करिंथकर यांना पहिलं पत्र
६ तुमच्यापैकी कोणाचा दुसऱ्याशी काही वाद होतो,+ तेव्हा तो सोडवायला पवित्र जनांसमोर न जाता, तुम्ही न्यायालयात अनीतिमान माणसांसमोर जायचं धाडस कसं काय करता? २ पवित्र जन जगाचा न्याय करतील हे तुम्हाला माहीत नाही का?+ आणि जर तुम्ही जगाचा न्याय करणार आहात, तर मग अगदी लहानसहान गोष्टींबद्दल तुम्हाला न्यायनिवाडा करता येत नाही का? ३ आपण स्वर्गदूतांचा न्याय करणार आहोत हे तुम्हाला माहीत नाही का?+ मग सध्याच्या जीवनातल्या सर्वसाधारण समस्या आपण का सोडवू शकत नाही? ४ आणि सध्याच्या जीवनातले प्रश्न सोडवायचे असतात,+ तेव्हा मंडळी ज्यांचा आदर करत नाही, अशांना तुम्ही न्यायाधीश म्हणून का निवडता? ५ तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे बोलत आहे. आपल्या बांधवांमध्ये न्याय करू शकेल, असा एकही बुद्धिमान माणूस तुमच्यात नाही का? ६ त्याऐवजी एक भाऊ दुसऱ्याला न्यायालयात ओढतो, आणि तेसुद्धा विश्वास न ठेवणाऱ्यांपुढे!
७ खरंतर, तुम्ही एकमेकांविरुद्ध खटले भरता याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे हरला आहात. त्याऐवजी, तुम्ही स्वतःचं नुकसान का होऊ देत नाही?+ आणि स्वतःची फसवणूक का होऊ देत नाही? ८ उलट, तुम्ही स्वतःच दुसऱ्याचं नुकसान आणि फसवणूक करता, आणि तीसुद्धा आपल्याच भावांची!
९ अनीतिमान माणसं देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत हे तुम्हाला माहीत नाही का?+ फसू नका. अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे,+ मूर्तिपूजक,+ व्यभिचारी,+ पुरुषवेश्या,*+ समलैंगिक कृत्यं करणारे पुरुष,*+ १० चोर, लोभी,+ दारुडे,+ शिव्याशाप देणारे आणि इतरांना लुबाडणारे देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत.+ ११ तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते. पण तुम्हाला धुऊन शुद्ध करण्यात आलं आहे;+ तुम्हाला पवित्र करण्यात आलं आहे.+ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे आणि आपल्या देवाच्या पवित्र शक्तीद्वारे* तुम्हाला नीतिमान ठरवण्यात आलं आहे.+
१२ माझ्यासाठी सगळ्या गोष्टी कायदेशीर आहेत,* पण सगळ्याच गोष्टी फायद्याच्या आहेत असं नाही.+ माझ्यासाठी सगळ्या गोष्टी कायदेशीर असल्या, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.* १३ अन्न पोटासाठी आणि पोट अन्नासाठी आहे, पण देव या दोन्ही गोष्टी नाहीशा करेल.+ शरीर हे अनैतिक लैंगिक कृत्यांसाठी* नाही, तर प्रभूसाठी आहे+ आणि प्रभू शरीरासाठी आहे. १४ देवाने प्रभूला उठवलं+ आणि तो त्याच्या सामर्थ्याद्वारे+ आपल्यालाही मेलेल्यांतून उठवेल.+
१५ तुमची शरीरं ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत हे तुम्हाला माहीत नाही का?+ मग मी ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव एका वेश्येच्या शरीराशी जोडावेत का? मुळीच नाही! १६ जो वेश्येशी संबंध ठेवतो तो तिच्यासोबत एकदेह होतो, हे तुम्हाला माहीत नाही का? कारण “ते दोघं एकदेह होतील,” असं देव म्हणतो.+ १७ पण जो प्रभूसोबत ऐक्यात असतो, त्याची मनोवृत्ती प्रभूसारखीच होते.+ १८ अनैतिक लैंगिक कृत्यांपासून* दूर पळा!+ माणसाने दुसरं कोणतंही पाप केलं, तर ते तो आपल्या शरीराबाहेर करतो. पण जो अनैतिक लैंगिक कृत्यं करत राहतो, तो स्वतःच्याच शरीराच्या विरोधात पाप करत असतो.+ १९ तुमचं शरीर हे तुमच्यात असलेल्या आणि तुम्हाला देवाकडून मिळालेल्या पवित्र शक्तीचं मंदिर आहे, हे तुम्हाला माहीत नाही का?+ तसंच, तुमची स्वतःवर मालकी नाही,+ २० कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेण्यात आलं आहे.+ म्हणून आपल्या शरीराद्वारे+ सर्व प्रकारे देवाचा गौरव करा.+