मत्तयने सांगितलेला संदेश
१६ तेव्हा परूशी आणि सदूकी लोक त्याच्याजवळ येऊन त्याची परीक्षा पाहण्यासाठी, आम्हाला स्वर्गातून एखादं चिन्ह दाखवा असं म्हणू लागले.+ २ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “संध्याकाळी तुम्ही म्हणता, ‘हवामान चांगलं असेल, कारण आकाश तांबडं आहे.’ ३ तसंच, सकाळी तुम्ही म्हणता, की ‘आज थंड आणि पावसाळी हवामान असेल, कारण आकाश तांबडं असलं, तरी ढगाळ आहे.’ आकाशाकडे पाहून तुम्हाला हवामानाचा अंदाज तर लावता येतो, पण काळाची चिन्हं पाहून त्यांचा अर्थ तुम्हाला लावता येत नाही. ४ ही दुष्ट आणि व्यभिचारी* पिढी सतत चिन्ह मागत राहते. पण, योनाच्या चिन्हाशिवाय+ दुसरं कोणतंही चिन्ह या पिढीला दिलं जाणार नाही.”+ असं म्हणून तो त्यांना सोडून तिथून निघून गेला.
५ नंतर शिष्य पलीकडे गेले, पण ते आपल्यासोबत भाकरी घ्यायला विसरले.+ ६ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “जागे राहा आणि परूशी आणि सदूकी लोकांच्या खमिरापासून* सांभाळा.”+ ७ त्यामुळे ते आपसात चर्चा करत म्हणाले: “आपण तर भाकरी घेतल्याच नाहीत.” ८ पण येशू हे ओळखून म्हणाला: “अरे अल्पविश्वासी माणसांनो!* भाकरी नाहीत म्हणून तुम्ही आपसात चर्चा का करताय? ९ मला काय सांगायचंय हे तुम्हाला कळत नाही का? मी पाच भाकऱ्यांनी ५,००० माणसांना जेवायला दिलं होतं, हे तुम्हाला आठवत नाही का? आणि त्या वेळी उरलेल्या अन्नाच्या किती टोपल्या तुम्ही भरून घेतल्या होत्या?+ १० आणि सात भाकऱ्यांनी मी कसं ४,००० माणसांना जेवायला दिलं, हे तुम्ही विसरलात का? आणि त्या वेळी उरलेल्या अन्नाच्या किती टोपल्या* तुम्ही भरून घेतल्या होत्या?+ ११ मग मी भाकरींबद्दल बोलत नव्हतो हे तुमच्या लक्षात कसं येत नाही? परूशी आणि सदूकी लोकांच्या खमिरापासून* सांभाळा!”+ १२ तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात आलं, की तो भाकरीच्या खमिराबद्दल नाही, तर परूशी आणि सदूकी लोकांच्या शिकवणीबद्दल बोलत होता.
१३ मग, कैसरीया फिलिप्पैच्या भागात आल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारलं: “मनुष्याचा मुलगा कोण आहे असं लोक म्हणतात?”+ १४ ते म्हणाले: “काही जण म्हणतात बाप्तिस्मा देणारा योहान,+ तर काही म्हणतात एलीया.+ पण इतर जण म्हणतात की तो यिर्मया किंवा दुसरा एखादा संदेष्टा असेल.” १५ यावर तो त्यांना म्हणाला: “पण तुम्हाला काय वाटतं, मी कोण आहे?” १६ तेव्हा शिमोन पेत्रने उत्तर दिलं: “तू ख्रिस्त,+ जिवंत देवाचा मुलगा आहेस.”+ १७ येशू त्याला म्हणाला: “शिमोन, योनाच्या मुला, तू खरंच आशीर्वादित आहेस! कारण कोणत्याही माणसाने* नाही, तर स्वर्गातल्या माझ्या पित्याने तुला हे प्रकट केलंय.+ १८ तसंच, मी तुला सांगतो: तू पेत्र आहेस+ आणि या खडकावर+ मी आपली मंडळी उभारीन. कबरेचे* दरवाजे तिच्यावर विजयी ठरणार नाहीत. १९ मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. तू पृथ्वीवर जे बांधशील ते स्वर्गात आधीच बांधलेलं असेल आणि तू पृथ्वीवर जे मोकळं करशील ते स्वर्गात आधीच मोकळं केलेलं असेल.” २० मग त्याने शिष्यांना बजावून सांगितलं की तो ख्रिस्त आहे, हे त्यांनी कोणालाही सांगू नये.+
२१ त्या वेळेपासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला, की त्याला यरुशलेमला जावं लागेल. तिथे वडीलजनांकडून, मुख्य याजकांकडून तसंच शास्त्र्यांकडून त्याला बराच छळ सोसावा लागेल. शेवटी त्याला ठार मारलं जाईल आणि तिसऱ्या दिवशी उठवलं जाईल.+ २२ तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन गेला आणि रागावून म्हणाला: “हे काय बोलतोस प्रभू?* तुला नक्कीच असं काही होणार नाही.”+ २३ पण येशूने पेत्रकडे पाठ फिरवली आणि तो म्हणाला: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा!* तू माझ्यासाठी अडखळण आहेस. कारण तुझे विचार देवाचे नाहीत तर माणसांचे आहेत.”+
२४ मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे चालत राहावं.+ २५ कारण जो आपला जीव* वाचवायचा प्रयत्न करतो, तो आपला जीव* गमावून बसेल. पण जो माझ्यासाठी आपला जीव* गमावतो त्याला तो मिळेल.+ २६ शेवटी, एखाद्या माणसाने संपूर्ण जग मिळवलं, पण आपला जीव* गमावला तर त्याचा काय उपयोग?+ किंवा, आपल्या जिवाच्या* मोबदल्यात माणूस काय देऊ शकेल?+ २७ कारण मनुष्याचा मुलगा आपल्या पित्याच्या गौरवात, आपल्या दूतांसोबत येणार आहे. तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वागणुकीप्रमाणे प्रतिफळ देईल.+ २८ मी तुम्हाला खरं सांगतो, इथे उभे असलेल्यांपैकी काही जण असे आहेत, की जोपर्यंत ते मनुष्याच्या मुलाला त्याच्या राज्यात येताना पाहत नाहीत, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”+