जखऱ्या
१ दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्या वर्षी,+ आठव्या महिन्यात जखऱ्या*+ संदेष्ट्याला यहोवाकडून* संदेश मिळाला; जखऱ्या हा बरेख्याचा मुलगा आणि इद्दोचा नातू होता. जखऱ्याला देवाकडून असा संदेश मिळाला: २ “तुमच्या वाडवडिलांवर यहोवाचा क्रोध भयंकर भडकला होता.+
३ आता लोकांना जाऊन सांग, ‘सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “मी सैन्यांचा देव यहोवा आहे! माझ्याकडे परत या, म्हणजे मीही तुमच्याकडे परत येईन.”+ तुम्हाला हे सांगणारा मी सैन्यांचा देव यहोवा आहे.’
४ ‘तुमच्या वाडवडिलांसारखं होऊ नका. पूर्वीच्या संदेष्ट्यांनी त्यांना सांगितलं होतं, की “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘कृपया तुमची वाईट वागणूक आणि तुमची वाईट कामं सोडून द्या, आणि माझ्याकडे परत या.’”’+
‘पण त्यांनी माझं ऐकलं नाही किंवा माझ्याकडे लक्ष दिलं नाही,’+ असं यहोवा म्हणतो.
५ ‘आता कुठे आहेत तुमचे वाडवडील? आणि ते संदेष्टे तरी कुठे कायमचे जगले? ६ पण मी माझ्या सेवकांना, म्हणजे संदेष्ट्यांना जो संदेश आणि ज्या आज्ञा घोषित करायला सांगितल्या होत्या, त्या सगळ्या तुमच्या वाडवडिलांच्या बाबतीत खऱ्या ठरल्या नाहीत का?’+ तेव्हा ते माझ्याकडे परत आले आणि म्हणाले: ‘सैन्यांचा देव यहोवा याने आमच्या बाबतीत जे ठरवलं होतं ते त्याने केलंय. त्याने आम्हाला आमच्या वाईट वागणुकीचं आणि आमच्या वाईट कामांचं फळ दिलंय.’”+
७ मग दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्या वर्षी,+ ११ व्या महिन्याच्या, म्हणजे शबाट* महिन्याच्या २४ व्या दिवशी, बरेख्याचा मुलगा आणि इद्दोचा नातू, जखऱ्या संदेष्टा याला यहोवाकडून परत संदेश मिळाला. ८ जखऱ्या म्हणाला: “मी रात्री एक दृष्टान्त पाहिला. मी पाहिलं, की एक माणूस लाल घोड्यावर स्वारी करत आला आणि खोल दरीत असलेल्या मेंदीच्या झुडपांमध्ये येऊन थांबला. त्याच्या मागे लाल, तपकिरी आणि पांढऱ्या रंगांचे घोडे होते.”
९ तेव्हा मी विचारलं: “प्रभू, हे कोण आहेत?”
त्यावर माझ्याशी बोलत असलेला स्वर्गदूत म्हणाला: “हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.”
१० मग मेंदीच्या झुडपांमध्ये थांबलेला तो माणूस म्हणाला: “हे ते आहेत ज्यांना यहोवाने पृथ्वीवर फेरी मारण्यासाठी पाठवलंय.” ११ तेव्हा त्यांनी मेंदीच्या झुडपांमध्ये थांबलेल्या यहोवाच्या स्वर्गदूताला म्हटलं: “आम्ही पृथ्वीवर फेरी मारून आलो. आणि पाहा! संपूर्ण पृथ्वी शांत आहे, तिथे कोणतीही खळबळ नाही.”+
१२ त्यावर यहोवाचा स्वर्गदूत म्हणाला: “हे सैन्यांच्या देवा यहोवा, गेल्या ७० वर्षांपासून यरुशलेमवर आणि यहूदाच्या शहरांवर तुझा क्रोध भडकलेला आहे;+ आणखी किती काळ तू त्यांच्यावर दया करणार नाहीस?”+
१३ तेव्हा माझ्याशी बोलणाऱ्या स्वर्गदूताला यहोवाने प्रेमळ आणि सांत्वनदायक शब्दांत उत्तर दिलं. १४ मग तो स्वर्गदूत मला म्हणाला: “अशी घोषणा कर, की ‘सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “मी यरुशलेमचं आणि सीयोनचं आवेशाने, हो मोठ्या आवेशाने रक्षण करीन.+ १५ पण ज्या राष्ट्रांना असं वाटतं की आपण अगदी सुरक्षित आहोत, त्यांच्यावर माझा क्रोध भडकलाय.+ कारण मला माझ्या लोकांना खरंतर कमी शिक्षा करायची होती;+ पण त्या राष्ट्रांनी त्यांचा पूर्णच नाश करून टाकला.”’+
१६ म्हणून यहोवा म्हणतो: ‘“मी पुन्हा एकदा यरुशलेमवर दया करीन.+ तिथे माझं मंदिर पुन्हा बांधलं जाईल.”+ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, की “यरुशलेम पुन्हा बांधण्यासाठी मोजमाप घेतलं जाईल.”’*+
१७ आणखी एकदा अशी घोषणा कर: ‘सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, की “माझ्या शहरांमध्ये पुन्हा एकदा चांगुलपणा ओसंडून वाहील. आणि यहोवा पुन्हा सीयोनचं सांत्वन करेल+ आणि पुन्हा एकदा यरुशलेमची निवड करेल.”’”+
१८ मग मी नजर वर करून पाहिलं आणि मला चार शिंगं दिसली.+ १९ तेव्हा माझ्याशी बोलणाऱ्या स्वर्गदूताला मी विचारलं: “या शिंगांचा काय अर्थ होतो?” तो म्हणाला: “ही ती शिंगं आहेत ज्यांनी यहूदाची,+ इस्राएलची+ आणि यरुशलेमची पांगापांग केली.”+
२० मग यहोवाने मला चार कारागीर दाखवले. २१ मी विचारलं: “हे काय करतील?”
तेव्हा तो म्हणाला: “राष्ट्रांच्या त्या शिंगांनी यहूदाची इतकी पांगापांग केली, की एकालाही आपलं डोकं वर काढता आलं नाही. म्हणून हे कारागीर त्यांच्या मनात दहशत निर्माण करतील, आणि ज्या राष्ट्रांनी आपल्या शिंगांनी यहूदा देशाची पांगापांग केली त्यांची शिंगं ते मोडून टाकतील.”