंडखोर आहे. तो आमचं ऐकत नाही. तो खादाड+ आहे आणि दारुडा+ आहे.’ २१ मग त्याच्या शहरातल्या सगळ्या माणसांनी त्याला दगडमार करून ठार मारावं. तुम्ही तुमच्यामधून अशा वाईट गोष्टी काढून टाका, म्हणजे सर्व इस्राएली लोक हे ऐकतील आणि घाबरतील.+
२२ जर एखाद्या माणसाने मृत्युदंडाची शिक्षा असलेलं पाप केल्यामुळे, त्याला ठार मारण्यात आलं असेल+ आणि तुम्ही त्याला वधस्तंभावर* लटकवलं असेल,+ २३ तर त्याचा मृतदेह रात्रभर वधस्तंभावर राहू देऊ नका.+ त्याऐवजी तुम्ही त्याच दिवशी त्याला पुरा, कारण ज्याला वधस्तंभावर लटकवण्यात आलं आहे, तो देवाकडून शापित आहे.+ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला जो देश वारसा म्हणून दिला आहे, तो तुम्ही दूषित करू नका.+