उत्पत्ती
३५ त्यानंतर देव याकोबला म्हणाला: “ऊठ आणि बेथेलला+ जाऊन राहा. तुझा भाऊ एसाव याच्यापासून तू पळत होतास,+ तेव्हा जो तुझ्यासमोर प्रकट झाला होता, त्या खऱ्या देवासाठी तिथे एक वेदी बांध.”
२ मग याकोब आपल्या घराण्यातल्या आणि आपल्यासोबत असलेल्या सर्व लोकांना म्हणाला: “तुमच्याजवळ असलेले सर्व परके देव काढून टाका+ आणि स्वतःला शुद्ध करून कपडे बदला. ३ आणि चला आपण बेथेलला जाऊ या. माझ्या दुःखाच्या काळात ज्या खऱ्या देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि मी जिथेजिथे गेलो तिथेतिथे* जो माझ्यासोबत होता,+ त्या देवासाठी मी एक वेदी बांधीन.” ४ तेव्हा त्यांनी आपल्याजवळ असलेले सगळे परके देव आणि आपल्या कानातली कुंडले याकोबला दिली. त्याने ते सर्व शखेमच्या जवळ असलेल्या मोठ्या झाडाखाली पुरलं.*
५ तिथून ते पुढे प्रवास करू लागले, तेव्हा आसपासच्या सर्व शहरांना देवाची दहशत बसली, आणि त्यामुळे त्यांनी याकोबच्या मुलांचा पाठलाग केला नाही. ६ शेवटी याकोब आणि त्याच्यासोबत असलेले सर्व लोक कनान देशात, लूज+ म्हणजेच बेथेल इथे येऊन पोहोचले. ७ तिथे त्याने एक वेदी बांधून त्या ठिकाणाला एल-बेथेल* असं नाव दिलं. कारण तो आपला भाऊ एसाव याच्यापासून पळत असताना, याच ठिकाणी खरा देव त्याच्यासमोर प्रकट झाला होता.+ ८ नंतर रिबकाची दाई, दबोरा+ मरण पावली आणि तिला बेथेलच्या पायथ्याशी असलेल्या एका अल्लोनच्या* झाडाखाली पुरण्यात आलं. म्हणून त्याने त्या झाडाचं नाव अल्लोन-बाकूथ* ठेवलं.
९ याकोब पदन-अरामवरून येत असताना, देवाने पुन्हा एकदा त्याच्यासमोर प्रकट होऊन त्याला आशीर्वाद दिला. १० देव त्याला म्हणाला: “तुझं नाव याकोब आहे.+ पण यापुढे तुझं नाव याकोब नाही, तर इस्राएल असेल.” आणि तेव्हापासून तो त्याला इस्राएल या नावाने हाक मारू लागला.+ ११ देव त्याला पुढे म्हणाला: “मी सर्वशक्तिमान देव आहे.+ फलदायी हो आणि आपली संख्या वाढव. तुझ्यापासून पुष्कळ राष्ट्रं आणि राष्ट्रांचा समुदाय येईल.+ तुझ्या वंशातून राजे येतील.+ १२ जो देश मी अब्राहामला आणि इसहाकला दिला आहे, तो मी तुला आणि तुझ्यानंतर येणाऱ्या तुझ्या संततीला* देईन.”+ १३ मग त्या ठिकाणी त्याच्याशी बोलल्यावर, देव तिथून निघून गेला.
१४ तेव्हा ज्या ठिकाणी देव याकोबशी बोलला होता, तिथे याकोबने स्मारक म्हणून एक दगड उभा केला आणि त्यावर त्याने पेयार्पण आणि तेल ओतलं.+ १५ आणि जिथे देव त्याच्याशी बोलला होता, त्या ठिकाणाला याकोब बेथेल असं म्हणू लागला.+
१६ मग ते बेथेलहून पुढच्या प्रवासाला निघाले. ते एफ्राथपासून काही अंतरावर असताना, राहेलला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. मुलाला जन्म देताना तिला खूप त्रास झाला. १७ तिला असह्य वेदना होत असताना सुईण तिला म्हणाली: “घाबरू नकोस, तुझ्या या मुलाचाही सुखरूप जन्म होईल.”+ १८ राहेल अगदी मरायला टेकली होती. तिचा जीव जात असताना तिने आपल्या मुलाचं नाव बेन-ओनी* ठेवलं. पण त्याच्या वडिलांनी त्याचं नाव बन्यामीन*+ ठेवलं. १९ अशा रितीने, एफ्राथ म्हणजेच बेथलेहेमच्या+ मार्गावर राहेलचा मृत्यू झाला आणि तिला तिथेच पुरण्यात आलं. २० याकोबने तिच्या कबरेवर एक मोठा दगड उभा केला. आजही तो दगड राहेलच्या कबरेवर आहे.
२१ त्यानंतर, इस्राएल पुढच्या प्रवासाला निघाला आणि त्याने एदर बुरुजाच्या पलीकडे काही अंतरावर आपला तंबू ठोकला. २२ इस्राएल त्या देशात राहत असताना, एकदा रऊबेनने जाऊन आपल्या वडिलांची उपपत्नी बिल्हा हिच्याशी संबंध ठेवले आणि इस्राएलला या गोष्टीबद्दल समजलं.+
याकोबला १२ मुलं होती. २३ याकोबचा पहिला मुलगा रऊबेन,+ मग शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार आणि जबुलून ही त्याला लेआपासून झालेली मुलं होती. २४ राहेलपासून त्याला योसेफ आणि बन्यामीन ही मुलं झाली. २५ राहेलची दासी, बिल्हा हिच्यापासून याकोबला दान आणि नफताली ही मुलं झाली. २६ आणि लेआची दासी, जिल्पा हिला गाद आणि आशेर ही मुलं झाली. पदन-अराम इथे याकोबला झालेली ही मुलं होती.
२७ शेवटी याकोब मम्रे इथे आपला पिता इसहाक याच्याकडे आला.+ हे ठिकाण किर्याथ-अर्बा म्हणजेच हेब्रोन इथे असून, अब्राहाम आणि इसहाक या ठिकाणी विदेशी म्हणून राहिले होते.+ २८ इसहाक १८० वर्षं जगला.+ २९ अशा रितीने, बरीच वर्षं जगल्यावर, इसहाक म्हातारा होऊन सुखाने मरण पावला आणि आपल्या लोकांना जाऊन मिळाला.* मग एसाव आणि याकोब या त्याच्या मुलांनी त्याला पुरलं.+