करिंथकर यांना दुसरं पत्र
४ देवाने आमच्यावर कृपा करून ही सेवा आम्हाला सोपवली असल्यामुळे आम्ही धीर सोडत नाही. २ पण आम्ही गुप्तपणे केल्या जाणाऱ्या लाजिरवाण्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. आम्ही कपटीपणे वागत नाही किंवा देवाच्या वचनात भेसळ करत नाही.+ तर, सत्य जाहीर करून देवासमोर, आम्ही प्रत्येक माणसाच्या विवेकाला पटेल अशा चांगल्या वागणुकीने स्वतःची शिफारस करतो.+ ३ जर आम्ही घोषित करत असलेला आनंदाचा संदेश खरंच पडद्याने झाकलेला असेल, तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी तो झाकलेला आहे. ४ विश्वास न ठेवणाऱ्या या लोकांची मनं या जगाच्या व्यवस्थेच्या* देवाने+ आंधळी केली आहेत.+ हे यासाठी, की ख्रिस्त जो देवाचं प्रतिरूप आहे,+ त्याच्याबद्दलच्या गौरवी संदेशाचा प्रकाश त्यांच्यावर चमकू नये.+ ५ कारण आम्ही स्वतःबद्दल घोषणा करत नाही; तर येशू ख्रिस्ताबद्दल घोषणा करतो, की तो प्रभू आहे. आणि आम्ही येशूसाठी तुमचे दास आहोत असं स्वतःबद्दल सांगतो. ६ कारण देवाने स्वतः असं म्हटलं: “अंधारातून प्रकाश चमको.”+ त्याने आमच्या मनावर त्याचा प्रकाश पाडून,+ ख्रिस्ताच्या चेहऱ्यावरून प्रतिबिंबित होणाऱ्या देवाच्या गौरवी ज्ञानाने आमची मनं उजळून टाकली आहेत.
७ तरीसुद्धा, आमची ही संपत्ती+ मातीच्या भांड्यांत+ आहे. हे यासाठी, की आमच्याजवळ असलेलं असाधारण सामर्थ्य आमचं स्वतःचं नसून, देवाचं आहे हे दिसून यावं.+ ८ आमच्यावर सगळ्या बाजूंनी दबाव आहेत, पण आमचा अगदीच कोंडमारा झालेला नाही. आम्ही गोंधळलेलो आहोत, पण आमच्याकडे सुटकेचा मार्गच नाही, असं नाही.*+ ९ आमचा छळ होतो, पण आम्हाला एकटं सोडलं जात नाही.+ आम्हाला खाली पाडलं जातं, पण आमचा नाश होत नाही.+ १० येशूने सोसल्या होत्या तशा मरणाच्या यातना आम्ही आमच्या शरीरात सतत सहन करतो.+ हे यासाठी, की येशूचं जीवन आमच्या शरीरातही प्रकट व्हावं. ११ जिवंत असलेले आम्ही, येशूसाठी सतत मरणाचा सामना करत आहोत.+ मरणाच्या अधीन असलेल्या आमच्या शरीरातही येशूचं जीवन प्रकट व्हावं म्हणून आम्ही असं करतो. १२ अशा रितीने, आमच्यामध्ये मरण, तर तुमच्यामध्ये जीवन कार्य करत आहे.
१३ आता आम्हालाही त्याच प्रकारचा विश्वास आहे, ज्याबद्दल असं लिहिण्यात आलं आहे: “मी विश्वास ठेवला आणि म्हणून मी बोललो.”+ आम्हीसुद्धा विश्वास ठेवला आणि म्हणूनच आम्ही बोलतो. १४ कारण ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवलं, तो येशूसोबत आम्हालाही उठवेल आणि तुमच्यासोबत त्याच्यापुढे सादर करेल हे आम्हाला माहीत आहे.+ १५ या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठीच आहेत. हे यासाठी, की आणखी पुष्कळ जण देवाची उपकारस्तुती करत असल्यामुळे, अपार कृपेचा आणखी जास्त वर्षाव होत राहावा आणि त्याद्वारे देवाचा गौरव व्हावा.+
१६ म्हणूनच, आपण धैर्य सोडत नाही. आपलं शरीर जरी हळूहळू झिजत असलं, तरीसुद्धा आपली मनोवृत्ती* नक्कीच दिवसेंदिवस नवीन होत आहे. १७ कारण आपल्यावर येणारी संकटं* जरी तात्पुरती आणि हलकी असली, तरी ती आपल्यामध्ये असं गौरवी तेज उत्पन्न करतात, जे कितीतरी पटीने श्रेष्ठ* आणि सर्वकाळाचं आहे.+ १८ आपण मात्र दिसत असलेल्या गोष्टींकडे नाही, तर न दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष लावतो.+ कारण दिसत असलेल्या गोष्टी तात्पुरत्या आहेत, पण न दिसणाऱ्या गोष्टी सर्वकाळाच्या आहेत.