निर्गम
१६ एलीम इथून निघाल्यावर सर्व इस्राएली लोक, एलीम आणि सीनायच्या मध्ये असलेल्या सीनच्या ओसाड रानात येऊन पोहोचले.+ इजिप्त देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याचा हा १५ वा दिवस होता.
२ तेव्हा, इस्राएलचे सर्व लोक ओसाड रानात मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले.+ ३ ते त्यांना म्हणू लागले: “आम्ही इजिप्तमध्येच यहोवाच्या हातून मेलो असतो तर बरं झालं असतं. तिथे आम्ही मांसाच्या भांड्यांजवळ बसून पोटभर भाकरी तरी खायचो.+ पण, तुम्ही इस्राएलच्या सर्व मंडळीला उपाशी मारण्यासाठी या ओसाड रानात आणलंय.”+
४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “बघ आता मी तुमच्यासाठी आकाशातून अन्नाचा वर्षाव करीन.+ प्रत्येकाने दररोज बाहेर जाऊन आपल्या वाट्याचं अन्न गोळा करावं.+ यावरून, लोक माझ्या नियमानुसार चालतात की नाही, याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन.+ ५ पण सहाव्या दिवशी,+ त्यांनी इतर प्रत्येक दिवसाच्या तुलनेत दुप्पट अन्न गोळा करून शिजवावं.”+
६ म्हणून मोशे आणि अहरोन सर्व इस्राएली लोकांना म्हणाले: “आज संध्याकाळी तुम्हाला कळेल, की तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणणारा यहोवाच आहे.+ ७ सकाळी तुम्हाला यहोवाचं तेज पाहायला मिळेल, कारण यहोवाविरुद्ध तुम्ही केलेली कुरकुर त्याने ऐकली आहे. शेवटी आम्ही कोण, की आमच्याविरुद्ध तुम्ही कुरकुर करावी?” ८ मोशे पुढे म्हणाला: “यहोवा तुम्हाला संध्याकाळी मांस आणि सकाळी पोटभर भाकरी खायला देईल तेव्हा तुम्हाला कळेल, की तुम्ही यहोवाविरुद्ध केलेली कुरकुर त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुमची कुरकुर आमच्याविरुद्ध नाही, तर यहोवाविरुद्ध आहे.”+
९ मग मोशे अहरोनला म्हणाला: “इस्राएलच्या सर्व लोकांना सांग, ‘तुम्ही सर्व यहोवासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे.’”+ १० अहरोन इस्राएलच्या सर्व लोकांशी बोलला, तेव्हा लगेच त्या सर्वांनी वळून ओसाड रानाकडे पाहिलं आणि एका ढगात त्यांना यहोवाचं तेज दिसलं.+
११ यहोवा पुढे मोशेला म्हणाला: १२ “मी इस्राएली लोकांची कुरकुर ऐकली आहे.+ त्यांना सांग, ‘संध्याकाळी* तुम्ही मांस खाल आणि सकाळी तुम्ही पोटभर भाकरी खाल,+ आणि तुम्हाला कळेल की मीच यहोवा तुमचा देव आहे.’”+
१३ मग संध्याकाळी लावे* आले आणि सबंध छावणी त्यांनी भरून गेली+ आणि सकाळी सबंध छावणीच्या आजूबाजूला दव पडलं. १४ दवाचा थर सुकला तेव्हा ओसाड रानातल्या जमिनीवर हिमकणांइतका बारीक, पापुद्र्यासारखा पदार्थ असल्याचं दिसलं.+ १५ इस्राएली लोकांनी तो पाहिला तेव्हा ते एकमेकांना म्हणू लागले, “काय आहे हे?” कारण ते काय आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला: “हे यहोवाने तुम्हाला खायला दिलेलं अन्न* आहे.+ १६ यहोवाने अशी आज्ञा दिली आहे, ‘तुमच्यापैकी प्रत्येकाने त्याला खाता येईल इतकंच ते गोळा करावं. प्रत्येकाच्या तंबूत जितके लोक* असतील त्याप्रमाणे प्रत्येकासाठी एक ओमर माप*+ इतकं तुम्ही गोळा करावं.’” १७ इस्राएली लोक तसंच करू लागले; कोणी कमी, तर कोणी जास्त गोळा करायचा. १८ ते ओमरच्या* मापाने मोजून पाहायचे, तेव्हा ज्याने जास्त गोळा केलं त्याच्याजवळ जास्त उरत नव्हतं, आणि ज्याने कमी गोळा केलं त्याला कमी पडत नव्हतं.+ प्रत्येक जण त्याला खाता येईल त्याप्रमाणे गोळा करायचा.
१९ मग मोशे त्यांना म्हणाला: “सकाळपर्यंत काहीही उरू देऊ नका.”+ २० पण त्यांनी मोशेचं ऐकलं नाही. काहींनी ते सकाळपर्यंत ठेवलं, तेव्हा त्यात अळ्या पडून त्याला घाण वास येऊ लागला. त्यामुळे मोशे त्यांच्यावर रागावला. २१ ते दररोज सकाळी प्रत्येकाला खाता येईल इतकं गोळा करायचे. पण ऊन वाढल्यावर ते अन्न वितळून जायचं.
२२ सहाव्या दिवशी त्यांनी प्रत्येकासाठी दुप्पट म्हणजे दोन ओमर मापं अन्न गोळा केलं.+ मग, इस्राएली लोकांमधल्या सर्व प्रधानांनी येऊन मोशेला याबद्दल सांगितलं. २३ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “यहोवाने असं सांगितलंय: ‘उद्या पूर्ण विश्रांती, म्हणजेच यहोवासाठी पवित्र शब्बाथाचा* दिवस असेल.*+ तुम्हाला जितकं अन्न भाजायचं असेल तितकं भाजून घ्या, जितकं उकळायचं असेल तितकं उकळून घ्या+ आणि जे काही उरेल ते सकाळपर्यंत तसंच ठेवा.’” २४ म्हणून मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत तसंच ठेवलं, पण त्यात अळ्या पडल्या नाहीत किंवा त्याला वासही सुटला नाही. २५ मग मोशे म्हणाला: “ते आज खा, कारण आज यहोवासाठी शब्बाथाचा दिवस आहे. आज तुम्हाला ते जमिनीवर सापडणार नाही. २६ तुम्ही सहा दिवस ते गोळा कराल, पण सातव्या दिवशी म्हणजे शब्बाथाच्या दिवशी+ तुम्हाला काहीच सापडणार नाही.” २७ तरीही काही लोक सातव्या दिवशी ते गोळा करायला गेले, पण त्यांना काहीच सापडलं नाही.
२८ म्हणून यहोवा मोशेला म्हणाला: “तुम्ही लोक माझ्या आज्ञा आणि माझे नियम कुठवर पाळणार नाही?+ २९ यहोवाने तुम्हाला शब्बाथाचा हा दिवस ठरवून दिला आहे हे विसरू नका.+ म्हणूनच सहाव्या दिवशी तो तुम्हाला दोन दिवस पुरेल इतकं अन्न देतो. तेव्हा, सातव्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणीच राहावं; कोणीही बाहेर जाऊ नये.” ३० म्हणून लोकांनी सातव्या दिवशी शब्बाथ पाळला.*+
३१ इस्राएली लोकांनी त्या अन्नाला “मान्ना”* असं नाव दिलं. तो पांढरा होता आणि दिसायला धण्यासारखा होता. त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती.+ ३२ मग मोशे म्हणाला: “यहोवाने अशी आज्ञा दिली आहे, ‘एक ओमर माप भरून तो पिढ्या न् पिढ्या जपून ठेवा,+ म्हणजे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर आणताना, मी ओसाड रानात तुम्हाला कोणतं अन्न दिलं हे तुमच्या वंशजांना कळेल.’” ३३ म्हणून मोशे अहरोनला म्हणाला: “एक भांडं घे आणि त्यात एक ओमर माप इतका मान्ना घेऊन तो यहोवासमोर ठेव. तो पिढ्या न् पिढ्या जपून ठेवला जावा.”+ ३४ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, अहरोनने तो सुरक्षित राहावा म्हणून एका खास पेटीसमोर*+ ठेवला. ३५ इस्राएली लोकांनी, वस्ती असलेल्या देशात येईपर्यंत ४० वर्षं मान्ना खाल्ला.+ ते कनान देशाच्या सीमेजवळ येईपर्यंत मान्ना खात होते.+ ३६ ओमर म्हणजे एफाचा* दहावा भाग.