उत्पत्ती
३० याकोबपासून आपल्याला मुलं झाली नाहीत, हे पाहून राहेल आपल्या बहिणीवर जळू लागली आणि याकोबला म्हणाली: “मला मुलं दे, नाहीतर मी मरून जाईन.” २ हे ऐकल्यावर याकोब राहेलवर संतापला आणि म्हणाला: “तुला मुलं न होऊ द्यायला, मी काय देव आहे?” ३ तेव्हा ती म्हणाली: “माझी दासी बिल्हा हिचा स्वीकार कर+ आणि तिच्याशी संबंध ठेव म्हणजे ती माझ्यासाठी मुलांना जन्म देईल.* तिच्यामुळे मलाही मुलं मिळतील.” ४ मग तिने आपली दासी बिल्हा ही त्याला बायको म्हणून दिली आणि याकोबने तिच्याशी संबंध ठेवले.+ ५ बिल्हा गरोदर राहिली आणि तिला याकोबपासून एक मुलगा झाला. ६ तेव्हा राहेल म्हणाली: “देवाने माझा न्याय केला आहे आणि माझीही प्रार्थना ऐकून मला एक मुलगा दिला आहे.” म्हणून तिने त्याचं नाव दान*+ ठेवलं. ७ राहेलची दासी बिल्हा पुन्हा गरोदर राहिली आणि तिला याकोबपासून आणखी एक मुलगा झाला. ८ मग राहेल म्हणाली: “मी माझ्या बहिणीशी जोर लावून झुंजले आणि जिंकले!” म्हणून तिने त्याचं नाव नफताली*+ ठेवलं.
९ आपल्याला आता मुलं होत नाहीत, हे पाहून लेआने आपली दासी जिल्पा ही याकोबला बायको म्हणून दिली.+ १० मग लेआची दासी जिल्पा हिला याकोबपासून मुलगा झाला. ११ तेव्हा लेआ म्हणाली: “माझं कल्याण झालं!” म्हणून तिने त्याचं नाव गाद*+ ठेवलं. १२ त्यानंतर लेआची दासी जिल्पा हिला याकोबपासून दुसरा मुलगा झाला. १३ तेव्हा लेआ म्हणाली: “मला आनंद झालाय! आता सगळ्या बायका* मला आनंदी म्हणतील.”+ म्हणून तिने त्याचं नाव आशेर*+ ठेवलं.
१४ काही काळाने गव्हाच्या कापणीच्या दिवसांत रऊबेन+ शेतातून जात असताना त्याला दूदाफळं* दिसली. ती फळं त्याने आपली आई लेआ हिच्याकडे आणली. तेव्हा राहेल लेआला म्हणाली: “तुझ्या मुलाने आणलेली काही दूदाफळं मलाही दे.” १५ यावर लेआ राहेलला म्हणाली: “माझ्या नवऱ्याला बळकावलंस हे काय कमी होतं?+ आता माझ्या मुलाने आणलेली दूदाफळंही हवी आहेत का तुला?” तेव्हा राहेल म्हणाली: “ठीक आहे. आज रात्री तो तुझ्याजवळ राहील पण त्याच्या बदल्यात तुझ्या मुलाने आणलेली दूदाफळं मला दे.”
१६ संध्याकाळी याकोब शेतातून येत असताना, लेआ त्याला भेटायला गेली आणि म्हणाली: “आज रात्री तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात, कारण माझ्या मुलाने आणलेल्या दूदाफळांच्या मोबदल्यात मी तुम्हाला मागून घेतलं आहे.” तेव्हा तो त्या रात्री तिच्यासोबत राहिला. १७ देवाने लेआच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं व ती गरोदर राहिली आणि तिला याकोबपासून पाचवा मुलगा झाला. १८ तेव्हा लेआ म्हणाली: “मी माझी दासी माझ्या नवऱ्याला दिल्यामुळे, देवाने मला माझी मजुरी* दिली आहे.” म्हणून तिने त्याचं नाव इस्साखार*+ ठेवलं. १९ मग लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला याकोबपासून सहावा मुलगा झाला.+ २० तेव्हा लेआ म्हणाली: “देवाने मला खरंच एक चांगली भेट दिली आहे. आता तरी माझा नवरा माझा स्वीकार करेल,+ कारण मी त्याला सहा मुलं दिली आहेत.”+ म्हणून तिने त्याचं नाव जबुलून*+ ठेवलं. २१ त्यानंतर तिला एक मुलगी झाली आणि तिने तिचं नाव दीना+ ठेवलं.
२२ शेवटी देवाने राहेलची आठवण केली. त्याने तिची प्रार्थना ऐकली आणि तिला मुलं होऊ दिली.*+ २३ मग ती गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली: “देवाने माझा कलंक दूर केला आहे!”+ २४ तिने आपल्या मुलाचं नाव योसेफ*+ ठेवलं आणि ती म्हणाली: “यहोवाने मला आणखी एक मुलगा दिला आहे.”
२५ राहेलने योसेफला जन्म दिल्यानंतर याकोब लगेच लाबानला म्हणाला: “मला आता जाऊ दे, म्हणजे मी माझ्या देशात, माझ्या घरी परत जाईन.+ २६ ज्यांच्यासाठी मी तुझ्याकडे सेवा केली, ती माझी बायकामुलं मला दे म्हणजे मला जाता येईल. मी आतापर्यंत तुझी किती विश्वासूपणे सेवा केली,+ हे तुला चांगलं माहीत आहे.” २७ तेव्हा लाबान त्याला म्हणाला: “कृपा करून मला सोडून जाऊ नकोस, कारण शकुन* पाहिल्यावर मला कळलं आहे, की तुझ्यामुळेच यहोवा मला आशीर्वाद देत आहे.” २८ मग तो पुढे म्हणाला: “तुझी मजुरी काय आहे ते सांग, मी ती तुला देईन.”+ २९ तेव्हा याकोब त्याला म्हणाला: “मी तुझी कशी सेवा केली आणि तुझी गुरंढोरं माझ्यामुळे कशी वाढली,+ हे तुला चांगलं माहीत आहे; ३० मी येण्याआधी तुझ्याजवळ फार कमी संपत्ती होती, पण आता तुझे कळप भरपूर वाढले आहेत आणि मी आल्यापासून यहोवाने तुला खूप आशीर्वाद दिले आहेत. मग माझ्या घरादाराकडे मी कधी लक्ष देणार?”+
३१ तेव्हा तो म्हणाला: “मी तुला काय देऊ?” यावर याकोब म्हणाला: “मला तुझ्याकडून काहीही नको! फक्त एक गोष्ट कर, मग मी तुझ्या कळपांना चारत राहीन आणि त्यांची राखण करत राहीन.+ ३२ आज मी तुझ्या सगळ्या कळपातून फिरेन. तू माझ्यासाठी कळपातून ठिपकेदार आणि रंगीत डाग असलेल्या सगळ्या मेंढ्या, तपकिरी रंगाचे सगळे मेंढे आणि ठिपकेदार आणि रंगीत डाग असलेल्या सगळ्या बकऱ्या बाजूला काढ. आजपासून ही माझी मजुरी असेल.+ ३३ पुढे ज्या दिवशी तू माझ्या मजुरीचा हिशोब घ्यायला येशील, तेव्हा माझा प्रामाणिकपणा* तुला दिसून येईल. जर माझ्या कळपात एखादी ठिपकेदार आणि रंगीत डाग नसलेली बकरी किंवा तपकिरी रंग नसलेला एखादा मेंढा दिसला, तर तो चोरलेला आहे हे तुला समजेल.”
३४ यावर लाबान म्हणाला: “ठीक आहे! तू म्हणतोस तसंच करू.”+ ३५ मग त्या दिवशी त्याने चट्टेपट्टे आणि रंगीत डाग असलेले सगळे बकरे आणि ठिपकेदार आणि रंगीत डाग असलेल्या सगळ्या बकऱ्या, तसंच, पांढरे डाग असलेले आणि तपकिरी रंगाचे सगळे मेंढे, वेगळे काढून आपल्या मुलांकडे सांभाळायला दिले. ३६ त्यानंतर त्याने आपल्यामध्ये आणि याकोबमध्ये तीन दिवसांच्या प्रवासाचं अंतर ठेवलं. याकोब लाबानच्या उरलेल्या कळपांची राखण करू लागला.
३७ मग याकोबने लिवने,* बदाम आणि अर्मोन* या झाडांच्या काठ्या घेतल्या. त्याने त्या जागोजागी अशा सोलल्या, की त्यांच्यातला पांढरा भाग दिसू लागला. ३८ मग कळप जिथे पाणी प्यायला यायचे, तिथे त्याने त्या सोललेल्या काठ्या नाल्यांमध्ये आणि हौदांमध्ये त्यांच्यासमोर ठेवल्या. म्हणजे, कळप जेव्हा पाणी प्यायला येतील, तेव्हा त्या काठ्यांसमोर ते समागम करतील.
३९ कळप त्या काठ्यांसमोर समागम करायचे आणि त्यांना चट्टेपट्टे असलेली, ठिपकेदार आणि रंगीत डाग असलेली पिल्लं व्हायची. ४० मग याकोबने हे मेंढे वेगळे केले. नंतर त्याने लाबानच्या कळपांना, चट्टेपट्टे आणि तपकिरी रंग असलेल्या कळपाकडे वळवलं. मग त्याने आपले कळप आणि लाबानचे कळप वेगवेगळे केले आणि त्यांना पुन्हा एकत्र केलं नाही. ४१ जेव्हा धष्टपुष्ट मेंढरांची समागम करण्याची वेळ यायची, तेव्हा याकोब नाल्यांमध्ये त्यांच्यासमोर त्या काठ्या ठेवायचा, म्हणजे त्या काठ्यांसमोर ती समागम करतील. ४२ पण जेव्हा मेंढरं दुबळी असायची, तेव्हा तो त्यांच्यासमोर काठ्या ठेवत नव्हता. म्हणून दुबळी मेंढरं नेहमी लाबानला मिळायची पण धष्टपुष्ट याकोबला मिळायची.+
४३ अशा रितीने याकोबची खूप भरभराट झाली आणि त्याच्याकडे पुष्कळ कळप, उंट, गाढवं आणि दासदासी झाल्या.+