योहानला झालेलं प्रकटीकरण
८ कोकऱ्याने+ सातवा शिक्का उघडला+ तेव्हा स्वर्गात सुमारे अर्धा तास शांतता पसरली. २ आणि देवासमोर उभे राहणारे सात स्वर्गदूत+ मला दिसले आणि त्यांना सात कर्णे देण्यात आले.
३ मग, धूप जाळण्याचं सोन्याचं पात्र हातात घेतलेला एक स्वर्गदूत आला आणि वेदीजवळ उभा राहिला.+ त्याला राजासनासमोर असलेल्या सोन्याच्या वेदीवर,+ सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसोबत अर्पण करण्यासाठी भरपूर धूप+ देण्यात आला. ४ स्वर्गदूताच्या हातातल्या धूपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनांसोबत देवासमोर वर चढला.+ ५ पण, तितक्यात, स्वर्गदूताने धूप जाळण्याचं पात्र घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरला आणि तो पृथ्वीवर टाकला. तेव्हा, ढगांचा गडगडाट झाला, गर्जना ऐकू आल्या, विजा चमकल्या+ आणि भूकंप झाला. ६ आणि सात कर्णे घेतलेले सात स्वर्गदूत आपले कर्णे+ वाजवायला तयार झाले.
७ पहिल्या स्वर्गदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा रक्त मिसळलेल्या गारा आणि अग्नी उत्पन्न होऊन पृथ्वीवर त्यांचा वर्षाव करण्यात आला.+ यामुळे, पृथ्वीचा एकतृतीयांश भाग जळून गेला; एकतृतीयांश झाडं जळून गेली आणि सर्व हिरव्या वनस्पती जळून गेल्या.+
८ दुसऱ्या स्वर्गदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा आगीने पेटलेल्या मोठ्या पर्वतासारखं काहीतरी समुद्रात फेकण्यात आलं.+ आणि त्यामुळे, एकतृतीयांश समुद्राचं रक्त झालं;+ ९ आणि समुद्रातले एकतृतीयांश जीव* मरून गेले+ आणि एकतृतीयांश जहाजं फुटली.
१० तिसऱ्या स्वर्गदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा मशालीसारखा जळत असलेला एक मोठा तारा आकाशातून पडला. तो एकतृतीयांश नद्यांवर आणि झऱ्यांवर पडला.+ ११ त्या ताऱ्याचं नाव कडूदवणा* आहे. त्यामुळे एकतृतीयांश पाण्याचा कडूदवणा झाला आणि त्या पाण्याने बरेच लोक मरण पावले, कारण पाणी कडू झालं होतं.+
१२ चौथ्या स्वर्गदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याच्या एकतृतीयांश भागाला,+ चंद्राच्या एकतृतीयांश भागाला आणि एकतृतीयांश ताऱ्यांना तडाखा बसला. हे यासाठी, की त्यांचा एकतृतीयांश भाग काळवंडून जावा+ आणि दिवसाच्या तसंच रात्रीच्याही एकतृतीयांश भागाला प्रकाश मिळू नये.
१३ आणि पाहा! आकाशाच्या मध्यभागी मला एक गरुड उडताना दिसला. त्याला मी मोठ्या आवाजात असं म्हणताना ऐकलं: “आता आणखी तीन स्वर्गदूत कर्णे वाजवणार आहेत.+ त्यांच्या कर्ण्यांच्या नादामुळे पृथ्वीवर राहणाऱ्यांवर विपत्ती, विपत्ती, विपत्ती!”+