करिंथकर यांना पहिलं पत्र
१ ज्याला देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा एक प्रेषित होण्यासाठी बोलावण्यात आलं,+ तो पौल आणि आपला भाऊ सोस्थनेस यांच्याकडून, २ करिंथमध्ये+ असलेल्या देवाच्या मंडळीला. म्हणजे, पवित्र जन होण्यासाठी ख्रिस्त येशूचे शिष्य या नात्याने ज्यांना पवित्र करण्यात आलं आहे,+ त्या तुम्हाला, तसंच सर्व ठिकाणी, आपल्या सर्वांचा प्रभू असलेल्या येशू ख्रिस्ताचं नाव घेऊन जे त्याला हाक मारतात अशा सगळ्यांना:+
३ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्याकडून तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.
४ ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अपार कृपेमुळे मी नेहमीच माझ्या देवाचे आभार मानतो. ५ कारण बोलण्याचं पूर्ण सामर्थ्य आणि पूर्ण ज्ञान यांसोबतच इतर सगळ्या गोष्टींमध्ये, तुम्हाला त्याच्याद्वारे समृद्ध करण्यात आलं आहे.+ ६ तसंच, ख्रिस्ताबद्दलची साक्ष+ तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारे मुळावली आहे. ७ आणि यामुळे, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहत असताना तुम्ही कोणत्याही दानात कमी पडला नाहीत.+ ८ त्याच प्रकारे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुमच्यावर कोणताही आरोप येऊ नये, म्हणून देव तुम्हाला शेवटपर्यंत स्थिर राहायलाही मदत करेल.+ ९ देव विश्वासू आहे+ आणि त्याच्यामुळेच तुम्हाला त्याचा मुलगा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यासोबत भागीदार* होण्यासाठी बोलावण्यात आलं आहे.
१० बांधवांनो, आता मी तुम्हाला आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने अशी विनंती करतो, की तुम्हा सर्वांचं बोलणं सारखं असावं. तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फुटी असू नयेत,+ तर तुमची मतं आणि विचारसरणी एकसारखीच असावी आणि तुम्ही पूर्णपणे ऐक्यात राहावं.+ ११ कारण माझ्या बांधवांनो, ख्लोवे हिच्या घराण्यातल्या काहींनी मला तुमच्याबद्दल असं सांगितलं आहे, की तुमच्यामध्ये मतभेद आहेत. १२ म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की तुमच्यापैकी प्रत्येक जण, “मी पौलचा,” “मी अपुल्लोचा,”+ “मी तर केफाचा,”* किंवा “मी तर ख्रिस्ताचा” असं म्हणतो. १३ ख्रिस्त असा विभागलेला आहे का? तुमच्यासाठी काय पौलला वधस्तंभावर* खिळण्यात आलं? की तुम्ही पौलच्या नावाने बाप्तिस्मा* घेतला होता? १४ मी देवाचे आभार मानतो, की तुमच्यापैकी क्रिस्प+ आणि गायस+ यांच्याशिवाय मी कोणालाही बाप्तिस्मा दिला नाही. १५ कारण तुम्ही माझ्या नावाने बाप्तिस्मा घेतला, असं आता कोणालाही म्हणता येणार नाही. १६ हो, स्तेफना याच्या घराण्यालाही मी बाप्तिस्मा दिला होता.+ पण, बाकीच्या कोणालाही बाप्तिस्मा दिल्याचं मला आठवत नाही. १७ कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा द्यायला नाही, तर आनंदाचा संदेश घोषित करायला पाठवलं;+ पण बुद्धिमानांच्या भाषेत* नाही. कारण तसं केल्यामुळे, ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरला असता.
१८ कारण ज्यांचा नाश होत आहे, त्यांना वधस्तंभाबद्दलचा संदेश मूर्खपणा वाटतो.+ पण ज्यांना वाचवलं जात आहे,* त्या आपल्यासाठी तो देवाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे.+ १९ कारण असं लिहिलं आहे: “मी बुद्धिमान माणसांची बुद्धी नष्ट करीन, आणि ज्ञानी लोकांचं ज्ञान धुडकावून लावीन.”*+ २० कुठे आहेत बुद्धिमान? कुठे आहेत शास्त्री?* कुठे आहेत या जगाच्या व्यवस्थेतले* वादविवाद करणारे? देवाने या जगाची बुद्धी मूर्खपणा आहे हे सिद्ध केलं नाही का? २१ या जगाला स्वतःच्या बुद्धीने+ देवाची ओळख झाली नाही.+ पण देवाची बुद्धी यातूनच दिसून येते, की लोकांना मूर्खपणा वाटणाऱ्या संदेशाद्वारे, विश्वास ठेवणाऱ्यांना वाचवणं* त्याला योग्य वाटलं.+
२२ कारण यहुदी लोक चमत्कार* दाखवण्याची मागणी करतात+ आणि ग्रीक लोक बुद्धीच्या शोधात आहेत. २३ पण आपण तर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या ख्रिस्ताबद्दल घोषणा करतो. तो यहुद्यांसाठी अडखळण्याचं कारण, तर विदेश्यांसाठी मूर्खपणा आहे.+ २४ पण ज्यांना बोलावण्यात आलं आहे, त्या यहुदी आणि ग्रीक लोकांसाठीही ख्रिस्त हा देवाच्या सामर्थ्याचा आणि बुद्धीचा पुरावा आहे.+ २५ कारण देवाच्या ज्या गोष्टी माणसांना मूर्खपणाच्या वाटतात, त्या माणसांच्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि देवाच्या ज्या गोष्टी माणसांना दुर्बल वाटतात, त्या माणसांपेक्षा जास्त शक्तिशाली आहेत.+
२६ कारण बांधवांनो, तुम्ही स्वतःच्याच बाबतीत ही गोष्ट पाहू शकता, की जे माणसांच्या दृष्टीने* बुद्धिमान,+ शक्तिशाली आणि उच्च घराण्यातले आहेत,+ अशा पुष्कळांना देवाने बोलावलं नाही. २७ तर बुद्धिमानांना लज्जित करण्यासाठी देवाने जगातल्या मूर्ख गोष्टींना निवडलं. आणि शक्तिशाली गोष्टींना लज्जित करण्यासाठी देवाने जगातल्या दुर्बल गोष्टींना निवडलं.+ २८ जगातल्या कवडीमोल, तुच्छ लेखल्या जाणाऱ्या आणि लोकांच्या नजरेत काहीच नाहीत अशा* गोष्टींना त्याने निवडलं. त्याने हे यासाठी केलं, की त्यांद्वारे महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या* गोष्टींना धुळीला मिळवावं,+ २९ म्हणजे कोणालाही देवापुढे बढाई मारता येणार नाही. ३० पण तुम्ही देवामुळेच ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात आहात. ख्रिस्ताने देवाची बुद्धी, तसंच त्याचं नीतिमत्त्व+ आपल्याला प्रकट केलं आणि आपल्याला पवित्र करून+ खंडणीद्वारे मुक्त केलं.+ ३१ हे यासाठी, की जे लिहिण्यात आलं होतं ते पूर्ण व्हावं: “जो कोणी बढाई मारतो, त्याने यहोवाबद्दल* बढाई मारावी.”+