योहानने सांगितलेला संदेश
५ यानंतर यहुद्यांचा एक सण+ असल्यामुळे येशू वर यरुशलेमला गेला. २ तिथे मेंढरं-फाटकाजवळ+ एक तळं आहे. त्याला इब्री भाषेत बेथजथा म्हणतात. या तळ्याभोवती खांबांच्या रांगा असलेले वऱ्हांडे आहेत. ३ या वऱ्हांड्यांवर कित्येक आजारी, आंधळे, पांगळे आणि वाळलेल्या* हातापायांचे लोक पडून असायचे. ४ *— ५ तिथेच ३८ वर्षांपासून आजारी असलेला एक माणूस होता. ६ येशूने त्या माणसाला पाहिलं. तो बऱ्याच वर्षांपासून आजारी आहे हे त्याला माहीत होतं. म्हणून तो त्याला म्हणाला: “तुला बरं व्हायचंय का?”+ ७ आजारी माणसाने उत्तर दिलं: “पाणी हलत असताना मला तळ्यात उतरवायला कोणीही माझ्यासोबत नाही. मी पाण्यापर्यंत पोहोचण्याआधीच दुसरा कोणीतरी माझ्यापुढे जाऊन पाण्यात उतरतो.” ८ येशू त्याला म्हणाला: “ऊठ! आपली चटई* उचलून चालू लाग.”+ ९ तेव्हा तो माणूस लगेच बरा झाला आणि आपली चटई* उचलून चालू लागला.
तो शब्बाथाचा दिवस होता. १० त्यामुळे यहुदी लोक त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले: “आज शब्बाथ आहे. कायद्याप्रमाणे तू चटई* उचलणं योग्य नाही.”+ ११ पण तो त्यांना म्हणाला: “ज्याने मला बरं केलं त्यानेच मला सांगितलं, की ‘तुझी चटई* उचलून चालू लाग.’” १२ त्यांनी त्याला विचारलं: “‘चटई* उचलून चालू लाग,’ असं तुला सांगणारा तो माणूस कोण आहे?” १३ पण आपल्याला बरं करणारा कोण आहे हे त्या माणसाला माहीत नव्हतं. कारण येशू तिथे जमलेल्या लोकांच्या गर्दीत दिसेनासा झाला होता.
१४ यानंतर येशूला तो माणूस मंदिरात भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला: “बघ, तू बरा झालास. आता तुला यापेक्षाही वाईट काही होऊ नये, म्हणून यापुढे पाप करू नकोस.” १५ तो माणूस तिथून निघून गेला आणि आपल्याला बरं करणारा येशू आहे, हे त्याने यहुद्यांना जाऊन सांगितलं. १६ त्यामुळे यहुदी येशूचा छळ करू लागले, कारण तो शब्बाथाच्या दिवशी या गोष्टी करत होता. १७ पण त्याने त्यांना उत्तर दिलं: “माझा पिता आतापर्यंत काम करतोय आणि मीसुद्धा काम करत राहतो.”+ १८ यामुळे यहुदी त्याला ठार मारायचा आणखीनच जास्त प्रयत्न करू लागले. कारण शब्बाथ मोडण्यासोबतच देवाला आपला पिता म्हणून+ तो देवाची बरोबरी करत आहे असं त्यांना वाटलं.+
१९ म्हणून येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, की मुलगा स्वतःच्या मनाने एकही गोष्ट करू शकत नाही. तर, जे काही तो पित्याला करताना पाहतो तेच तो करतो.+ कारण पिता जे काही करतो तेच मुलगासुद्धा करतो. २० पित्याला मुलाबद्दल जिव्हाळा आहे+ आणि तो स्वतः जे काही करतो ते तो मुलाला दाखवतो. शिवाय, तुम्हाला आश्चर्य वाटावं म्हणून तो यापेक्षाही मोठी कार्यं त्याला दाखवेल.+ २१ ज्या प्रकारे पिता मेलेल्यांना पुन्हा जिवंत करतो,+ त्याच प्रकारे मुलगासुद्धा आपली इच्छा असेल त्याला पुन्हा जिवंत करतो.+ २२ पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर त्याने न्याय करण्याचं काम पूर्णपणे मुलावर सोपवलंय.+ २३ ज्याप्रमाणे सगळे पित्याचा आदर करतात, त्याचप्रमाणे सगळ्यांनी मुलाचाही आदर करावा म्हणून पित्याने असं केलंय. जो मुलाचा आदर करत नाही, तो त्याला पाठवणाऱ्या पित्याचाही आदर करत नाही.+ २४ मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, की जो माझं ऐकून मला पाठवणाऱ्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल.+ त्याच्यावर न्यायदंड येणार नाही, तर तो मरणाला पार करून जीवनात गेलाय.+
२५ मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, की अशी वेळ येत आहे, खरंतर आलीच आहे, जेव्हा मेलेले लोक देवाच्या मुलाची हाक ऐकतील आणि ज्यांनी त्याचं ऐकलंय ते जिवंत होतील. २६ कारण ज्याप्रमाणे पित्याजवळ जीवन देण्याचं सामर्थ्य आहे,*+ त्याचप्रमाणे त्याने मुलालाही इतरांना जीवन देण्याचं सामर्थ्य दिलंय.+ २७ आणि पित्याने त्याला न्याय करायचा अधिकार दिलाय,+ कारण तो मनुष्याचा मुलगा+ आहे. २८ हे ऐकून आश्चर्य करू नका, कारण अशी वेळ येत आहे जेव्हा स्मारक कबरींमध्ये* असलेले सगळे त्याची हाक ऐकतील+ २९ आणि बाहेर येतील. चांगली कामं करणाऱ्यांना सर्वकाळाचं जीवन मिळेल,* तर वाईट कामं करणाऱ्यांचा न्याय केला जाईल.*+ ३० मी स्वतःच्या मनाने एकही गोष्ट करू शकत नाही, तर जे मी ऐकतो त्याप्रमाणेच न्याय करतो आणि मी केलेला न्याय खरा* आहे.+ कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करायचा प्रयत्न करतो.+
३१ जर मी एकट्यानेच स्वतःबद्दल साक्ष दिली तर माझी साक्ष खरी ठरणार नाही.+ ३२ माझ्याबद्दल साक्ष देणारा आणखी एक जण आहे आणि तो माझ्याबद्दल जी साक्ष देतो ती खरी आहे, हे मला माहीत आहे.+ ३३ तुम्ही योहानकडे माणसं पाठवली आणि त्याने सत्याबद्दल साक्ष दिली आहे.+ ३४ खरंतर, माणसाने दिलेल्या साक्षीची मला गरज नाही, पण तुमचं तारण व्हावं म्हणून मी या गोष्टी बोलतोय. ३५ तो माणूस प्रकाश देणारा, जळता दिवा होता आणि त्याच्या प्रकाशात काही काळ आनंदाने राहायची तुमची इच्छा होती.+ ३६ पण योहानने दिली त्यापेक्षाही प्रभावी साक्ष माझ्याजवळ आहे. कारण मी जी कार्यं करतो, म्हणजे जी कार्यं करायला पित्याने मला नेमलं, ती कार्यंच याची साक्ष देतात की मला पित्याने पाठवलंय.+ ३७ आणि ज्या पित्याने मला पाठवलं त्याने स्वतःच माझ्याबद्दल साक्ष दिली आहे.+ तुम्ही कधीही त्याचा आवाज ऐकला नाही किंवा त्याचं स्वरूप पाहिलं नाही.+ ३८ तसंच, त्याचं वचन तुमच्यात टिकून राहत नाही. कारण त्याने ज्याला पाठवलं त्याच्यावरच तुमचा विश्वास नाही.
३९ तुम्ही शास्त्रवचनांचा अभ्यास करता,+ कारण शास्त्रवचनांद्वारे तुम्हाला सर्वकाळाचं जीवन मिळेल असं तुम्हाला वाटतं. हीच* माझ्याबद्दल साक्ष देतात.+ ४० आणि तरीसुद्धा, जीवन मिळावं म्हणून माझ्याकडे यायची तुमची इच्छा नाही.+ ४१ मला माणसांनी केलेली प्रशंसा नकोय. ४२ पण तुमच्या मनात देवाबद्दल प्रेम नाही हे मला माहीत आहे. ४३ मी माझ्या पित्याच्या नावाने आलोय, पण तुम्ही मला स्वीकारत नाही. जर दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला असता, तर तुम्ही त्याला स्वीकारलं असतं. ४४ तुम्ही कसा काय विश्वास ठेवाल? कारण, जो एकच देव त्याच्याकडून गौरव मिळवायचा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही एकमेकांकडून गौरव मिळण्याची अपेक्षा करता.+ ४५ मी पित्यासमोर तुम्हाला दोष लावीन असं समजू नका. कारण तुम्ही ज्याच्यावर भरवसा ठेवलाय तो मोशे तुम्हाला दोष लावतो.+ ४६ खरंतर, तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याबद्दल लिहिलं होतं.+ ४७ पण जर त्याने लिहिलेल्या गोष्टींवरच तुमचा विश्वास नाही, तर मग मी जे सांगतो त्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवाल?”