उत्पत्ती
१ सुरुवातीला देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली.+
२ पृथ्वीवर काहीच नव्हतं आणि ती ओसाड होती. खोल पाण्यावर*+ अंधार होता आणि देवाची क्रियाशील शक्ती*+ पाण्यावर+ इथून तिथे वाहत होती.
३ मग देव म्हणाला: “प्रकाश व्हावा.” तेव्हा प्रकाश झाला.+ ४ त्यानंतर देवाने पाहिलं की प्रकाश चांगला आहे आणि देव प्रकाशाला अंधारापासून वेगळं करू लागला. ५ देवाने प्रकाशाला दिवस, तर अंधाराला रात्र+ असं म्हटलं. मग संध्याकाळ झाली आणि त्यानंतर सकाळ झाली. हा पहिला दिवस होता.
६ मग देव म्हणाला: “पाण्याचे, वर आणि खाली असे दोन भाग व्हावेत+ आणि त्यांच्यामध्ये अंतराळ*+ निर्माण व्हावं.” ७ मग देवाने अंतराळ बनवलं आणि अंतराळाच्या खाली असलेल्या पाण्याला अंतराळाच्या वर असलेल्या पाण्यापासून वेगळं केलं.+ आणि तसंच झालं. ८ देवाने अंतराळाला आकाश म्हटलं. मग संध्याकाळ झाली आणि त्यानंतर सकाळ झाली. हा दुसरा दिवस होता.
९ त्यानंतर देव म्हणाला: “आकाशाखालचं पाणी एका ठिकाणी जमा व्हावं आणि कोरडी जमीन दिसावी.”+ आणि तसंच झालं. १० कोरड्या जमिनीला देवाने पृथ्वी म्हटलं,+ तर जमलेल्या पाण्याला समुद्र म्हटलं.+ आणि देवाने पाहिलं की ते चांगलं आहे.+ ११ मग देव म्हणाला: “पृथ्वीवर गवत, बिया उत्पन्न करणारी झाडं आणि बिया असलेली फळं देणारी झाडं आपापल्या जातींप्रमाणे उगवावीत.” आणि तसंच झालं. १२ तेव्हा पृथ्वीवर गवत, बिया उत्पन्न करणारी झाडं+ आणि बिया असलेली फळं देणारी झाडं आपापल्या जातींप्रमाणे उगवू लागली. आणि देवाने पाहिलं की ते चांगलं आहे. १३ मग संध्याकाळ झाली आणि त्यानंतर सकाळ झाली. हा तिसरा दिवस होता.
१४ मग देव म्हणाला: “दिवस आणि रात्र यांना वेगळं करण्यासाठी+ आकाशात ज्योती+ व्हाव्यात. त्यांच्या मदतीने ऋतू, दिवस आणि वर्षं ठरवली जातील.+ १५ पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी या ज्योती आकाशात चमकतील.” आणि तसंच झालं. १६ मग देवाने दोन मोठ्या ज्योती बनवल्या, दिवसा उजेड देण्यासाठी मोठी ज्योती+ आणि रात्री उजेड देण्यासाठी लहान ज्योती. तसंच, त्याने तारेही बनवले.+ १७ देवाने त्यांना यासाठी आकाशात ठेवलं की त्यांनी पृथ्वीला प्रकाश द्यावा, १८ दिवसा आणि रात्री उजेड द्यावा आणि प्रकाश व अंधार यांना वेगळं करावं.+ मग देवाने पाहिलं की ते चांगलं आहे. १९ मग संध्याकाळ झाली आणि त्यानंतर सकाळ झाली. हा चौथा दिवस होता.
२० मग देव म्हणाला: “समुद्र जीवजंतूंनी* भरून जावा आणि पक्षी व उडणारे जीवजंतू पृथ्वीच्या वर पसरलेल्या उंच आकाशात उडावेत.”+ २१ तेव्हा देवाने समुद्रात राहणारे मोठमोठे प्राणी* आणि पाण्यात राहणारे सर्व जीवजंतू त्यांच्या जातींप्रमाणे आणि सर्व प्रकारचे पक्षी व उडणारे जीवजंतू त्यांच्या जातींप्रमाणे निर्माण केले. मग देवाने पाहिलं की ते चांगलं आहे. २२ त्यानंतर देवाने त्यांना असा आशीर्वाद दिला: “फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि समुद्रातल्या पाण्याला भरून टाका+ आणि पक्ष्यांची व उडणाऱ्या जीवजंतूंची संख्या पृथ्वीवर खूप वाढावी.” २३ मग संध्याकाळ झाली आणि त्यानंतर सकाळ झाली. हा पाचवा दिवस होता.
२४ त्यानंतर देव म्हणाला: “पृथ्वीवर आपापल्या जातींप्रमाणे प्राणी* व्हावेत, पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी व रांगणारे प्राणी* आपापल्या जातींप्रमाणे व्हावेत.”+ आणि तसंच झालं. २५ मग देवाने पृथ्वीवर राहणारे जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे बनवले, तसंच जमिनीवर रांगणारे प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे बनवले. आणि देवाने पाहिलं की ते चांगलं आहे.
२६ त्यानंतर देव म्हणाला: “आपण+ आपल्या प्रतिरूपाचा,+ आपल्यासारखा असलेला माणूस निर्माण करू+ आणि त्याने समुद्रातले मासे, आकाशात उडणारे पक्षी, पाळीव प्राणी व जमिनीवर रांगणारे प्राणी यांवर, तसंच संपूर्ण पृथ्वीवर अधिकार चालवावा.”+ २७ मग देवाने आपल्या प्रतिरूपात माणूस निर्माण केला, त्याने त्याला स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केलं; पुरुष आणि स्त्री असं त्याने त्यांना निर्माण केलं.+ २८ देवाने त्यांना असा आशीर्वाद दिला: “फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पूर्ण पृथ्वीला भरून टाका+ आणि तिच्यावर अधिकार चालवा.+ समुद्रातले मासे, आकाशात उडणारे पक्षी व जीवजंतू, तसंच पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यांवर अधिकार चालवा.”+
२९ मग देव म्हणाला: “मी तुम्हाला बिया उत्पन्न करणारी पृथ्वीवरची सर्व झाडं आणि बिया असलेली फळं देणारी सर्व झाडं देतोय. ती तुमच्यासाठी अन्न ठरतील.+ ३० पृथ्वीवरच्या सर्व जंगली प्राण्यांना, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना व जीवजंतूंना, तसंच पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व जिवांना मी हिरवं गवत आणि झाडंझुडपं अन्न म्हणून देतोय.”+ आणि तसंच झालं.
३१ त्यानंतर, आपण बनवलेलं सर्वकाही खूप चांगलं आहे+ असं देवाने पाहिलं. मग संध्याकाळ झाली आणि त्यानंतर सकाळ झाली. हा सहावा दिवस होता.