पेत्र याचं दुसरं पत्र
३ प्रिय बांधवांनो, आता मी हे दुसरं पत्र तुम्हाला लिहीत आहे. आणि माझ्या पहिल्या पत्राप्रमाणेच, या पत्राद्वारेसुद्धा तुमच्या विचारशक्तीला चालना देण्यासाठी मी काही गोष्टींची आठवण करून देत आहे.+ २ हे यासाठी, की पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या गोष्टी* आणि आपला प्रभू आणि तारणकर्ता याने तुमच्या प्रेषितांद्वारे दिलेली आज्ञा तुम्ही आठवणीत ठेवावी. ३ सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या, की शेवटच्या दिवसांत आपल्या वासनेप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक येतील आणि अशी थट्टा करतील:+ ४ “आता कुठे गेलं त्याच्या उपस्थितीचं अभिवचन?+ आमच्या वाडवडिलांचा मृत्यू झाला तेव्हापासून सगळ्या गोष्टी, निर्मितीच्या सुरुवातीपासून जशा चालल्या होत्या, तशाच अजूनही चालल्या आहेत.”+
५ कारण, ते जाणूनबुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, की फार पूर्वी आकाश होतं आणि देवाच्या वचनानेच पृथ्वी पाण्याच्या वर आणि पाण्याच्या मधोमध स्थिर उभी होती.+ ६ आणि त्याद्वारे त्या काळातल्या जगाचा जलप्रलयाने नाश झाला.+ ७ पण त्याच वचनाने, सध्या अस्तित्वात असलेले आकाश आणि पृथ्वी अग्नीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. न्यायदंडाच्या आणि दुष्ट लोकांच्या नाशाच्या दिवसापर्यंत त्यांना राखून ठेवण्यात आलं आहे.+
८ पण प्रिय बांधवांनो, ही गोष्ट विसरू नका, की यहोवासाठी* एक दिवस हजार वर्षांसारखा, आणि हजार वर्षं एका दिवसासारखी आहेत.+ ९ काहींना वाटतं की यहोवा* आपलं अभिवचन पूर्ण करण्याच्या बाबतीत उशीर करत आहे, पण तसं नाही.+ उलट तो तुमच्या बाबतीत सहनशीलता दाखवतो. कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्चात्ताप करावा असं त्याला वाटतं.+ १० पण, यहोवाचा* दिवस+ चोरासारखा येईल.+ त्या वेळी, आकाश मोठा गडगडाट करत नाहीसं होईल,+ तर सृष्टीची तत्त्वं अतिशय तापून वितळतील. तसंच, पृथ्वी आणि तिच्यातली सगळी कार्यं उघड होतील.+
११ या सर्व गोष्टी अशा प्रकारे नाहीशा होणार आहेत,* त्यामुळे तुम्ही कशा प्रकारचे लोक असलं पाहिजे याचा विचार करा! तुमची वागणूक पवित्र असली पाहिजे आणि तुम्ही देवाच्या भक्तीची कार्यं केली पाहिजेत. १२ तसंच, तुम्ही यहोवाच्या* दिवसाची वाट पाहिली पाहिजे आणि तो दिवस नेहमी डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे.*+ त्या दिवशी, आकाश जळून नष्ट होईल+ आणि सृष्टीची तत्त्वं अतिशय तापून वितळतील! १३ पण, त्याच्या अभिवचनाप्रमाणे आपण एका नवीन आकाशाची आणि नवीन पृथ्वीची वाट पाहत आहोत+ आणि तिथे न्यायनीती टिकून राहील.+
१४ म्हणून प्रिय बांधवांनो, या गोष्टींची वाट पाहत असताना, तुम्ही त्याला शेवटी निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत असल्याचं दिसावं म्हणून होईल तितका प्रयत्न करा.+ १५ शिवाय, आपल्या प्रभूच्या सहनशीलतेला तारणाची संधी समजा. आपला प्रिय बांधव पौल याला देण्यात आलेल्या बुद्धीप्रमाणे त्यानेही तुम्हाला याबद्दल लिहिलं होतं.+ १६ खरंतर, त्याच्या सगळ्याच पत्रांत त्याने या गोष्टींचा उल्लेख केला आहे. पण, त्यांतल्या काही गोष्टी समजायला कठीण आहेत. जे अज्ञानी आणि अस्थिर मनाचे आहेत ते या गोष्टींचा आणि बाकीच्या शास्त्रवचनांचाही चुकीचा अर्थ लावतात, आणि असं करून ते स्वतःवर नाश ओढवून घेतात.
१७ माझ्या प्रिय बांधवांनो, या गोष्टी तुम्हाला आधीपासूनच माहीत आहेत. त्यामुळे, दुष्ट लोकांच्या खोट्या शिकवणींमुळे भरकटले जाऊन तुम्ही आपली स्थिरता* गमावून बसू नये म्हणून सावध राहा.+ १८ याउलट, आपला प्रभू आणि तारणकर्ता, येशू ख्रिस्त याच्या अपार कृपेत आणि ज्ञानात दिवसेंदिवस वाढत जा. आता आणि अनंतकाळापर्यंत त्याला गौरव मिळत राहो. आमेन.