लूकने सांगितलेला संदेश
२० एक दिवशी तो मंदिरात शिकवत असताना आणि आनंदाचा संदेश सांगत असताना, मुख्य याजक आणि शास्त्री, वडीलजनांसोबत त्याच्याजवळ आले. २ ते त्याला म्हणाले: “तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस? कोणी दिला तुला हा अधिकार?”+ ३ तो त्यांना म्हणाला: “मीही तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला त्याचं उत्तर द्या: ४ योहानने दिलेला बाप्तिस्मा देवापासून* होता की माणसांपासून?” ५ तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले: “‘देवापासून’ असं म्हटलं तर तो म्हणेल, की ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ ६ पण ‘माणसांपासून’ असं म्हटलं तर सगळे लोक आपल्याला दगडमार करतील. कारण योहान संदेष्टा होता अशी त्यांची पक्की खातरी आहे.”+ ७ म्हणून, त्याचा बाप्तिस्मा कोणापासून होता हे आपल्याला माहीत नाही, असं त्यांनी उत्तर दिलं. ८ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हाला सांगणार नाही.”
९ त्यानंतर त्याने लोकांना हे उदाहरण सांगितलं: “एका माणसाने द्राक्षमळा लावला+ आणि माळ्यांना त्याचा ठेका देऊन तो बऱ्याच काळासाठी परदेशी निघून गेला.+ १० फळांचा हंगाम आला, तेव्हा त्याने द्राक्षमळ्याच्या फळांपैकी काही फळं मागण्यासाठी एका दासाला माळ्यांकडे पाठवलं. पण त्यांनी त्याला धरून बेदम मारलं आणि रिकाम्या हाती पाठवलं.+ ११ मग त्याने आणखी एका दासाला पाठवलं. पण त्यांनी त्यालाही मारलं आणि त्याचा अपमान करून रिकाम्या हाती पाठवून दिलं. १२ पुन्हा त्याने तिसऱ्या दासाला पाठवलं. तेव्हा त्यांनी त्याला जखमी करून बाहेर टाकून दिलं. १३ मग द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, ‘आता मी काय करू? मी माझ्या लाडक्या मुलाला पाठवतो.+ कदाचित ते त्याचा मान राखतील.’ १४ पण मुलाला पाहून माळी आपसात म्हणू लागले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण याला मारून टाकू म्हणजे याच्या वारशाची जमीन आपली होईल.’ १५ म्हणून त्यांनी त्याला द्राक्षमळ्याबाहेर नेऊन मारून टाकलं.+ मग द्राक्षमळ्याचा मालक त्यांचं काय करेल? १६ तो येऊन त्या माळ्यांना ठार मारेल आणि द्राक्षमळ्याचा ताबा दुसऱ्यांना देईल.”
हे ऐकून ते म्हणाले: “असं कधीही न घडो!” १७ पण त्यांच्यावर नजर रोखून तो म्हणाला: “तर मग, ‘बांधकाम करणाऱ्यांनी जो दगड नाकारला, तोच कोपऱ्याचा मुख्य दगड* बनलाय’ असं जे लिहिण्यात आलं होतं, त्याचा काय अर्थ होतो?+ १८ या दगडावर जो पडेल त्याचा चुराडा होईल.+ आणि ज्या कोणावर तो पडेल त्याला तो चिरडून टाकेल.”
१९ खरंतर, शास्त्री आणि मुख्य याजक यांना त्याच वेळी त्याला पकडायची इच्छा होती. कारण त्याने हे उदाहरण आपल्यालाच मनात ठेवून दिलं हे त्यांना माहीत होतं. पण ते लोकांना घाबरत होते.+ २० मग त्यांनी त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं आणि गुप्तपणे पैसे देऊन विकत घेतलेल्या काही माणसांना त्याच्याकडे पाठवलं. त्या माणसांनी प्रामाणिक असल्याचं ढोंग करून त्याला बोलण्यात पकडावं, म्हणून त्यांनी तसं केलं.+ खरंतर त्याला सरकारच्या आणि राज्यपालाच्या हवाली करायचा त्यांचा उद्देश होता. २१ तेव्हा त्या माणसांनी त्याला असा प्रश्न विचारला: “गुरू, तुम्ही नेहमी योग्य तेच बोलता आणि शिकवता. तुम्ही पक्षपात करत नाही, तर देवाचा मार्ग अगदी खरेपणाने शिकवता. २२ म्हणून आम्हाला सांगा, कैसराला* कर देणं नियमाप्रमाणे योग्य आहे की नाही?” २३ पण त्यांचा धूर्तपणा ओळखून तो त्यांना म्हणाला: २४ “मला दिनाराचं* नाणं दाखवा. हे चित्र आणि यावर लिहिलेलं नाव कोणाचं आहे?” ते म्हणाले: “कैसराचं.” २५ तो त्यांना म्हणाला: “मग, जे कैसराचं आहे ते कैसराला द्या,+ पण जे देवाचं आहे ते देवाला द्या.”+ २६ अशा रितीने, त्यांना लोकांसमोर त्याला शब्दांत पकडता आलं नाही. उलट, त्याचं उत्तर ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं आणि ते काहीही बोलू शकले नाहीत.
२७ पण, पुनरुत्थान* होत नाही असं म्हणणाऱ्या सदूकी* लोकांपैकी+ काही जण त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याला विचारलं:+ २८ “गुरुजी, मोशेने आमच्यासाठी असं लिहून ठेवलंय, की ‘एखाद्या माणसाच्या भावाचा मृत्यू झाला, आणि त्याची बायको मागे राहिली, पण त्याला मूलबाळ नसलं, तर त्याच्या भावाने त्याच्या बायकोशी लग्न करावं आणि आपल्या भावाचा वंश चालवावा.’+ २९ एका कुटुंबात सात भाऊ होते. पहिल्याचं लग्न झालं, पण मूलबाळ नसतानाच त्याचा मृत्यू झाला. ३० मग दुसऱ्याने ३१ आणि तिसऱ्याने आणि अशा प्रकारे सातही भावांनी तिच्याशी लग्न केलं. पण ते सगळे मूलबाळ न होताच मेले. ३२ शेवटी त्या स्त्रीचाही मृत्यू झाला. ३३ तर मग, पुनरुत्थान झाल्यावर ती कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केलं होतं.”
३४ येशू त्यांना म्हणाला: “या जगाच्या व्यवस्थेची* मुलं लग्न करतात आणि त्यांची लग्नं करून दिली जातात. ३५ पण ज्यांना येणाऱ्या व्यवस्थेत जाण्यासाठी आणि मेलेल्यांतून उठवलं जाण्यासाठी योग्य समजलं गेलंय, ते लग्न करणार नाहीत आणि त्यांचं लग्न करून दिलं जाणार नाही.+ ३६ खरंतर, ते कधीही मरणार नाहीत, कारण ते स्वर्गदूतांसारखे असतील आणि मेलेल्यांतून उठवण्यात आल्यामुळे त्यांना देवाची मुलं म्हटलं जाईल. ३७ पण मेलेल्यांना पुन्हा उठवलं जाईल याबद्दल मोशेनेही झुडपाच्या अहवालात सांगितलं होतं. तिथे त्याने यहोवाला,* ‘अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव’ म्हटलं.+ ३८ तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. कारण त्याच्या दृष्टीने ते सगळे जिवंतच आहेत.”+ ३९ हे ऐकून शास्त्र्यांपैकी काही जण म्हणाले: “गुरुजी, तुम्ही योग्यच बोललात.” ४० यानंतर त्याला एकही प्रश्न विचारायचं त्यांचं धाडस झालं नाही.
४१ तेव्हा त्याने त्यांना विचारलं: “ख्रिस्त दावीदचा मुलगा आहे असं लोक कसं काय म्हणतात?+ ४२ कारण स्तोत्रांच्या पुस्तकात दावीदने स्वतःच असं म्हटलं होतं, ‘यहोवा* माझ्या प्रभूला म्हणाला: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखालचं आसन करेपर्यंत ४३ माझ्या उजव्या हाताला बस.”’+ ४४ इथे दावीद त्याला प्रभू म्हणतो. मग, तो त्याचा मुलगा कसा काय असू शकतो?”
४५ सगळे लोक त्याचं ऐकत असताना तो आपल्या शिष्यांना म्हणाला: ४६ “शास्त्र्यांपासून सांभाळून राहा. त्यांना लांबलांब झगे घालून मिरवायला आणि बाजारांत लोकांकडून नमस्कार घ्यायला आवडतं. त्यांना सभास्थानांत पुढच्या* आसनांवर आणि मेजवान्यांत सगळ्यात महत्त्वाच्या जागांवर बसायला आवडतं.+ ४७ ते विधवांची मालमत्ता* हडपतात आणि लोकांना दाखवायला लांबलचक प्रार्थना करतात. त्यांना जास्त कठोर शिक्षा मिळेल.”