१ राजे
११ शलमोन राजाने फारोच्या मुलीशिवाय+ इतर अनेक विदेशी स्त्रियांवरसुद्धा प्रेम केलं;+ त्याने मवाबी,+ अम्मोनी,+ अदोमी, सीदोनी+ आणि हित्ती+ स्त्रियांवर प्रेम केलं. २ या स्त्रिया ज्या राष्ट्रांतल्या होत्या त्यांबद्दल यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं: “तुम्ही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका,* नाहीतर ते नक्की तुमची मनं त्यांच्या दैवतांकडे वळवतील.”+ पण तरीसुद्धा शलमोनने त्यांच्याशी जवळीक साधली आणि त्यांच्यावर प्रेम केलं. ३ शलमोनला ७०० बायका असून त्या राजघराण्यातल्या होत्या. तसंच त्याला ३०० उपपत्नीसुद्धा होत्या. त्याच्या या बायकांनी हळूहळू त्याचं मन देवापासून बहकवलं.* ४ शलमोन वयोवृद्ध झाला+ तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचं मन इतर दैवतांकडे वळवलं.+ त्याचे वडील दावीद यांच्याप्रमाणे, त्याचं मन आपला देव यहोवा याच्याकडे पूर्णपणे नव्हतं.* ५ शलमोन सीदोनी लोकांची देवी अष्टारोथ+ आणि अम्मोनी लोकांचं घृणास्पद दैवत मिलकोम+ यांची उपासना करू लागला. ६ शलमोनने यहोवाच्या नजरेत जे वाईट ते केलं. आणि आपले वडील दावीद यांच्याप्रमाणे त्याने पूर्ण मनाने यहोवाची उपासना केली नाही.+
७ या काळात, शलमोनने यरुशलेमसमोर असलेल्या डोंगरावर मवाबचं घृणास्पद दैवत कमोश आणि अम्मोनी लोकांचं घृणास्पद दैवत+ मोलख+ यांच्यासाठी एकेक उच्च स्थान* बांधलं.+ ८ आपल्या दैवतांना होम-हवन करणाऱ्या आणि बलिदानं अर्पण करणाऱ्या त्याच्या सगळ्या विदेशी बायकांसाठी शलमोनने अशीच उच्च स्थानं बांधली.
९ शलमोनचं मन यहोवापासून बहकल्यामुळे देवाचा क्रोध त्याच्यावर भडकला.+ इस्राएलचा देव यहोवा याने दोन वेळा त्याला दर्शन दिलं होतं,+ १० आणि नेमकं याच गोष्टीबद्दल त्याला बजावून सांगितलं होतं, की त्याने इतर दैवतांची उपासना करू नये.+ पण शलमोनने यहोवाची ही आज्ञा पाळली नाही. ११ मग यहोवा शलमोनला म्हणाला: “तू अशा प्रकारे वागलास आणि मी दिलेल्या कराराचं व कायद्यांचं तू पालन केलं नाहीस; म्हणून आता मी तुझं राज्य नक्की तुझ्यापासून काढून घेईन आणि ते तुझ्या एका सेवकाला देईन.+ १२ पण तुझे वडील दावीद यांना दिलेल्या वचनामुळे मी हे तुझ्या जीवनकाळात करणार नाही, तर तुझ्या मुलाच्या हातून मी ते राज्य काढून घेईन.+ १३ परंतु मी सगळंच राज्य काढून घेणार नाही.+ माझा सेवक दावीद याच्यामुळे आणि मी निवडलेल्या यरुशलेम शहरामुळे+ मी एक वंश तुझ्या मुलाला देईन.”+
१४ मग यहोवाने शलमोनच्या विरोधात अदोमी हदाद याला उभं केलं;+ तो अदोमच्या राजघराण्यातला होता.+ १५ दावीदने अदोमच्या लोकांना हरवल्यानंतर+ जेव्हा सेनापती यवाब युद्धात मेलेल्या लोकांना पुरायला गेला, तेव्हा यवाबने अदोमच्या सर्व पुरुषांना* मारून टाकण्याचा प्रयत्न केला. १६ (कारण अदोममधल्या प्रत्येक पुरुषाला मारून टाकेपर्यंत यवाब आणि सर्व इस्राएली सैनिक सहा महिने तिथेच राहिले.) १७ पण हदाद मात्र आपल्या वडिलांच्या अदोमी सेवकांसोबत इजिप्तला पळून गेला; त्या वेळी हदाद लहान मुलगा होता. १८ ते मिद्यान इथून निघून पारानमध्ये आले. मग पारानमधून+ काही माणसं आपल्यासोबत घेऊन ते इजिप्तमध्ये फारो राजाकडे गेले. राजाने हदादला राहायला घर दिलं, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि त्याला जमीनही दिली. १९ फारो राजा हदादवर इतका खूश होता की त्याने त्याचं लग्न आपल्या बायकोच्या बहिणीशी, म्हणजे तहपनेस राणीच्या* बहिणीशी लावून दिलं. २० काही काळाने तहपनेसच्या बहिणीने हदादच्या मुलाला, गनुबथला जन्म दिला. तहपनेसने फारोच्या राजमहालात त्याचं संगोपन केलं आणि तो फारोच्या घरात त्याच्या मुलांमध्ये राहिला.
२१ इजिप्तमध्ये असताना हदादने ऐकलं, की दावीदचा मृत्यू झाला आहे*+ आणि त्याचा सेनापती यवाबसुद्धा मरण पावला आहे.+ म्हणून हदाद फारोला म्हणाला: “मला माझ्या देशात परत जाऊ द्या.” २२ पण फारो त्याला म्हणाला: “तुला तुझ्या देशात परत का जायचंय? इथे माझ्याकडे तुला काय कमी आहे?” त्यावर तो म्हणाला: “कसलीच नाही. पण तरीसुद्धा मला जाऊ द्या.”
२३ देवाने शलमोनच्या विरोधात आणखी एकाला, म्हणजे एल्यादाचा मुलगा रजोन याला उभं केलं;+ तो आपल्या प्रभूपासून, सोबाचा राजा हदद-एजर+ याच्यापासून पळून गेला होता. २४ दावीदने सोबाच्या लोकांना हरवलं,* तेव्हा रजोनने काही माणसं गोळा केली आणि तो लूटमार करणाऱ्या या टोळीचा प्रमुख बनला.+ ते सगळे दिमिष्कमध्ये+ जाऊन स्थायिक झाले आणि तिथे राज्य करू लागले. २५ शलमोन जिवंत होता तोपर्यंत रजोनने इस्राएलचा विरोध केला. हदादप्रमाणेच त्यानेसुद्धा इस्राएलला त्रास दिला. रजोनने सीरियावर राज्य केलं आणि तो इस्राएलचा तिरस्कार करत राहिला.
२६ यासोबतच, शलमोनचा सेवक+ यराबाम+ यानेही त्याच्याविरुद्ध बंड केलं.+ तो नबाटचा मुलगा असून एफ्राईम वंशाचा होता आणि सरेदा इथला राहणारा होता. त्याच्या आईचं नाव सरूया होतं आणि ती एक विधवा होती. २७ यराबामने राजाविरुद्ध बंड केलं त्याचं कारण हे होतं: शलमोनने टेकडी*+ बांधून आपल्या वडिलांच्या शहराच्या, म्हणजे दावीदपुराच्या+ भिंतीला पडलेली खिंडार बुजवली होती. २८ यराबाम हा एक कर्तबगार माणूस होता. त्याची मेहनती वृत्ती पाहून शलमोनने त्याला सक्तीची मजुरी करणाऱ्या योसेफच्या घराण्यातल्या लोकांवर देखरेख करण्यासाठी नेमलं होतं.+ २९ त्या काळात यराबाम यरुशलेममधून बाहेर गेला. रस्त्याने जात असताना त्याला शिलो इथला अहीया+ संदेष्टा भेटला. तेव्हा त्या दोघांशिवाय तिथे कोणीही नव्हतं. त्या वेळी अहीयाने एक नवीन झगा घातला होता. ३० अहीयाने आपल्या अंगावरचा तो नवीन झगा काढून फाडला आणि त्याचे १२ तुकडे केले. ३१ मग तो यराबामला म्हणाला:
“यातले दहा तुकडे घे, कारण इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: ‘मी शलमोनच्या हातून राज्य काढून घेतोय. आणि त्यातले दहा वंश मी तुला देईन.+ ३२ पण माझा सेवक दावीद याच्यामुळे+ आणि इस्राएलच्या सर्व वंशांतून निवडलेल्या यरुशलेम शहरामुळे+ मी एक वंश त्याच्याकडेच राहू देईन.+ ३३ मी असं करीन कारण त्यांनी मला सोडून दिलंय.+ आणि ते सीदोनी लोकांची देवी अष्टारोथ, मवाबी लोकांचं दैवत कमोश आणि अम्मोनी लोकांचं दैवत मिलकोम यांच्या पाया पडत आहेत. शलमोनचे वडील दावीद यांच्याप्रमाणे ते माझ्या मार्गांनुसार चालले नाहीत. त्यांनी माझ्या दृष्टीने जे योग्य ते केलं नाही आणि माझ्या कायद्यांचं व नियमांचंही पालन केलं नाही. ३४ पण मी त्याच्या हातून सगळंच राज्य काढून घेणार नाही. तो जिवंत असेपर्यंत मी त्याला प्रधान म्हणून राहू देईन. माझा निवडलेला सेवक दावीद याच्यामुळे मी असं करीन.+ कारण दावीदने माझ्या आज्ञांचं आणि कायद्यांचं पालन केलं. ३५ पण मी त्याच्या मुलाच्या हातून राज्य काढून घेईन आणि त्यातले दहा वंश तुला देईन.+ ३६ त्याच्या मुलाला मी एक वंश देईन. म्हणजे मी माझ्या नावाच्या गौरवासाठी निवडलेल्या यरुशलेम शहरात, माझ्यासमोर माझा सेवक दावीद याच्या वंशाचा दिवा कायम राहील.+ ३७ मी तुझी नेमणूक करीन आणि तू संपूर्ण इस्राएलचा राजा बनशील. तुला हवं त्या सगळ्यावर तू राज्य करशील. ३८ तू जर माझा सेवक दावीद याच्यासारखंच मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्यास, माझ्या मार्गांवर चालत राहिलास आणि माझ्या कायद्यांचं व आज्ञांचं पालन करून माझ्या दृष्टीने योग्य ते करत राहिलास,+ तर मी तुझ्याही सोबत असेन. आणि दावीदप्रमाणेच तुझंही राजघराणं मी कायमचं स्थापन करीन+ आणि तुला इस्राएलचा राजा बनवीन. ३९ मी दावीदच्या वंशजांना, त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांमुळे शरमेने मान खाली घालायला लावीन;+ पण मी हे कायमसाठी करणार नाही.’”+
४० म्हणून मग शलमोनने यराबामला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. पण यराबाम इजिप्तच्या राजाकडे,+ शिशककडे+ पळून गेला. आणि शलमोनचा मृत्यू होईपर्यंत तो तिथेच इजिप्तमध्ये राहिला.
४१ शलमोनबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याच्या बुद्धीबद्दल आणि त्याने जे काही केलं त्याबद्दलची सर्व माहिती शलमोनच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे.+ ४२ शलमोनने यरुशलेममधून संपूर्ण इस्राएलवर एकूण ४० वर्षं राज्य केलं. ४३ पुढे शलमोनचा मृत्यू झाला* आणि त्याला त्याच्या वडिलांच्या शहरात, म्हणजे दावीदपुरात दफन करण्यात आलं. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा रहबाम+ हा राजा बनला.