२ इतिहास
३४ योशीया+ राजा बनला तेव्हा तो आठ वर्षांचा होता आणि त्याने ३१ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ २ त्याने यहोवाच्या नजरेत जे योग्य ते केलं. तो आपला पूर्वज दावीद याच्या सर्व मार्गांप्रमाणे चालला; त्यांपासून तो भरकटला नाही.
३ योशीया आपल्या शासनकाळाच्या आठव्या वर्षी, म्हणजे वयाने लहान असतानाच आपला पूर्वज दावीद याच्या देवाची सेवा करू लागला.+ मग, आपल्या शासनकाळाच्या १२ व्या वर्षी त्याने यहूदा आणि यरुशलेममधून उपासनेची उच्च स्थानं,*+ पूजेचे खांब,* कोरलेल्या मूर्ती+ आणि धातूच्या मूर्ती* काढायला सुरुवात केली.+ ४ पुढे लोकांनी योशीयासमोर बआलच्या वेदी पाडून टाकल्या. आणि योशीयाने त्यांवर असलेले धूपस्तंभ तोडून टाकले. तसंच त्याने पूजेचे खांब,* कोरलेल्या मूर्ती आणि धातूच्या मूर्तीही* तोडून टाकल्या आणि त्यांचा चुराडा केला. मग त्याने तो चुरा मूर्तींना बलिदानं अर्पण करणाऱ्या लोकांच्या कबरींवर फेकून दिला.+ ५ आणि त्यांच्या वेदींवर त्याने पुजाऱ्यांची हाडं जाळून टाकली.+ अशा प्रकारे, त्याने यहूदा आणि यरुशलेम शुद्ध केलं.
६ मग त्याने मनश्शे, एफ्राईम,+ शिमोन या प्रदेशांतल्या शहरांपासून थेट नफताली प्रदेशातल्या शहरांपर्यंत, आणि त्यांच्या आजूबाजूच्या उद्ध्वस्त झालेल्या भागांतही तेच केलं. ७ त्याने तिथल्या वेदी पाडून टाकल्या आणि पूजेचे खांब* व कोरलेल्या मूर्ती तोडून त्यांचा चुराडा केला.+ तसंच, त्याने इस्राएल देशातले सगळे धूपस्तंभही तोडून टाकले.+ त्यानंतर तो यरुशलेमला परत गेला.
८ मग आपल्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी, म्हणजे संपूर्ण देश आणि मंदिर शुद्ध केल्यानंतर, योशीयाने असल्याहचा मुलगा शाफान,+ इतिहास-लेखक असलेला योवाहाजचा मुलगा यवाह आणि शहराचा प्रमुख मासेया यांना आपला देव यहोवा याच्या मंदिराची दुरुस्ती करायला पाठवलं.+ ९ ते हिल्कीया महायाजकाकडे आले आणि त्यांनी त्याला देवाच्या मंदिरात गोळा झालेला सगळा पैसा दिला. हा पैसा, द्वारपाल म्हणून सेवा करणाऱ्या लेव्यांनी मनश्शे, एफ्राईम आणि इस्राएलच्या बाकीच्या प्रदेशांतल्या लोकांकडून;+ तसंच यहूदा, बन्यामीन आणि यरुशलेमच्या लोकांकडून गोळा केला होता. १० मग त्यांनी हा पैसा यहोवाच्या मंदिराच्या कामाची देखरेख करणाऱ्या माणसांना दिला. पुढे त्यांनी तो पैसा कामगारांना दिला आणि कामगारांनी तो यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती व डागडुजी करण्यासाठी वापरला. ११ देखरेख करणाऱ्या माणसांनी हा पैसा कारागिरांना आणि बांधकाम करणाऱ्यांना, घडवलेले दगड आणि टेकाव्यांसाठी लाकडं विकत घ्यायला दिला. तसंच, यहूदाच्या राजांनी दुर्लक्ष केल्यामुळे ज्या इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या, त्या बांधून काढायला आणि त्यांसाठी लागणाऱ्या तुळया* विकत घ्यायलाही त्यांनी तो पैसा त्यांना दिला.+
१२ त्या माणसांनी प्रामाणिकपणे काम केलं.+ त्यांच्या कामाची देखरेख करण्यासाठी जे लेवी नेमण्यात आले होते ते हे: मरारीच्या घराण्यातले+ यहथ आणि ओबद्या; कहाथच्या घराण्यातले+ जखऱ्या आणि मशुल्लाम. शिवाय, कुशल संगीतकार+ असलेले सगळे लेवी १३ ओझी वाहणाऱ्यांवर* अधिकारी होते. आणि ते सर्व प्रकारची कामं करणाऱ्यांवरही देखरेख करायचे. लेव्यांपैकी काही जण सचिव, अधिकारी आणि द्वारपाल म्हणून सेवा करायचे.+
१४ यहोवाच्या मंदिरात गोळा झालेला पैसा ते जेव्हा बाहेर काढत होते,+ तेव्हा हिल्कीया याजकाला यहोवाने मोशेद्वारे दिलेलं+ नियमशास्त्राचं पुस्तक सापडलं.+ १५ नंतर हिल्कीया हा सचिव शाफानला म्हणाला: “मला यहोवाच्या मंदिरात नियमशास्त्राचं पुस्तक सापडलंय.” मग हिल्कीयाने ते पुस्तक शाफानला दिलं. १६ शाफान ते पुस्तक घेऊन राजाकडे गेला आणि त्याला म्हणाला: “तुमच्या सेवकांना जी कामं नेमून देण्यात आली होती, ती सगळी ते करत आहेत. १७ त्यांनी यहोवाच्या मंदिरातला सगळा पैसा जमा केलाय, आणि तो मंदिराच्या दुरुस्तीचं काम पाहणाऱ्या माणसांना आणि कामगारांना दिलाय.” १८ सचिव शाफानने राजाला असंही सांगितलं: “हिल्कीया याजकाने मला एक पुस्तक दिलंय.”+ मग शाफान ते पुस्तक राजासमोर वाचू लागला.+
१९ नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेली वचनं ऐकताच राजाने दुःखी होऊन आपले कपडे फाडले.+ २० मग राजाने हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम,+ मीखाचा मुलगा अब्दोन, सचिव शाफान आणि राजाचा सेवक असाया यांना असा हुकूम दिला: २१ “जा, आणि हे जे पुस्तक सापडलंय त्यात लिहिलेल्या वचनांविषयी माझ्या वतीने, तसंच यहूदा आणि इस्राएलमध्ये उरलेल्या लोकांच्या वतीने यहोवाला विचारा. कारण आपल्या पूर्वजांनी यहोवाचं ऐकलं नाही. या पुस्तकात जे लिहिलंय त्यानुसार ते वागले नाहीत आणि म्हणून आता यहोवाचा क्रोध आपल्यावर खूप भडकणार आहे.”+
२२ तेव्हा हिल्कीया आणि त्याच्यासोबत राजाने ज्यांना पाठवलं होतं, ते सगळे हुल्दा संदेष्टीकडे गेले.+ हुल्दा ही वस्त्र-भांडाराची देखरेख करणाऱ्या शल्लूमची बायको होती. (शल्लूम हा तिकवाचा मुलगा आणि हरहसचा नातू होता.) हुल्दा यरुशलेमच्या उपनगरात राहायची. राजाने पाठवलेले लोक तिकडे जाऊन तिच्याशी बोलले.+ २३ ती त्यांना म्हणाली: “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो, की ‘ज्या माणसाने तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय त्याला जाऊन असं सांगा: २४ “यहोवा म्हणतो, ‘मी या जागेवर आणि इथे राहणाऱ्या लोकांवर संकट आणीन.+ यहूदाच्या राजासमोर जे पुस्तक वाचण्यात आलंय, त्यात लिहिलेले सगळे शाप मी त्यांच्यावर आणीन.+ २५ कारण त्यांनी मला सोडून दिलंय.+ ते इतर देवांना बलिदानांचं हवन करत आहेत आणि आपल्या हातांनी बनवलेल्या वस्तूंनी मला संताप आणत आहेत.+ म्हणून या जागेवर माझा क्रोध भडकेल आणि तो शांत होणार नाही.’”+ २६ पण ज्या यहूदाच्या राजाने तुम्हाला यहोवाकडे चौकशी करायला पाठवलंय, त्याला असं सांगा, की “तू जी वचनं ऐकलीस,+ त्यांबद्दल इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: २७ ‘या जागेविषयी आणि इथल्या लोकांविषयी मी जे बोललो, ते ऐकून तू देवासमोर नम्र झालास आणि आपलं हृदय कोमल केलंस. तू माझ्यासमोर नम्र झालास आणि आपले कपडे फाडून माझ्यापुढे रडलास. म्हणून मी यहोवा म्हणतो, की मी तुझा धावा ऐकलाय.+ २८ आणि त्यामुळे तू जिवंत आहेस तोपर्यंत मी या जागेवर आणि इथल्या लोकांवर संकट आणणार नाही. तू तुझ्या पूर्वजांकडे जाशील;* तू शांतीने आपल्या कबरेत जाशील.’”’”+
मग, त्या लोकांनी हा संदेश राजाला येऊन सांगितला. २९ तेव्हा योशीया राजाने निरोप पाठवून यहूदा आणि यरुशलेम इथल्या सगळ्या वडीलजनांना बोलावून घेतलं.+ ३० त्यानंतर यहूदातले सगळे पुरुष, यरुशलेमचे सर्व रहिवासी, याजक व लेवी अशा सर्व लहानमोठ्या लोकांना सोबत घेऊन राजा यहोवाच्या मंदिरात गेला. मग त्याने यहोवाच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या पुस्तकातली सगळी वचनं त्यांच्यासमोर वाचली.+ ३१ मग योशीया आपल्या जागी उभा राहिला आणि त्याने यहोवासमोर असा करार केला,*+ की तो यहोवाच्या सांगण्यानुसार चालेल आणि त्याच्या आज्ञा, स्मरण-सूचना* व कायदे यांचं पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने पालन करेल;+ तसंच, या पुस्तकात लिहिलेल्या कराराच्या सर्व वचनांप्रमाणे तो वागेल.+ ३२ शिवाय, त्याने यरुशलेम आणि बन्यामीन इथल्या सगळ्या लोकांना तो करार पाळण्याचं प्रोत्साहन दिलं. आणि यरुशलेमचे लोक आपल्या पूर्वजांच्या देवाच्या कराराप्रमाणे वागू लागले.+ ३३ योशीयाने मग इस्राएलच्या संपूर्ण प्रदेशातून सगळ्या घृणास्पद वस्तू* काढून टाकल्या.+ आणि त्याने इस्राएलमधल्या सगळ्या लोकांना त्यांचा देव यहोवा याची सेवा करायलाही मदत केली. योशीयाच्या संपूर्ण जीवनकाळात इस्राएली लोक आपल्या पूर्वजांचा देव यहोवा याच्या मार्गांपासून भरकटले नाहीत.