यशया
६६ यहोवा म्हणतो: “स्वर्ग माझं राजासन, आणि पृथ्वी माझ्या पायांसाठी आसन आहे.+
मग तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचं घर बांधाल?+
माझ्यासाठी कोणत्या प्रकारचं विश्रांतीचं स्थान बांधाल?”+
पण तरी, जो नम्र आणि खचलेल्या मनाचा आहे,
ज्याला माझ्या वचनाचा गाढ आदर आहे, त्याच्याकडे मी लक्ष देईन.+
३ बैलाचं बलिदान देणारा, माणसाची हत्या करणाऱ्यासारखा आहे.+
मेंढराचं बलिदान देणारा, कुत्र्याची मान मोडणाऱ्यासारखा आहे.+
भेट अर्पण करणारा, डुकराचं रक्त अर्पण करणाऱ्यासारखा आहे.+
आणि स्मरणाचं ऊद अर्पण करणारा,+ मंत्रांचा जप करून आशीर्वाद देणाऱ्यासारखा आहे.*+
त्यांनी स्वतः आपले मार्ग निवडले आहेत,
आणि त्यांना घृणास्पद कामं करायला आवडतात.
४ म्हणून आता मीपण त्यांना शिक्षा करायचे मार्ग निवडीन,+
आणि ज्या गोष्टींची त्यांना भीती वाटते, त्याच गोष्टींनी मी त्यांना शिक्षा करीन.
कारण मी हाक मारली तेव्हा कोणी उत्तर दिलं नाही,
मी बोललो तेव्हा कोणी माझं ऐकलं नाही.+
माझ्या नजरेत जे वाईट तेच ते करत राहिले,
आणि जे मला आवडत नाही तेच करायचं त्यांनी निवडलं.”+
५ यहोवाच्या वचनाबद्दल गाढ आदर असलेल्यांनो, ऐका:
“तुमचे भाऊ तुमचा द्वेष करतात आणि माझ्या नावामुळे तुम्हाला एकटं पाडतात.
ते तुम्हाला म्हणतात: ‘यहोवाचा गौरव होवो!’+
पण मी तुमच्यासमोर प्रकट होईन आणि तुम्ही आनंदी व्हाल.
त्या लोकांना मात्र लज्जित केलं जाईल.”+
६ शहरात खळबळ माजली आहे; मंदिरातून मोठा आवाज ऐकू येत आहे!
यहोवा आपल्या शत्रूंना योग्य शिक्षा करत असल्याचा तो आवाज आहे.
७ प्रसूतीच्या वेदना सुरू होण्याआधीच एका स्त्रीने बाळाला जन्म दिला.+
कळा सुरू होण्यापूर्वीच तिने एका मुलाला जन्म दिला.
८ असं काही घडल्याचं कोणी कधी ऐकलं आहे का?
किंवा असं काही कोणी पाहिलं आहे का?
देश कधी एका दिवसात जन्माला येऊ शकतो का?
संपूर्ण राष्ट्राचा कधी अचानक जन्म होतो का?
पण, सियोनने प्रसूतीच्या वेदना होताच आपल्या मुलांना जन्म दिला.
९ यहोवा म्हणतो: “प्रसूतीच्या वेळेपर्यंत आणायचं, पण जन्म होऊ द्यायचा नाही, असं कधी मी करीन का?”
तुमचा देव म्हणतो: “प्रसूती सुरू होऊ द्यायची आणि मग गर्भाशयाचं तोंड बंद करायचं, असं कधी मी करीन का?”
१० यरुशलेमवर प्रेम करणाऱ्यांनो,+ तिच्यासोबत जल्लोष करा आणि आनंदी व्हा.+
तिच्यासाठी शोक करत असलेले तुम्ही सगळे जण, तिच्यासोबत आनंदोत्सव करा.
११ कारण तुम्ही तिच्या अंगावर पिऊन तृप्त व्हाल आणि तुमचं सांत्वन होईल.
तुम्ही मनसोक्त प्याल आणि तिचं वैभव पाहून आनंदी व्हाल.
१२ कारण यहोवा असं म्हणतो:
तुम्हाला अंगावर पाजलं जाईल, कडेवर घेतलं जाईल आणि मांडीवर खेळवलं जाईल.
१३ आई जसं आपल्या मुलाचं सांत्वन करते,
तसं मी तुमचं सांत्वन करत राहीन;+
आणि यरुशलेममुळे तुमचं सांत्वन होईल.+
१४ तुम्ही ते पाहाल आणि तुमचं मन आनंदाने भरून जाईल,
तुमची हाडं कोवळ्या गवतासारखी तरतरीत होतील.
यहोवा आपल्या सेवकांसाठी आपला शक्तिशाली हात प्रकट करेल,
पण आपल्या शत्रूंचा मात्र तो धिक्कार करेल.”+
आपल्या शत्रूंचा बदला घेण्यासाठी तो मोठ्या क्रोधाने येईल,
त्यांना शिक्षा करण्यासाठी तो आगीच्या ज्वालांसोबत येईल.+
१६ कारण यहोवा आगीने न्यायदंड बजावेल,
तो आपल्या तलवारीने सर्व माणसांवर न्यायदंड बजावेल.
तेव्हा यहोवाच्या हातून मारले गेलेल्यांची संख्या मोठी असेल.”
१७ यहोवा म्हणतो: “जे स्वतःला पवित्र आणि शुद्ध करून मधोमध असलेल्याच्या मागे बागांमध्ये* जातात;+ आणि जे डुकरांचं+ व उंदरांचं मांस खातात, तसंच इतर किळसवाण्या गोष्टी खातात,+ त्या सगळ्यांचा एकत्र नाश होईल. १८ मला त्यांची कामं आणि त्यांचे विचार चांगले माहीत आहेत. म्हणून मी सर्व राष्ट्रांना आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना एकत्र जमवायला येतोय. ते सगळे येतील आणि माझं वैभव पाहतील.”
१९ “मी त्यांच्यामध्ये एक चिन्ह स्थापन करीन. आणि वाचलेल्या लोकांपैकी काहींना मी अशा राष्ट्रांमध्ये पाठवीन, ज्यांनी कधी माझ्याबद्दल ऐकलं नाही किंवा माझं वैभव पाहिलं नाही. त्यांना मी धनुष्य चालवण्यात कुशल असलेल्या राष्ट्रांमध्ये, म्हणजे तार्शीश,+ पूल आणि लूद+ यांमध्ये पाठवीन. तसंच, मी त्यांना तुबाल, यावान+ आणि दूरदूरच्या बेटांवर पाठवीन. त्या राष्ट्रांमध्ये जाऊन ते जाहीरपणे माझा गौरव करतील.+ २० जसं इस्राएली लोक शुद्ध भांड्यात आपली भेट घेऊन यहोवाच्या मंदिरात येतात, तसं ते सर्व राष्ट्रांमधून तुमच्या सगळ्या भाऊबंदांना यहोवासाठी भेट म्हणून घेऊन येतील;+ ते त्यांना घोड्यांवर, चपळ उंटांवर, खेचरांवर आणि रथांमध्ये व गाड्यांमध्ये बसवून माझ्या पवित्र डोंगराकडे, यरुशलेमकडे घेऊन येतील,” असं यहोवा म्हणतो.
२१ “तसंच, मी काहींना याजक तर काहींना लेवी होण्यासाठी निवडीन,” असं यहोवा म्हणतो.
२२ “मी बनवत असलेलं नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी+ जशी माझ्यासमोर कायम टिकून राहील, तशीच तुमची संतती* आणि तुमचं नाव माझ्यासमोर कायम टिकून राहील,” असं यहोवा म्हणतो.+
२३ “एका नवचंद्राच्या दिवसापासून दुसऱ्या नवचंद्राच्या दिवसापर्यंत,
आणि एका शब्बाथाच्या दिवसापासून दुसऱ्या शब्बाथाच्या दिवसापर्यंत,
सर्व माणसं माझी उपासना करायला येतील,”+ असं यहोवा म्हणतो.
२४ “ते बाहेर जातील आणि ज्यांनी माझ्याविरुद्ध बंड केलं त्यांची प्रेतं त्यांना दिसतील.
त्या प्रेतांना पडलेले किडे मरणार नाहीत,
त्यांना जाळणारी आग कधीही विझणार नाही.+
आणि हे पाहून सर्व लोकांना किळस येईल.”