गणना
२० पहिल्या महिन्यात सर्व इस्राएली लोक झिनच्या ओसाड रानात आले आणि कादेश+ इथे राहू लागले. इथेच मिर्यामचा+ मृत्यू झाला आणि तिला पुरण्यात आलं.
२ इस्राएली लोकांना तिथे प्यायला पाणी मिळालं नाही,+ म्हणून ते मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र जमले. ३ ते असं म्हणून मोशेशी भांडू लागले:+ “आमचे भाऊ यहोवासमोर मेले, तेव्हा आम्हीही मेलो असतो तर बरं झालं असतं! ४ तू यहोवाच्या मंडळीला या ओसाड रानात का आणलंस? आम्ही आणि आमच्या गुराढोरांनी इथे मरावं म्हणून?+ ५ तू इजिप्तमधून आम्हाला या भिकार ठिकाणी का आणलंस?+ इथे धान्य नाही, अंजिरं नाहीत, द्राक्षवेली नाहीत, डाळिंबं नाहीत आणि प्यायला पाणीही नाही!”+ ६ तेव्हा मोशे आणि अहरोन त्यांच्यासमोरून निघाले आणि भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ येऊन जमिनीवर पालथे पडले. मग यहोवाचं तेज त्यांच्यासमोर प्रकट होऊ लागलं.+
७ यहोवा मोशेला म्हणाला: ८ “तुझी काठी घे, मग तू आणि तुझा भाऊ अहरोन दोघं मिळून सर्व लोकांना एकत्र बोलवा. नंतर त्यांच्या डोळ्यांदेखत खडकाशी बोला, म्हणजे खडकातून पाणी निघेल.* अशा रितीने तुम्ही त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढाल आणि ते आणि त्यांची गुरंढोरं पाणी पितील.”+
९ तेव्हा यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे, मोशेने त्याच्यासमोरून आपली काठी घेतली.+ १० मग मोशे आणि अहरोन यांनी सर्व लोकांना खडकासमोर बोलावलं आणि मोशे त्यांना म्हणाला: “बंडखोरांनो ऐका! आता काय आम्ही तुमच्यासाठी या खडकातून पाणी काढायचं?”+ ११ असं म्हणून मोशेने आपला हात उचलला आणि त्या खडकाला आपल्या काठीने दोन वेळा मारलं. तेव्हा त्या खडकातून भरपूर पाणी वाहू लागलं आणि सर्व इस्राएली लोक व त्यांची गुरंढोरं पाणी पिऊ लागली.+
१२ नंतर यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्राएली लोकांसमोर मला पवित्र केलं नाही, म्हणून जो देश मी त्यांना देणार आहे, त्यात तुम्ही या मंडळीला नेणार नाही.”+ १३ अशा रितीने, मरीबा*+ इथे वाहणाऱ्या पाण्याजवळ इस्राएली लोक यहोवाशी भांडले आणि तो त्यांच्यामध्ये पवित्र ठरला.
१४ मग मोशेने कादेश इथून काही माणसांना अदोमच्या राजाकडे असा निरोप घेऊन पाठवलं:+ “तुझा भाऊ इस्राएल+ असं म्हणतो, ‘आम्हाला किती कष्ट सोसावे लागले, हे तर तुला चांगलंच माहीत आहे. १५ आमचे वाडवडील इजिप्तला गेले+ आणि आम्ही बरीच वर्षं* तिथे राहिलो.+ इजिप्तच्या लोकांनी आम्हाला आणि आमच्या वाडवडिलांना खूप छळलं.+ १६ शेवटी आम्ही रडून यहोवाला याचना केली.+ तेव्हा त्याने आमची हाक ऐकून एका स्वर्गदूताला पाठवलं+ आणि आम्हाला इजिप्तमधून बाहेर काढलं. आता आम्ही तुझ्या सीमेवर असलेल्या कादेश शहरात आहोत. १७ तेव्हा कृपा करून आम्हाला तुझ्या देशामधून पलीकडे जाऊ दे. आम्ही कोणत्याही शेतातून किंवा द्राक्षमळ्यातून जाणार नाही, किंवा कोणत्याही विहिरीचं पाणी पिणार नाही. तुझ्या देशातून बाहेर पडेपर्यंत आम्ही डावीकडे किंवा उजवीकडे वळणार नाही. आम्ही फक्त राजमार्गावरूनच जाऊ.’”+
१८ पण, अदोमचा राजा त्याला म्हणाला: “मी तुम्हाला माझ्या देशामधून जाऊ देणार नाही. जर तुम्ही गेलात, तर मी तलवार घेऊन तुमच्यावर हल्ला करीन.” १९ यावर इस्राएली लोक त्याला म्हणाले: “आम्ही महामार्गानेच जाऊ. जर आम्ही किंवा आमची गुरंढोरं तुझ्या इथलं पाणी प्यायलो, तर आम्ही त्याचा मोबदला देऊ.+ आम्हाला काहीही नको, फक्त तुझ्या देशातून पलीकडे पायी जायचंय.”+ २० तरीही अदोमचा राजा म्हणाला: “तुम्ही इथून पलीकडे जाऊ शकत नाही.”+ नंतर तो बऱ्याच लोकांना आणि एका शक्तिशाली सैन्याला* घेऊन त्यांच्यावर हल्ला करायला आला. २१ अशा रितीने, अदोमच्या राजाने इस्राएली लोकांना आपल्या देशातून पलीकडे जाऊ दिलं नाही. त्यामुळे इस्राएली लोक तिथून दुसरीकडे वळले.+
२२ सर्व इस्राएली लोक कादेशवरून निघून होर पर्वताजवळ आले.+ २३ तेव्हा अदोमच्या सीमेवर असलेल्या होर पर्वताजवळ, यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: २४ “मी इस्राएली लोकांना जो देश देणार आहे, त्यात अहरोन जाऊ शकणार नाही. तो आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल.*+ कारण मरीबा इथल्या पाण्याबद्दल मी तुम्हाला जी आज्ञा दिली होती, ती न पाळून तुम्ही दोघांनीही माझ्याविरुद्ध बंड केलं.+ २५ आता अहरोन आणि त्याचा मुलगा एलाजार यांना होर पर्वतावर घेऊन ये. २६ अहरोनची वस्त्रं काढून+ ती त्याचा मुलगा एलाजार याला घाल.+ यानंतर अहरोनचा तिथे मृत्यू होईल.”
२७ मोशेने यहोवाच्या आज्ञेप्रमाणेच केलं. सर्व लोकांदेखत ते होर पर्वतावर चढले. २८ मग मोशेने अहरोनची वस्त्रं काढून ती एलाजारला घातली. त्यानंतर तिथेच पर्वताच्या माथ्यावर अहरोनचा मृत्यू झाला.+ मग मोशे आणि एलाजार पर्वतावरून खाली आले. २९ अहरोनचा मृत्यू झाला आहे, हे जेव्हा इस्राएली लोकांना कळलं, तेव्हा सर्व इस्राएली लोक ३० दिवस अहरोनसाठी रडत राहिले.+