एज्रा
८ अर्तहशश्त राजाच्या शासनकाळात+ जे कुळांचे प्रमुख माझ्यासोबत बाबेलवरून निघाले आणि ज्यांची आपापल्या वंशावळीप्रमाणे नोंदणी करण्यात आली त्यांची नावं पुढीलप्रमाणे आहेत: २ फिनहासच्या मुलांपैकी+ गेर्षोम; इथामारच्या+ मुलांपैकी दानीएल; दावीदच्या मुलांपैकी हत्तूश; ३ परोशच्या मुलांमधला शखन्याह, याच्या मुलांपैकी असलेला जखऱ्या आणि त्याच्यासोबत १५० पुरुषांची नोंदणी करण्यात आली; ४ पहथ-मवाबच्या मुलांपैकी,+ जरहयाहचा मुलगा एल्याहो-वेनय आणि त्याच्यासोबत २०० पुरुष; ५ जत्तूच्या मुलांपैकी,+ यहजिएलचा मुलगा शखन्याह आणि त्याच्यासोबत ३०० पुरुष; ६ आदीनच्या मुलांपैकी,+ योनाथानचा मुलगा एबद आणि त्याच्यासोबत ५० पुरुष; ७ एलामच्या मुलांपैकी,+ अथल्याचा मुलगा यशाया आणि त्याच्यासोबत ७० पुरुष; ८ शपत्याहच्या मुलांपैकी,+ मीखाएलचा मुलगा जबद्याह आणि त्याच्यासोबत ८० पुरुष; ९ यवाबच्या मुलांपैकी, यहीएलचा मुलगा ओबद्या आणि त्याच्यासोबत २१८ पुरुष; १० बानीच्या मुलांपैकी, योसिफ्याहचा मुलगा शलोमीथ आणि त्याच्यासोबत १६० पुरुष; ११ बेबाईच्या मुलांपैकी+ जखऱ्या, जो बेबाईचा मुलगा होता आणि त्याच्यासोबत २८ पुरुष; १२ अजगादच्या मुलांपैकी,+ हक्काटानचा मुलगा योहानान आणि त्याच्यासोबत ११० पुरुष; १३ अदोनीकामच्या मुलांपैकी,+ जे शेवटी परत आले त्यांची नावं अशी: अलीफलेट, ईयेल व शमाया आणि त्यांच्यासोबत ६० पुरुष; १४ बिग्वईच्या मुलांपैकी,+ ऊथय व जब्बूद आणि त्यांच्यासोबत ७० पुरुष.
१५ मी त्या सर्वांना अहवा+ या ठिकाणाकडे वाहणाऱ्या नदीच्या काठावर एकत्र केलं आणि आम्ही तिथे तीन दिवस मुक्काम केला. पण जेव्हा मी लोकांची आणि याजकांची तपासणी केली, तेव्हा मला त्यांच्यात कोणी लेवी मिळाले नाहीत. १६ म्हणून मी लोकांच्या प्रमुखांना, म्हणजे अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारिब, एलनाथान, नाथान, जखऱ्या आणि मशुल्लाम यांना बोलावलं. तसंच, योयोरीब आणि एलनाथान या शिक्षकांनाही मी बोलावलं. १७ मग मी त्यांना कासिफ्या या ठिकाणाचा पुढारी इद्दो याच्याकडे जायची आज्ञा दिली. त्यांनी कासिफ्या इथे राहणाऱ्या आणि मंदिरात सेवक* असलेल्या इद्दोला आणि त्याच्या भावांना, आपल्या देवाच्या मंदिरासाठी सेवक आणायला सांगावं, अशी मी त्यांना आज्ञा दिली. १८ आपला देव आमच्यासोबत असल्यामुळे,* त्यांनी इस्राएलचा मुलगा लेवी याचा नातू महली,+ याच्या मुलांपैकी शेरेब्याह+ याला आमच्याकडे आणलं. तो एक बुद्धिमान माणूस होता आणि त्याच्यासोबत त्याची मुलं व त्याचे भाऊ असे एकूण १८ पुरुष होते. १९ तसंच, हशब्याह आणि त्याच्यासोबत मरारी+ लोकांपैकी यशाया व त्याचे भाऊ आणि त्यांची मुलं, असे २० पुरुषही आले. २० शिवाय, मंदिरातल्या सेवकांपैकी* २२० पुरुष होते. त्यांना दावीदने आणि अधिकाऱ्यांनी लेव्यांच्या सेवेसाठी दिलं होतं आणि त्या सर्वांची नावं नोंदवण्यात आली होती.
२१ मग आम्ही आपल्या देवासमोर स्वतःला नम्र करण्यासाठी, तसंच, त्याने प्रवासात आमचं मार्गदर्शन करावं; शिवाय आमचं, आमच्या मुलाबाळांचं आणि आमच्या सर्व सामानाचं रक्षण करावं, म्हणून मी अहवा नदीजवळ उपासाची घोषणा केली. २२ मार्गात शत्रूंपासून आमचं रक्षण करण्यासाठी, राजाकडे सैनिक आणि घोडेस्वार मागण्याची मला लाज वाटली. कारण आम्ही राजाला असं म्हणालो होतो: “जे आमच्या देवाचा शोध घेतात त्या सर्वांसोबत तो असतो.+ पण जे त्याला सोडून देतात, त्यांच्यावर त्याचा क्रोध भडकतो आणि त्यांच्याविरुद्ध तो आपली शक्ती दाखवतो.”+ २३ म्हणून आम्ही उपास करून याबद्दल आपल्या देवाकडे विनंती केली आणि त्याने आमची याचना ऐकली.+
२४ मग मी याजकांपैकी १२ प्रमुखांना, म्हणजे शेरेब्याह व हशब्याह+ आणि त्यांच्या भावांपैकी १० जणांना निवडलं. २५ राजाने, त्याच्या सल्लागारांनी, त्याच्या अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या सर्व इस्राएली लोकांनी आमच्या देवाच्या मंदिरासाठी दिलेल्या दानातून, मी त्यांना सोनं, चांदी आणि भांडी तोलून दिली.+ २६ अशा प्रकारे, मी त्यांना ६५० तालान्त* चांदी, २ तालान्त वजनाची १०० चांदीची भांडी, १०० तालान्त सोनं, २७ तसंच, १,००० दारिक* किमतीच्या २० सोन्याच्या वाट्या आणि सोन्याइतकीच मौल्यवान असलेली, चमकणाऱ्या चांगल्या तांब्याची २ भांडी दिली.
२८ मग मी त्यांना म्हणालो: “तुम्ही यहोवाच्या नजरेत पवित्र आहात+ आणि ही भांडीही पवित्र आहेत. तसंच, हे सोनंचांदी, तुमच्या वाडवडिलांचा देव यहोवा याला स्वेच्छेने दिलेलं अर्पण आहे. २९ म्हणून जोपर्यंत यरुशलेममधल्या यहोवाच्या मंदिरातल्या कोठारांमध्ये,* तुम्ही याजकांचे प्रमुख, लेवी, तसंच इस्राएलच्या कुळांचे प्रमुख यांच्यासमोर या वस्तू तोलून देत नाही,+ तोपर्यंत त्यांचं काळजीपूर्वक रक्षण करा.” ३० तेव्हा याजक आणि लेवी यांना मी तोलून दिलेलं सोनं, चांदी आणि भांडी, त्यांनी यरुशलेममध्ये आमच्या देवाच्या मंदिरात नेण्यासाठी आपल्या ताब्यात घेतली.
३१ शेवटी, पहिल्या महिन्याच्या १२ व्या दिवशी+ आम्ही अहवा+ नदीजवळून तळ हलवला आणि यरुशलेमला जायला निघालो. आमचा देव आमच्यासोबत असल्यामुळे, त्याने मार्गात शत्रूंपासून आणि लुटारूंपासून आमचं रक्षण केलं. ३२ मग आम्ही यरुशलेमला आलो+ आणि तीन दिवस तिथे राहिलो. ३३ चौथ्या दिवशी आम्ही सोनंचांदी आणि भांडी, आमच्या देवाच्या मंदिरात, उरीया याजकाचा मुलगा मरेमोथ+ याला तोलून दिली.+ त्याच्यासोबत फिनहासचा मुलगा एलाजार, तसंच, येशूवाचा मुलगा योजाबाद+ व बिन्नुईचा+ मुलगा नोअद्या हे लेवीही होते. ३४ सर्व वस्तू मोजून त्यांचं वजन करण्यात आलं आणि ते लिहून ठेवण्यात आलं. ३५ बंदिवासातून बाहेर आलेल्यांनी इस्राएलच्या देवासाठी होमार्पणं दिली; त्यांनी सर्व इस्राएली लोकांसाठी १२ बैल;+ तसंच ९६ मेंढे,+ ७७ कोकरं आणि पापार्पण म्हणून १२ बकरे+ दिले. हे सर्व यहोवाला दिलेलं होमार्पण होतं.+
३६ मग आम्ही राजाचं फर्मान+ नदीपलीकडच्या*+ त्याच्या सुभेदारांना* आणि राज्यपालांना दिलं आणि त्यांनी लोकांना मदत केली आणि खऱ्या देवाच्या मंदिराच्या कामात सर्व प्रकारे हातभार लावला.+