निर्गम
२० मग देवाने या सर्व आज्ञा सांगितल्या:+
२ “मी तुमचा देव यहोवा आहे. मीच तुम्हाला इजिप्त देशातून, तुमच्या गुलामगिरीच्या घरातून बाहेर आणलं.+ ३ माझ्याशिवाय* तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.+
४ तुम्ही आपल्यासाठी कोरलेली मूर्ती बनवू नका. वर आकाशातल्या, खाली पृथ्वीवरच्या किंवा पृथ्वीच्या खाली असलेल्या जलाशयांमधल्या कशाचीही प्रतिमा* आपल्यासाठी बनवू नका.+ ५ त्यांच्यासमोर वाकू नका किंवा त्यांची उपासना करू नका,+ कारण मी तुमचा देव यहोवा आहे आणि तुम्ही फक्त माझीच उपासना करावी अशी मी अपेक्षा करतो.+ जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना, मी तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या वडिलांच्या अपराधाची शिक्षा देतो. ६ पण जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात,+ त्यांच्या हजाराव्या पिढीलाही मी एकनिष्ठ प्रेम दाखवतो.
७ तुम्ही आपला देव यहोवा याच्या नावाचा दुरुपयोग करू नका,+ कारण जो कोणी त्याच्या नावाचा दुरुपयोग करेल त्याला यहोवा शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.+
८ शब्बाथाचा दिवस पाळायला विसरू नका आणि तो पवित्र माना.+ ९ सहा दिवस कष्ट करून तुमची सगळी कामं करा,+ १० पण सातवा दिवस हा तुमचा देव यहोवा याच्यासाठी शब्बाथाचा दिवस आहे. त्या दिवशी तुम्ही किंवा तुमच्या मुलाने, मुलीने, दासाने, दासीने, तुमच्या गुराढोरांनी, तसंच तुमच्या वस्त्यांमध्ये* राहणाऱ्या विदेश्यानेसुद्धा कोणतंही काम करू नये.+ ११ कारण यहोवाने सहा दिवसांत आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातलं सर्वकाही निर्माण केलं आणि सातव्या दिवशी तो विश्रांती घेऊ लागला.+ म्हणूनच यहोवाने शब्बाथाच्या दिवसाला आशीर्वाद देऊन त्याला पवित्र ठरवलं आहे.
१२ आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,+ म्हणजे जो देश यहोवा तुमचा देव तुम्हाला देईल त्यात तुम्ही बराच काळ जगाल.+
१३ खून करू नका.+
१५ चोरी करू नका.+
१६ शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.+
१७ आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नका. शेजाऱ्याची बायको, त्याचा दास किंवा दासी, त्याचा बैल किंवा गाढव, किंवा त्याच्या मालकीच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नका.”+
१८ त्या वेळी ढगांचा गडगडाट होत होता, विजा चमकत होत्या, शिंगाचा आवाज येत होता आणि पर्वतातून धूर वर जात होता. लोक हे दृश्य पाहत होते आणि हे सर्व पाहून ते थरथर कापू लागले आणि दूर जाऊन उभे राहिले.+ १९ ते मोशेला म्हणाले: “तू आमच्याशी बोल म्हणजे आम्ही तुझं ऐकू. पण, देवाने आमच्याशी बोलू नये, नाहीतर आम्ही मरून जाऊ.”+ २० तेव्हा मोशे लोकांना म्हणाला: “घाबरू नका, कारण तुम्ही नेहमी देवाला भिऊन वागावं आणि पाप करू नये,+ म्हणून खरा देव तुमची परीक्षा घेण्यासाठी आला आहे.”+ २१ त्यानंतर लोक दूरच उभे राहिले; पण मोशे मात्र खरा देव जिथे होता, त्या काळ्या ढगाजवळ गेला.+
२२ मग यहोवा मोशेला म्हणाला: “इस्राएली लोकांना तू असं सांग, ‘मी तुमच्याशी स्वर्गातून बोललो हे तुम्ही स्वतः पाहिलं.+ २३ तुम्ही चांदीचे आणि सोन्याचे देव बनवू नका कारण माझ्याशिवाय तुम्हाला इतर देव नसावेत.+ २४ तुम्ही माझ्यासाठी मातीची वेदी बनवा आणि त्या वेदीवर तुम्ही तुमची होमार्पणं, शांती-अर्पणं, तुमची मेंढरं आणि गुरंढोरं बलिदान म्हणून अर्पण करा. माझ्या नावाची आठवण केली जाण्यासाठी मी जी ठिकाणं निवडीन,+ त्या प्रत्येक ठिकाणी मी येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन. २५ तुम्ही माझ्यासाठी दगडाची वेदी बनवली, तर ती हत्यारांनी फोडलेले दगड वापरून बनवू नका.+ कारण हत्याराचा वापर केला तर तुम्ही तिचा अनादर कराल. २६ तुमची गुप्तांगे* माझ्या वेदीवर दिसू नयेत, म्हणून पायऱ्यांनी चढून माझ्या वेदीवर जाऊ नका.’