लेवीय
६ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “जर कोणी* पुढीलपैकी एखादी गोष्ट करून पाप केलं आणि यहोवाविरुद्ध अविश्वासूपणे वागला;+ म्हणजे जर त्याने आपल्याजवळ सांभाळायला दिलेल्या किंवा गहाण ठेवलेल्या एखाद्या वस्तूसाठी आपल्या शेजाऱ्याला फसवलं,+ किंवा ती वस्तू चोरली, किंवा शेजाऱ्याला लुबाडलं, ३ किंवा एखादी हरवलेली वस्तू सापडल्यावर जर तो तिच्याबद्दल खोटं बोलला किंवा आपल्या हातून घडलेल्या अशा कोणत्याही पापाबद्दल त्याने खोटी शपथ घेतली,+ तर त्याने पुढे सांगितल्याप्रमाणे करावं: ४ जर त्याने ते पाप केलं असेल आणि तो दोषी असेल तर त्याने जे चोरलं, जे लुबाडलं, जे फसवून घेतलं, सांभाळायला दिलेली जी वस्तू ठेवून घेतली किंवा एखादी हरवलेली वस्तू सापडल्यावर ठेवून घेतली, ती त्याने परत करावी. ५ किंवा ज्या गोष्टीबद्दल त्याने खोटी शपथ घेतली ती त्याने परत करावी. त्याने त्या गोष्टीची पूर्ण भरपाई करावी+ आणि सोबतच तिच्या किमतीचा पाचवा भागही द्यावा. ज्या दिवशी त्याचा दोष सिद्ध होईल, त्याच दिवशी त्याने ती वस्तू तिच्या मालकाला परत करावी. ६ मग त्याने त्याचं दोषार्पण म्हणून कळपातून, कोणताही दोष नसलेला आणि योग्य मूल्य असलेला एक मेंढा याजकाकडे यहोवासाठी दोषार्पण म्हणून आणावा.+ ७ याजक त्याच्यासाठी यहोवासमोर प्रायश्चित्त करेल, म्हणजे त्याने जे काही केलं असेल आणि ज्यामुळे त्याच्यावर दोष आला असेल, त्याबद्दल त्याला क्षमा केली जाईल.”+
८ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: ९ “अहरोनला आणि त्याच्या मुलांना आज्ञा दे आणि सांग, ‘हा होमार्पणाचा नियम आहे:+ होमार्पण रात्रभर वेदीच्या आगीवर राहावं आणि वेदीवर आग जळत राहावी. १० याजकाने आपली मलमलीची खास वस्त्रं, तसंच मलमलीची अंतर्वस्त्रं* घालावीत.+ मग त्याने वेदीवरच्या आगीत जळलेल्या होमार्पणाची राख* काढावी+ आणि ती वेदीच्या बाजूला ठेवावी. ११ यानंतर त्याने आपली वस्त्रं काढून+ दुसरी वस्त्रं घालावीत आणि ती राख छावणीबाहेर एका स्वच्छ ठिकाणी न्यावी.+ १२ वेदीवरची आग सतत जळत ठेवावी. ती विझू नये. याजकाने रोज सकाळी वेदीवर लाकडं जाळावीत.+ त्याने त्या आगीवर होमार्पण रचून ठेवावं आणि शांती-अर्पणाची चरबी त्या आगीवर जाळावी.+ १३ वेदीवर आग सतत जळत ठेवावी. ती विझू नये.
१४ हा अन्नार्पणाचा नियम आहे:+ अहरोनच्या मुलांनी वेदीपुढे ते यहोवासाठी अर्पण करावं. १५ त्यांच्यापैकी एकाने अन्नार्पणातलं मूठभर चांगलं पीठ, त्यातलं काही तेल आणि अन्नार्पणावरचा सगळा ऊद* घ्यावा. त्याने ते अर्पणाचं प्रतीक* म्हणून वेदीवर जाळावं आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+ १६ अन्नार्पणातलं जे उरेल ते अहरोनने आणि त्याच्या मुलांनी खावं.+ त्याच्या बेखमीर* भाकरी बनवून एका पवित्र ठिकाणी खाव्यात. त्यांनी त्या भेटमंडपाच्या अंगणात खाव्यात.+ १७ ते खमीर* असलेल्या कोणत्याही गोष्टीसोबत भाजू नका.+ माझ्यासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्या अर्पणांमधून हा मी त्यांना दिलेला भाग आहे.+ हा भाग, पापार्पण आणि दोषार्पण यांसारखाच परमपवित्र आहे.+ १८ अहरोनच्या वंशातल्या प्रत्येक पुरुषाने तो खावा.+ यहोवासाठी अग्नीत जाळून केलेल्या अर्पणांमधून हा पिढ्या न् पिढ्या त्यांचा कायमचा हिस्सा आहे.+ ज्या गोष्टींना या अर्पणांचा स्पर्श होईल, त्या पवित्र ठरतील.’”
१९ यहोवा मोशेला पुन्हा म्हणाला: २० “अहरोनने आणि त्याच्या मुलांपैकी प्रत्येकाने त्यांच्या अभिषेकाच्या दिवशी यहोवासाठी हे अर्पण आणावं:+ त्यांनी अन्नार्पण म्हणून एक एफाचा दहावा भाग*+ चांगलं पीठ आणावं.+ यातलं अर्धं सकाळी आणि अर्धं संध्याकाळी अर्पण करावं. २१ ते तव्यावर, तेल लावून बनवलेलं असावं.+ त्याने ते तेलात चांगलं मिसळून आणावं. मग भाजून तयार केलेल्या या अन्नार्पणाचे तुकडे त्याने अर्पण करावेत, म्हणजे त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* २२ अहरोनच्या मुलांपैकी जो अभिषिक्त याजक त्याच्याजागी येईल,+ त्याने ते बनवावं. हा एक कायमचा नियम आहे: हे अर्पण यहोवासाठी पूर्णपणे जाळावं. २३ याजकाचं प्रत्येक अन्नार्पण पूर्णपणे जाळावं. ते खाऊ नये.”
२४ यहोवा पुन्हा मोशेसोबत बोलला आणि म्हणाला: २५ “अहरोनला आणि त्याच्या मुलांना सांग, ‘हा पापार्पणाचा नियम आहे:+ ज्या ठिकाणी होमार्पणाचा पशू कापला जातो,+ तिथेच पापार्पणाचा पशूही यहोवासमोर कापला जावा. हे परमपवित्र अर्पण आहे. २६ जो याजक पापासाठी ते अर्पण करेल, त्याने ते खावं.+ ते एका पवित्र ठिकाणी, म्हणजे भेटमंडपाच्या अंगणात खावं.+
२७ अर्पणाच्या मांसाचा स्पर्श होणारी प्रत्येक गोष्ट पवित्र होईल. जर एखाद्याच्या कपड्यांवर त्याचं रक्त उडालं, तर ते कपडे एका पवित्र ठिकाणी धुवावेत. २८ ज्या मातीच्या भांड्यात ते मांस उकळण्यात आलं असेल, ते फोडून टाकावं. पण जर ते एखाद्या तांब्याच्या भांड्यात उकळण्यात आलं असेल, तर ते भांडं घासून पाण्याने धुवावं.
२९ याजक असलेल्या प्रत्येक पुरुषाने त्या अर्पणातलं मांस खावं.+ ते परमपवित्र आहे.+ ३० पण, ज्या पापार्पणातलं काही रक्त प्रायश्चित्त करण्यासाठी पवित्र ठिकाणी, म्हणजे भेटमंडपात आणलं जातं, ते पापार्पण खाल्लं जाऊ नये.+ ते आगीत जाळून टाकावं.