योहानला झालेलं प्रकटीकरण
१२ मग स्वर्गात एक मोठं चिन्ह दिसलं: सूर्य पांघरलेली, पायांखाली चंद्र असलेली आणि डोक्यावर १२ ताऱ्यांचा मुकुट असलेली एक स्त्री+ होती. २ ती गरोदर होती आणि प्रसूतीच्या वेदनांमुळे व्याकूळ होऊन ओरडत होती.
३ स्वर्गात दुसरं एक चिन्ह दिसलं. पाहा! सात डोकी आणि दहा शिंगं असलेला आणि डोक्यांवर सात मुकुट असलेला अग्नीच्या रंगाचा एक मोठा अजगर+ दिसला. ४ त्याच्या शेपटीने आकाशातले एकतृतीयांश तारे+ ओढले आणि पृथ्वीवर टाकले.+ आणि जन्म देण्याच्या बेतात असलेल्या स्त्रीचं+ मूल जन्मताच खाऊन टाकावं म्हणून तो अजगर तिच्यासमोरच उभा राहिला.
५ त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला.+ तो सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवेल.+ त्या स्त्रीच्या मुलाला हिसकावून घेऊन देवाकडे आणि त्याच्या राजासनाकडे नेण्यात आलं. ६ आणि ती स्त्री ओसाड रानात पळून गेली. तिथे १,२६० दिवस+ तिचं पालनपोषण व्हावं म्हणून देवाने तिच्यासाठी एक ठिकाण तयार केलं होतं.
७ मग, स्वर्गात युद्ध सुरू झालं: मीखाएल*+ आणि त्याचे दूत अजगराविरुद्ध लढले आणि अजगर आणि त्याचे दूतही लढले. ८ पण, त्यांचं काही चाललं नाही* आणि त्यापुढे स्वर्गात त्यांच्यासाठी कोणतंही स्थान उरलं नाही. ९ त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना फसवणाऱ्या+ त्या मोठ्या अजगराला,+ म्हणजेच दियाबल+ आणि सैतान+ म्हटलेल्या त्या जुन्या सापाला+ खाली फेकण्यात आलं. त्याला पृथ्वीवर फेकून देण्यात आलं+ आणि त्याच्यासोबत त्याच्या दूतांनाही फेकण्यात आलं. १० तेव्हा, स्वर्गातून आलेला एक मोठा आवाज मी ऐकला. तो म्हणाला:
“आता आमच्या देवाकडून मिळणारं तारण,+ त्याचं सामर्थ्य, राज्य+ आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार स्थापन झाला आहे. कारण आमच्या बांधवांवर दोष लावणाऱ्याला खाली फेकण्यात आलं आहे. तो रात्रंदिवस आमच्या देवासमोर त्यांच्यावर दोष लावत असतो!+ ११ आणि त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे+ आणि आपण घोषित केलेल्या संदेशामुळे*+ त्याला जिंकलं+ आणि मृत्यूचा सामना करत असतानाही त्यांनी स्वतःच्या जिवांची* पर्वा केली नाही.+ १२ त्यामुळे स्वर्गांनो आणि त्यात राहणाऱ्यांनो आनंद साजरा करा! पृथ्वी आणि समुद्र यांच्यावर मात्र मोठी विपत्ती ओढवली आहे.+ कारण आपला फार कमी वेळ उरला आहे+ हे ओळखून सैतान* खूप क्रोधित होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.”
१३ आपल्याला खाली पृथ्वीवर फेकण्यात आलं+ आहे असं अजगराने पाहिलं, तेव्हा ज्या स्त्रीने मुलाला जन्म दिला होता तिचा त्याने छळ केला.+ १४ पण, त्या स्त्रीने ओसाड रानात आपल्या ठिकाणी उडून जावं म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख+ देण्यात आले. तिथे सापाच्या+ तोंडापासून दूर राहून एक काळ, दोन काळ आणि अर्धा काळ*+ तिचं पालनपोषण होणार होतं.
१५ आणि ती स्त्री वाहून जावी म्हणून सापाने तिच्यामागून नदीसारखा पाण्याचा प्रवाह आपल्या तोंडातून सोडला. १६ पण, पृथ्वीने स्त्रीची मदत केली आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी पृथ्वीने आपलं तोंड उघडून गिळून टाकली. १७ त्यामुळे, अजगर स्त्रीवर संतापला आणि तिच्या संततीपैकी* जे उरले आहेत,+ म्हणजे जे देवाच्या आज्ञांचं पालन करतात आणि ज्यांना येशूबद्दल साक्ष देण्याचं कार्य नेमण्यात आलं आहे, त्यांच्यासोबत युद्ध करायला निघून गेला.+