उत्पत्ती
३२ मग याकोब पुढच्या प्रवासाला निघाला आणि वाटेत त्याला देवाचे दूत भेटले. २ त्यांना पाहताच याकोब म्हणाला: “ही देवाच्या सैन्याची छावणी आहे!” म्हणून त्याने त्या जागेचं नाव महनाइम* ठेवलं.
३ नंतर याकोबने आपल्या सेवकांना सेईर+ देशातल्या अदोमच्या प्रदेशात,+ आपला भाऊ एसाव याच्याकडे निरोप घेऊन पाठवलं. ४ त्याने त्यांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही माझा प्रभू एसाव याला असं सांगा, ‘तुझा सेवक याकोब म्हणतो: “मी लाबानसोबत बराच काळ राहिलो,*+ ५ आणि माझ्याकडे पुष्कळ बैल, गाढवं, मेंढरं आणि दासदासी झाल्या आहेत.+ माझ्या प्रभूची माझ्यावर कृपा व्हावी म्हणून मी तुला हा निरोप पाठवत आहे.”’”
६ काही काळाने ते सेवक याकोबकडे परत येऊन म्हणाले: “आम्ही तुझा भाऊ एसाव याला भेटलो आणि आता तो तुला भेटायला ४०० माणसांना घेऊन निघाला आहे.”+ ७ तेव्हा याकोब खूप घाबरला आणि चिंतेत पडला.+ म्हणून त्याने त्याच्यासोबत असलेल्या लोकांचे, तसंच कळपांचे, गुराढोरांचे आणि उंटांचे दोन गट केले. ८ तो म्हणाला: “जर एसावने एका गटावर हल्ला केला, तर दुसऱ्या गटाला पळून जाता येईल.”
९ त्यानंतर याकोबने अशी प्रार्थना केली: “माझा पिता अब्राहाम आणि माझा पिता इसहाक यांच्या देवा यहोवा, तू मला म्हणाला होतास, ‘आपल्या देशात आपल्या नातेवाइकांकडे परत जा आणि मी तुझं भलं करीन.’+ १० तू आपल्या सेवकाला दाखवलेल्या एकनिष्ठ प्रेमाच्या आणि विश्वासूपणाच्या मी लायक नाही.+ कारण मी यार्देन पार केली तेव्हा माझ्याकडे फक्त एक काठी होती, पण आता माझ्याकडे इतकं आहे, की मला त्याचे दोन गट करावे लागले.+ ११ कृपा करून मला माझा भाऊ एसाव याच्या हातून वाचव.+ कारण मला भीती वाटते, की तो येऊन माझ्यावर आणि स्त्रियांवर व मुलांवर हल्ला करेल.+ १२ पण तू म्हणालास: ‘मी तुझं भलं करीन आणि तुझी संतती* समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी अगणित करीन.’”+
१३ मग त्याने रात्री तिथे मुक्काम केला. नंतर त्याने आपल्याजवळ जे होतं, त्यातून काही आपला भाऊ एसाव याच्यासाठी भेट म्हणून काढलं.+ १४ म्हणजे, २०० बकऱ्या, २० बकरे, २०० मेंढ्या, २० मेंढे, १५ पिल्लांना दूध पाजणाऱ्या ३० उंटिणी, तसंच ४० गायी, १० बैल, २० गाढव्या आणि १० गाढवं काढली.+
१६ त्याने हे कळप, एकामागे एक आपल्या सेवकांकडे सोपवले आणि तो त्यांना म्हणाला: “तुम्ही माझ्यापुढे निघा आणि प्रत्येक कळपामध्ये अंतर ठेवा.” १७ त्याने पहिला कळप घेऊन जाणाऱ्या सेवकाला अशीही आज्ञा दिली: “जर माझा भाऊ एसाव तुला भेटला आणि त्याने विचारलं, ‘तुझा मालक कोण, तू कुठे चाललास आणि ही गुरंढोरं कोणाची आहेत?’ १८ तर तू असं बोल, ‘तुझा सेवक याकोब याची. माझा प्रभू एसाव+ याच्यासाठी त्याने ही भेट पाठवली आहे आणि पाहा तो स्वतः आमच्या मागोमाग येत आहे.’” १९ मग त्याने दुसऱ्या, तिसऱ्या आणि त्यांच्या मागोमाग कळप घेऊन जाणाऱ्या सर्व सेवकांना अशी आज्ञा दिली: “जेव्हा तुम्ही एसावला भेटाल, तेव्हा मी जसं सांगितलं तसंच बोला. २० आणि त्याला हेही सांगा, ‘तुझा सेवक याकोब आमच्या मागोमाग येत आहे.’” कारण याकोब मनातल्या मनात म्हणाला: “जर मी माझ्याआधी भेट पाठवून त्याला शांत केलं,+ तर मी त्याला भेटल्यावर तो कदाचित माझं प्रेमाने स्वागत करेल.” २१ तेव्हा भेट घेऊन जाणारे पुढे निघाले, पण याकोबने रात्री तिथेच तंबूमध्ये मुक्काम केला.
२२ नंतर त्या रात्री तो उठला आणि त्याने आपल्या दोन बायका,+ दोन दासी+ आणि आपल्या ११ मुलांना घेऊन यब्बोक+ नदीचा उथळ भाग पार केला आणि तो पलीकडे गेला. २३ अशा रितीने त्याने त्यांना नदीपलीकडे* आणलं. तसंच, त्याच्याकडे असलेलं सर्वकाही तो नदीपलीकडे घेऊन आला.
२४ शेवटी याकोब एकटाच राहिला. तेव्हा एक माणूस येऊन पहाट होईपर्यंत त्याच्याशी कुस्ती करू लागला.+ २५ जेव्हा त्याने पाहिलं की आपण याकोबला हरवू शकत नाही, तेव्हा त्याने त्याच्या मांडीच्या सांध्याला स्पर्श केला; त्यामुळे कुस्ती करताना याकोबच्या मांडीचा सांधा निखळला.+ २६ त्यानंतर तो म्हणाला: “पहाट होत आली, मला जाऊ दे.” यावर याकोब म्हणाला: “जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाहीस, तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही.”+ २७ तेव्हा त्याने त्याला विचारलं: “तुझं नाव काय आहे?” यावर तो म्हणाला: “याकोब.” २८ मग तो म्हणाला: “आतापासून तुझं नाव याकोब नाही तर इस्राएल* असेल,+ कारण तू देवासोबत आणि माणसांसोबत लढलास+ आणि शेवटी विजयी झाला आहेस.” २९ तेव्हा याकोब त्याला म्हणाला: “कृपा करून मला तुझं नाव सांग.” पण तो म्हणाला: “माझं नाव का विचारतोस?”+ मग त्याने त्याला तिथे आशीर्वाद दिला. ३० म्हणून याकोबने त्या जागेचं नाव पनुएल*+ ठेवलं कारण तो म्हणाला: “मी देवाला समोरासमोर पाहिलं आणि तरी माझा जीव वाचला.”+
३१ तो पनुएल* इथून पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला होता, पण मांडीला इजा झाल्यामुळे तो लंगडत होता.+ ३२ त्यामुळे आजपर्यंत इस्राएलची मुलं प्राण्यांच्या मांडीच्या सांध्याजवळची नस खात नाहीत. कारण त्या माणसाने याकोबच्या मांडीच्या सांध्याला स्पर्श केला होता.