इफिसकर यांना पत्र
२ शिवाय, तुम्ही आपल्या अपराधांमुळे आणि पापांमुळे मेलेले असे होता, तरीसुद्धा देवाने तुम्हाला जिवंत केलं.+ २ तुम्ही आपल्या पापांत एकेकाळी या जगाच्या व्यवस्थेप्रमाणे* चालत होता+ आणि जगाच्या मनोवृत्तीवर+ नियंत्रण करणाऱ्याला शासक मानून चालत होता. ही मनोवृत्ती हवेप्रमाणे सगळीकडे पसरलेली असून,+ ती आज्ञा न मानणाऱ्यांमध्ये आज कार्य करत आहे. ३ हो, त्या लोकांमध्ये असताना एकेकाळी आपण सगळेच आपल्या शरीराच्या वासनांप्रमाणे चालत होतो.+ आपण आपल्या शरीराची इच्छा पूर्ण करत होतो आणि आपल्या विचारांप्रमाणे वागत होतो.+ त्यामुळे, बाकीच्या लोकांप्रमाणेच आपणसुद्धा जन्मापासून क्रोधाची मुलं होतो.+ ४ पण देव खूप दयाळू असल्यामुळे,+ आपल्यावर केलेल्या महान प्रेमापोटी,+ ५ आपण अपराधांत मेलेले असूनसुद्धा त्याने आपल्याला ख्रिस्तासोबत जिवंत केलं.+ (देवाच्या अपार कृपेमुळे तुमचं तारण झालं आहे.) ६ शिवाय, आपण ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे त्याने आपल्याला जिवंत करून स्वर्गात त्याच्यासोबत बसवलं आहे.+ ७ हे यासाठी, की येणाऱ्या काळांत* त्याने ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या आपल्यावर उदारतेने त्याच्या अपार कृपेचा वर्षाव करावा.
८ या अपार कृपेमुळे, विश्वासाद्वारे+ तुमचं तारण झालं आहे. हे तुमच्यामुळे घडलं असं नाही, तर हे देवाचं दान आहे. ९ खरोखर, हे तुमच्या कार्यांमुळे घडत नाही.+ हे यासाठी, की कोणाला बढाई मारायचं निमित्त मिळू नये. १० आपण देवाच्या हाताची कृती* आहोत आणि ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ चांगली कार्यं करण्यासाठी आपली सृष्टी करण्यात आली आहे.+ ही कार्यं आपण करावीत हे देवाने पूर्वीच ठरवलं होतं.
११ म्हणून, हे आठवणीत असू द्या की शारीरिक दृष्टीने विदेशी असलेल्या तुम्हाला, मानवी हातांनी शरीराची “सुंता* झालेले” लोक, एकेकाळी “सुंता न झालेले” म्हणत होते. १२ त्या वेळी तुम्ही ख्रिस्ताविना होता, इस्राएल राष्ट्रापासून वेगळे होता, अभिवचनाच्या करारांत भाग नसलेले,+ कोणतीही आशा नसलेले आणि जगात देवाशिवाय असे होता.+ १३ पण आता तुम्ही ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात आहात. एकेकाळी दुरावलेले असे जे तुम्ही होता, ते आता ख्रिस्ताच्या रक्तामुळे जवळ आला आहात. १४ कारण तो आपला शांतिदाता आहे.+ त्याने दोन्ही गटांना एक केलं+ आणि त्यांना एकमेकांपासून वेगळं करणारी भिंत पाडून टाकली.+ १५ त्याच्या शरीराद्वारे त्याने शत्रुता मिटवून टाकली, म्हणजे ज्यात आज्ञा होत्या ते नियमशास्त्र त्याने रद्द केलं. हे यासाठी, की आपल्यासोबत ऐक्यात असलेल्या या दोन गटांपासून एक नवीन माणूस तयार करावा+ आणि शांती स्थापन करावी. १६ तसंच, वधस्तंभाद्वारे* त्या दोन्ही गटांच्या लोकांना एकच शरीर करून देवासोबत त्यांचा पूर्णपणे समेट करावा.+ कारण स्वतःचं बलिदान देऊन त्याने ही शत्रुता कायमची नष्ट केली.+ १७ तो आला आणि त्याने देवापासून दूर असलेल्या तुम्हाला आणि जे जवळ होते त्यांनासुद्धा शांती देणारा आनंदाचा संदेश घोषित केला. १८ कारण त्याच्याद्वारे आपल्याला, म्हणजे दोन्ही गटांच्या लोकांना, एकाच पवित्र शक्तीद्वारे* मोकळेपणाने देवाजवळ जाणं शक्य झालं.
१९ त्यामुळे, आता यापुढे तुम्ही अनोळखी आणि परके असे राहिला नाहीत.+ तर, तुम्ही पवित्र जनांसोबत सहनागरिक+ आणि देवाच्या घराण्याचे सदस्य आहात.+ २० तुम्ही एका इमारतीसारखे आहात आणि तिचा पाया प्रेषित आणि संदेष्टे आहेत.+ या इमारतीच्या पायातला कोपऱ्याचा दगड स्वतः ख्रिस्त येशू आहे.+ २१ ही संपूर्ण इमारत त्याच्यासोबत ऐक्यात असून, तिचे सगळे भाग एकमेकांसोबत एकतेत जोडलेले आहेत.+ आणि ती यहोवासाठी* एक पवित्र मंदिर होण्याकरता वाढत जात आहे.+ २२ त्याच्यासोबत ऐक्यात असलेल्या तुम्हा सगळ्यांनासुद्धा एकत्र उभारलं जात आहे. हे यासाठी, की तुमच्यापासून एक असं निवासस्थान बनावं, जिथे देव आपल्या पवित्र शक्तीद्वारे राहील.+